आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तहसिल कार्यालयात आपल्या कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ आणि प्रामाणिक कार्यशैलीने सर्वसामान्यांसह सहकाऱ्यांची मने जिंकणारे नायब तहसीलदार भगीरथ धारक हे नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या मातोश्रींचे अलीकडेच निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर,तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी 'धारक यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी प्रामाणिकपणे जनसेवा केली'असे गौरवोद्गार तहसीलदार वैशाली पाटील यांनी काढले.

या निरोप समारंभात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगीरथ धारक यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.धारक हे अत्यंत शांत,प्रेमळ आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे अधिकारी होते.त्यांनी कार्यालयातील प्रत्येक टेबलावरील जबाबदारी तितक्याच उत्कृष्टपणे पार पाडली आणि कोणत्याही नागरिकाची अडवणूक केली नाही,अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.यावेळी बोलताना तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या की,भगीरथ धारक यांनी नेहमीच अत्यंत प्रामाणिकपणे काम केले.मी कामानिमित्त बाहेरगावी किंवा बैठकीत असताना,फोनवरून सांगितलेली कामे त्यांनी तातडीने मार्गी लावली.आपला आष्टी तालुका विस्ताराने खूप मोठा आहे,नागरिक दूरवरून आपल्याकडे कामासाठी येतात, त्यामुळे त्यांचे काम झालेच पाहिजे,हा त्यांचा सहकाऱ्यांना दिलेला कानमंत्र त्यांच्यातील खऱ्या जनसेवकाची प्रचिती देतो.
सत्काराला उत्तर
देताना धारक भावुक
------------
सेवानिवृत्तीनिमित्त नायब तहसीलदार भगीरथ धारक आणि त्यांच्या पत्नी सौ.मीरा धारक यांचा तहसीलदार वैशाली पाटील व नायब तहसीलदार अश्विनी पांडुळे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या सत्काराला उत्तर देताना भगीरथ धारक भावुक झाले होते.ते म्हणाले,"महसूल विभागात काम करताना मी केवळ नोकरी न करता अतिशय मनापासून सेवा केली.हे करत असताना अधिकाधिक माणसं जोडण्यावर माझा भर राहिला. त्यामुळेच माझ्या मुलीच्या साखरपुड्याला आणि नुकत्याच झालेल्या माझ्या आईच्या अंत्यविधीला तालुक्यातील नागरिक, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी जी मोठी उपस्थिती दर्शवली, तीच मी माझ्या प्रामाणिक कामाची खरी पावती मानतो."याप्रसंगी सहाय्यक महसूल अधिकारी नवनाथ सोनटक्के,जयदत्त चव्हाण,महसूल सहाय्यक दिलीप गालफाडे, संजय बहिरवाल,गजेंद्र धारक सर,गारुळे,अशोक धोंडे,वाघमारे मॅडम,वीर मॅडम,लिपिक गोरे,ठाणगे,निमसे, लोखंडे,सानप, जाधव,सुशील शिंदे,सुशील क्षीरसागर,अक्षय बोंदार्डे, जायभाय,गुप्ता,मीरा नजान,धोंडे मॅडम,काळे मॅडम,गर्जे मॅडम,पिंपळे मॅडम,भवर आणि शरद मेंगडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
------------------
0 टिप्पण्या