Ticker

6/recent/ticker-posts

मराठवाड्याची कन्या मराठी विषयात राज्यात प्रथम! ----------------- ग्रामीण भागातील जयश्री पाटील हिची गरुडझेप; १०० पैकी ९९ गुण मिळवत रचला इतिहास

उत्तम बोडखे,आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कु.जयश्री देविदास पाटील हिने मराठी विषयात १०० पैकी तब्बल ९९ गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिच्या या ऐतिहासिक यशामुळे मराठवाड्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून,राज्यभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.छत्रपती संभाजीनगर विभागातून परीक्षा देणारी कु.जयश्री पाटील ही जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील'शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर'ची विद्यार्थिनी आहे.अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या आणि आपली मातृभाषा असलेल्या 'मराठी'विषयात तिने हे उत्तुंग यश प्राप्त केले आहे.या यशात तिला तिचे विषय शिक्षक डॉ.डी.बी.पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जयश्रीच्या या उज्वल आणि प्रेरणादायी यशाबद्दल 'महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघा 'च्या वतीने तिचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा.सुनील डिसले,कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे,डॉ.मनीषा रिठे,राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने,जालना जिल्हा प्रतिनिधी डॉ.राजेंद्र सोनवणे,प्रा.प्रवीण भुतेकर यांच्यासह बीड जिल्हाध्यक्ष डॉ.आत्माराम झिंजुर्डे,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक देवगुडे,बीड जिल्हा सचिव प्रा. बिभिषण चाटे तसेच राज्यातील सर्व मराठी विषय शिक्षकांनी जयश्रीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ---------------- मराठी भाषेचा मराठवाड्यातून फडकवला झेंडा! चौकट --------- आपली मातृभाषा असलेल्या 'मराठी' विषयात मराठवाड्याच्या लाल मातीतील आणि एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने १०० पैकी ९९ गुण प्राप्त करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे,ही बाब मराठवाड्यासाठी अत्यंत भूषणावह आणि अभिमानास्पद आहे. मराठी भाषेचा झेंडा राज्यात मानाने फडकवून जयश्रीने एक नवा इतिहास निर्माण केला आहे.तिच्या या ऐतिहासिक यशाचा आम्हांला सार्थ अभिमान आहे,अशी गौरवोद्गार भावना बीड जिल्हाध्यक्ष डॉ.आत्माराम झिंजुर्डे,कार्याध्यक्ष डॉ.अशोक देवगुडे आणि सचिव प्रा.बिभिषण चाटे यांनी व्यक्त केली. --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या