आष्टी (प्रतिनिधी)
अंगात जिद्द आणि कठोर मेहनतीची तयारी असेल,तर ग्रामीण भागातील तरुण यशाची कोणतीही शिखरे सर करू शकतो,हे आष्टी तालुक्याचे सुपुत्र बजरंग आनंदराव बनसोडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त (गुन्हे प्रतिबंधक) या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या बनसोडे यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०२५' प्रदान करण्यात आले.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते हा शानदार गौरव सोहळा पार पडला.बजरंग बनसोडे यांचा जीवनप्रवास अत्यंत रंजक आणि ग्रामीण तरुणांसाठी दीपस्तंभासारखा आहे.एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बनसोडे यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक 'शिक्षक' म्हणून केली होती.मात्र,प्रशासकीय सेवेत जाण्याची प्रबळ इच्छा आणि 'खाकी वर्दी'चे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत त्यांनी पोलीस दलात अधिकारी म्हणून मानाने प्रवेश केला.
मुंबईसारख्या महानगरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलाकडून त्यांना आजपर्यंत तब्बल १५६ प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी स्वतः तपास किंवा पर्यवेक्षण केलेल्या तब्बल ८ प्रकरणांमध्ये न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे,जे त्यांच्या तपासाचा उच्च दर्जा दर्शवते. त्यांच्या याच कार्यकुशलतेमुळे त्यांची निवड केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तपास यंत्रनेत (NIA)प्रतिनियुक्ती
वर झाली होती. जून २०२२ ते जून २०२५ या काळात 'एनआयए'मध्ये कार्यरत असताना त्यांनी देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ३२ दहशतवाद्यांना जेरबंद करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.'आयएसआयएस' सारख्या खतरनाक दहशतवादी संघटनेच्या विरोधात राबविलेल्या विशेष आणि धाडसी मोहिमेसाठी त्यांना भारत सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक २०२४' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.कर्तव्यनिष्ठा,शिस्त आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलाने त्यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्हा'ने गौरविले आहे. बजरंग बनसोडे यांच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि विशेषतः आष्टी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
कष्टाला पर्याय नाही आणि जिद्द असेल तर शिक्षक ते पोलीस उपायुक्त असा प्रवास नक्कीच शक्य आहे असा प्रेरणादायी संदेशच जणू त्यांनी आपल्या या यशातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांना दिला आहे. या गौरव सोहळ्याप्रसंगी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.या यशाबद्दल 'दैनिक झुंजारनेता' परिवारासह सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----------------
0 टिप्पण्या