Ticker

6/recent/ticker-posts

नात डॉक्टर झाली, आज्जीच्या कष्टाचे चीज झाले, कडा प्रा.आ.केंद्रात रंगला भावुक प्रसंग

आष्टी (प्रतिनिधी) 'दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व आणि अदम्य साहस असल्यावर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.' या वाक्याची प्रचिती नुकतीच बीड जिल्ह्यात आली. स्वतःच्या नातीने डॉक्टर व्हावे, यासाठी जिवापाड मेहनत घेणाऱ्या एका आज्जीच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने झाले आहे.ज्या नातीला खेळवले,वाढवले आणि जिच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस एक केले. लातूर शहरात नातीच्या शिक्षणासाठी सलग चार वर्ष खोली करून त्या राहिल्या अशा या आज्जीच्या कष्टाचे चीज झाले. त्याच नातीकडून वैद्यकीय उपचार घेण्याचा एक अत्यंत भावुक आणि सुखावह प्रसंग नुकताच कडा येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळाला.आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांची कन्या डॉ.शिवानी हिने हा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे.उत्तम बोडखे हे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या पत्नी सौ. बबीता या शिक्षिका आहेत.घरातील उत्तम संस्कार आणि गुरुजनांची शिकवण या शिदोरीवर डॉ. शिवानी हिने जिल्हा परिषद शाळेतून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. आष्टी येथील पंडित नेहरू माध्यमिक विद्यालयात ९ वी. पर्यंत शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी शिवानी आष्टीहून लातूरला गेली.येथे शाहू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.या खडतर प्रवासात तिची आज्जी रंगुबाई तिच्यासोबत राहून प्रचंड परिश्रम घेतले.आपली नात मोठी डॉक्टर व्हावी, हे एकच स्वप्न आज्जीच्या डोळ्यात होते.या कष्टाला यश आले आणि शिवानी 'नीट' परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन 'एमबीबीएस' डॉक्टर झाली. कर्तव्यावर हजर आणि स्वप्नपूर्तीचा तो क्षण ------------------ गेल्या काही महिन्यांपूर्वीच डॉ. शिवानी यांची कडा येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच,प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांच्या घरात सून म्हणून त्या नुकत्याच विवाहबद्धही झाल्या आहेत. मंगळवारी कडा येथील रुग्णालयात एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. ज्या आज्जीने शिवानीला घडवण्यासाठी त्याग केला,त्याच आज्जी उपचारासाठी रुग्णालयात आल्या होत्या आणि त्यांच्यावर उपचार करणारी डॉक्टर दुसरी कुणी नसून त्यांचीच लाडकी नात होती. आज्जीच्या मांडीवर खेळलेल्या नातीने आज स्टेथोस्कोप लावून आज्जीची तपासणी केली, तेव्हा अनेक वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याचा तो क्षण अत्यंत आल्हाददायक आणि उपस्थितांचेही डोळे पाणावणारा ठरला. चौकट --------- नातीकडून उपचार घेताना हृदय भरून आले! --------- शिवानी लहानपणापासूनच संस्कारक्षम, शांत, मितभाषी आणि अत्यंत हुशार मुलगी आहे. तिने मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पाळली. आज तिला वैद्यकीय अधिकारी म्हणून खुर्चीवर बसलेले पाहताना आणि तिच्याकडून उपचार घेताना मला मनस्वी समाधान वाटले. माझ्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले,अशी अत्यंत भावुक प्रतिक्रिया आज्जी रंगुबाई बोडखे यांनी यावेळी व्यक्त केली. तर ज्या आज्जीने माझ्यासाठी एवढे कष्ट उपसले, तिचीच आज वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मला मिळाली, यातच मी स्वतःला कृतकृत्य मानते अशा शब्दांत डॉ. शिवानी बोडखे- विधाते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या