गहिनीनाथगडाच्या ९४ व्या. नारळी सप्ताहाची आज भव्य सांगता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती ------------------------------- महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार समारोप; १५० एकरांवर लोटला भक्तीचा सागर
आष्टी (प्रतिनिधी)
संत वामनभाऊंचे समाधीस्थान असलेल्या आणि वारकरी संप्रदायाचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या गहिनीनाथगडाच्या ९४ व्या.पारंपरिक नारळी सप्ताहाची आज गुरुवार दि.९ एप्रिल रोजी आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे मोठ्या उत्साहात सांगता होत आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित काल्याच्या कीर्तनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.तब्बल १५० एकर परिसरामध्ये हा भव्य धार्मिक सोहळा विस्तारला असून संपूर्ण पंचक्रोशीत भक्तीचे उधाण आले आहे.मठाधिपती महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज शास्त्री गहिनीनाथगडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली २ एप्रिल २०२६ पासून हा नामयज्ञ सुरू होता.आज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत स्वतः महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन पार पडेल.या अमृततुल्य कीर्तनाचे श्रवण करण्यासाठी आणि भाविकांच्या या मेळ्याला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे.
२५ क्विंटल गुलाबजामुनची
महापंगत ठरली लक्षवेधी
----------------
गेल्या आठवडाभरापासून म्हसोबाचीवाडी येथे वारकरी आणि भाविकांचा अलोट जनसागर लोटला आहे.विशेष म्हणजे,या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनानिमित्त भाविकांसाठी तब्बल २५ क्विंटल गुलाबजामुनची महापंगत आयोजित करण्यात आली होती,जी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरली.या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा भजन,विष्णू सहस्त्रनाम,गाथा भजन,हरिपाठ,प्रवचन आणि रात्री हरिकीर्तन व जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.या ज्ञानयज्ञात ह.भ.प. केशव महाराज नामदास,लक्ष्मण महाराज मेंगडे,अमृत महाराज जोशी,आदिनाथ महाराज शास्त्री,संजय महाराज पाचपोर,जयवंत महाराज बोधले आणि ज्ञानेश्वर महाराज शिंदे या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवा रुजू केली.त्यांच्या कीर्तनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.आज दुपारी १२ वाजता काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप केले जाईल आणि या ज्ञानयज्ञाची अधिकृत सांगता होईल.
म्हसोबाचीवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या सप्ताहासाठी महिनाभरापासून अथक परिश्रम घेतले आहेत.आज होणाऱ्या या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याची सांगता डोळे भरून पाहण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन म्हसोबाचीवाडी ग्रामस्थ आणि संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------
0 टिप्पण्या