
आष्टी (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आष्टी शहरात एक अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू होत आहे.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता आष्टीतच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धा परीक्षा बॅचेस सुरू करण्यात येत आहेत.विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत अनाथ आणि दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशासह विशेष सवलत दिली जाणार आहे.सर्व आवश्यक पुस्तकेही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत अशी माहिती पोर्टल न्यूज चॅनल झुंजार वार्ताशी बोलताना सुदर्शन करिअर अकॅडमीचे संचालक प्रा.विजय रासकर यांनी दिली.
सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते.मोठ्या शहरांत जाऊन लाखो रुपये खर्च करणे सर्वांनाच परवडत नाही.हीच अडचण ओळखून हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यात तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांद्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाईल.त्यामुळे आष्टी परिसरासह आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांना आता दर्जेदार शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही.
या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वात मोठे आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे अनाथ आणि अपंग विद्यार्थ्यांप्रती जपलेली सामाजिक बांधिलकी.अशा होतकरू पण आर्थिक किंवा शारीरिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोफत बॅचची सोय करण्यात आली आहे.एवढेच नव्हे,तर त्यांच्या अभ्यासात पैशांअभावी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके या विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य दिली जाणार आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा उपक्रम एक मोठा आधार ठरणार आहे.एकीकडे दर्जेदार शिक्षण आणि दुसरीकडे समाजातील उपेक्षित घटकांना दिलेला मदतीचा हात यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः गरजू, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा.राजपुरे यांनी केले आहे.
---------------
0 टिप्पण्या