
आष्टी (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ.कमलाकर राऊत यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या 'राष्ट्रभाषा पंडित' पदवी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
सुरुवातीला कारखान्यात कामगार म्हणून काम केल्यानंतर, त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. १९९७ मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले आणि एम.ए.,एम.एड.,नेट, पीएच.डी.,तसेच सी.टी.ई.टी. सारख्या अनेक उच्च पदव्या प्राप्त केल्या. डॉ.राऊत यांची ३ पुस्तके, ४३ शोधनिबंध आणि ५०० हून अधिक लेख व कविता प्रकाशित आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांना केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपती पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आपण ज्या शाळेत शिकलो, तिथेच ज्ञानदान करण्याची संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी व्यक्त केले.सतत शिकत राहिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते अशी त्यांची धारणा आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव,शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
--------------
0 टिप्पण्या