उत्तम बोडखे,आष्टी.
(प्रतिनिधी)
मराठवाड्यातील संशोधकांनी वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधता अभ्यासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.जंगलातील प्राणी आणि त्यांच्या प्रजातींची अचूक संख्या मोजण्यासाठी या संशोधकांनी एका अत्याधुनिक उपकरणाची निर्मिती केली असून,या अभिनव संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत पेटंट मंजूर करण्यात आले आहे.या घवघवीत यशामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील संशोधन क्षमतेला नवे बळ मिळाले असून,संपूर्ण देशभरातून या चमूचे कौतुक होत आहे असे आहे
संशोधकांनी विकसित केलेले हे उपकरण "ॲनिमल स्पेस पॉप्युलेशन ट्रॅकिंग डिव्हाइस" या नावाने नोंदणीकृत करण्यात आले आहे.


याचा डिझाइन नोंदणी क्रमांक ४८६५१२-००१ असा आहे.या उपकरणाची नोंदणी ७ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली होती, तर नुकतेच १६ एप्रिल २०२६ रोजी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून या उपकरणासाठीचे अधिकृत प्रमाणपत्र (पेटंट) जारी करण्यात आले आहे.या महत्त्वपूर्ण संशोधनात अ.नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील सुपुत्र आणि सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे युवा शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी रणजित रावसाहेब राऊत यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे.
त्यांच्यासोबतच त्यांचे संशोधन मार्गदर्शक तथा प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.जी.डी.सूर्यवंशी,लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अनिल रामचंद्र कुऱ्हे,संगमनेर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.रूपेंद्र विनायक भागडे,पाटोदा येथील वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.प्रेमचंद सिरसट तसेच छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.रफिक झकारिया महिला महाविद्यालयाचे संशोधक विद्यार्थी योगेश बिडवे आणि अंकुश अंभोरे यांचा या संशोधन चमूमध्ये समावेश आहे.हे उपकरण प्राण्यांची जंगलातील उपस्थिती, त्यांची हालचाल आणि त्यांची अचूक संख्या मोजण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते.जंगल,नदीकाठचे भाग,कृषी क्षेत्र तसेच जेथे मानव-वन्यजीव संघर्ष वारंवार उद्भवतो,अशा ठिकाणी याचा वापर अत्यंत प्रभावी ठरणार आहे.प्राण्यांची गणना करण्याच्या पारंपरिक पद्धतींमध्ये लागणारा मोठा वेळ आणि मनुष्यबळ या उपकरणामुळे वाचणार असून,अतिशय जलद आणि अचूक माहिती प्रशासनाला मिळणार आहे.
सध्या महाराष्ट्रासह देशभरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे.या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण,जैवविविधता नोंदणी,पर्यावरणीय अभ्यास आणि शाश्वत विकास यासाठी हे उपकरण वन विभाग,प्रशासन आणि अभ्यासकांसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन ठरणार आहे. मराठवाड्या सारख्या भागातून विकसित झालेले हे उपकरण आणि त्याला मिळालेले राष्ट्रीय पातळीवरील पेटंट हे स्थानिक संशोधकांची गुणवत्ता आणि अफाट मेहनतीचे द्योतक आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी,योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही.कानेटकर,सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक वृंदानी या संशोधक चमूचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रातील या मोठ्या कामगिरीबद्दल 'दैनिक झुंजारनेता'परिवाराच्या वतीनेही सर्व संशोधकांचे हार्दिक अभिनंदन!
0 टिप्पण्या