आष्टी (प्रतिनिधी)
गेल्या २६ वर्षांची ३१ मार्च रोजीच ताळेबंद सादर करण्याची आपली गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखत आष्टी येथील 'धनश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे'ने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी नोंदवली आहे. संस्थेने या आर्थिक वर्षात ८७ कोटी ९२ लाखांचा भक्कम व्यवसाय करत तब्बल ६० लाख रुपयांचा घसघशीत निव्वळ नफा कमावला आहे.सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणि पारदर्शकता जपल्यास काय साध्य होऊ शकते, याचा उत्तम वस्तुपाठ धनश्री पतसंस्थेने घालून दिला आहे अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी दिली.
आष्टी येथील पतसंस्थेच्या मुख्य सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात संस्थेचा ताळेबंद मोठ्या अभिमानाने सादर करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण सुरतवाले, सचिव जितेंद्र शिंदे,

कडा शाखेचे शाखाधिकारी रमेश बोराडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावला
यावेळी बोलताना अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा सविस्तर आलेख मांडला.
चेअरमन रंगनाथ धोंडे म्हणाले की, २०२५-२६ अखेरीस पतसंस्थेचा एकूण व्यवसाय ८७ कोटी ९२ लाख १४ हजार २५४ रुपयांवर पोहोचला आहे. सभासद व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर पतसंस्थेने ४८ कोटी ५८ लाख ५२ हजार २१२ रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. तर, गरजू आणि होतकरू व्यावसायिकांना ३९ कोटी ३३ लाख ६२ हजार ४२ रुपयांचे सुरक्षित कर्जवाटप करण्यात आले आहे.याशिवाय संस्थेची सुरक्षित गुंतवणूक १८ कोटी ६५ लाख ४६ हजार ७६७ रुपये असून, संस्थेचा स्वतःचा निधी (स्वनिधी) आता ५ कोटी ३८ लाख २७ हजार ४९७ रुपयांच्या भक्कम स्थितीत पोहोचला आहे. याच भक्कम आर्थिक पायावर संस्थेने यंदा ६० लाखांच्या नफ्याला गवसणी घातली आहे.
सामाजिक बांधिलकीची जाणीव
---------
केवळ आर्थिक नफेखोरी नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे भानही संस्थेने गेल्या २६ वर्षांत जपले आहे. सहकार क्षेत्रात काम करताना शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर संस्थेचा नेहमीच भर राहिला आहे. विशेषतः वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर 'वृक्षलागवड व संवर्धन' मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी संस्थेने दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय असल्याचेही चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी यावेळी नमूद केले.
चौकट
--------
आर्थिक शिस्तीचा उत्तम नमुना
--------------
गेल्या २६ वर्षांपासून आम्ही ३१ मार्चलाच अचूक ताळेबंद सादर करण्याची परंपरा निष्ठेने जपली आहे. पतसंस्थेची आर्थिक शिस्त अतिशय उत्तम असून, वसुलीवर दिलेल्या विशेष भरामुळे संस्थेची थकबाकी केवळ २ टक्के आणि 'एनपीए' ३ टक्के इतकाच मर्यादित ठेवण्यात आम्हाला यश आले आहे.पतसंस्थेचा सिडी रेशो' ६८ टक्के तर 'सीआरएआर' २८ टक्के असा अत्यंत मजबूत आहे. ठेवीदार, कर्जदार आणि सभासदांनी आमच्या पारदर्शक कारभारावर जो अढळ विश्वास दाखवला, त्याच्याच बळावर संस्थेची ही अखंड प्रगती शक्य झाली आहे.
--जितेंद्र शिंदे
(सचिव,धनश्री पतसंस्था,आष्टी)
-----------------
0 टिप्पण्या