
चौकट
-----------
आष्टी,पाटोदा,शिरूर का.तालुक्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले डॉ.अजय भीमराव धोंडे..सक्षम वारसा यशस्वी आणि विकासाभिमुख राजकीय कारकीर्द माजी आ.भीमराव धोंडे यांनी पूर्ण केली.शिक्षण,सहकार,कृषी,राजकीय, सामाजिक व धार्मिक अशा विविध क्षेत्रांत आपले मोठे योगदान देऊन धोंडे परिवाराने लोकसेवेची जबाबदारी पार पाडली.आता माजी आ.भीमराव धोंडे यांचा हाच सक्षम वारसा त्यांचे सुपुत्र डॉ.अजयदादा धोंडे तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने पुढे चालवत आहेत.संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात बापाच्या प्रेमाचे आणि लेकरासाठी खस्ता खाण्याचे जे यथार्थ वर्णन केले आहे,त्याची प्रचिती धोंडे परिवाराच्या वाटचालीकडे पाहिल्यावर येते.बापाची लेकरावर जिवापाड माया असते; मुलाने यशाचे शिखर गाठावे यासाठी स्वतःचे जीवन वेचण्याची तयारी पित्याची असते.आजच्या जागतिकीकरणाच्याकाळातही मुलांवर केवळ स्वतःच्या इच्छा न लादता,त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना बळ देण्याचे काम माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.याच संस्कारांच्या मजबूत पायावर आज डॉ.अजयदादा धोंडे यांचे आश्वासक युवा नेतृत्व उभे आहे.लहान वयापासूनच आई-वडील आणि आजी-आजोबांचे शांत,शिस्तबद्ध आणि जबाबदारीचे संस्कार घेत डॉ. अजयदादांची जडणघडण झाली आहे.या परिसरातील गोरगरीब,दीनदलित,अपंग,ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्याचे काम ते तळमळीने करत आहेत.वडील शिक्षण महर्षी,संयमाचा सागर असलेले माजी आ.भीमराव धोंडे यांच्या समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या संस्कारक्षम तालमीत तयार झालेले हे युवा नेतृत्व आज आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे.डॉ.अजय धोंडे हे उच्चशिक्षित आहेत.त्यांनी पुण्यासारख्या विद्येच्या माहेरी राहून केवळ शिक्षणच घेतले नाही,तर खेळाची आवडही जोपासली आहे.पीएचडी (Ph.D.)पदवी संपादन करून त्यांनी समाजकारण आणि राजकारणात सक्रिय उडी घेतली आहे.वडिलांचा शांत,संयमी स्वभाव अंगीकारत त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले आहे.मतदार संघात फिरून गाठीभेटी घेणे,सभा,बैठका,मेळाव्यांमधून युवकांशी संवाद साधत त्यांनी स्वतःचे नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्य सिद्ध केले आहे.
------------------
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते म्हणून काम करताना डॉ.अजयदादांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांच्यासह वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आष्टी,पाटोदा आणि शिरूर का.तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर विकासाची गंगा आणण्यात अजयदादांचा खारीचा वाटा आहे.माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कार्यकाळात झालेले कोट्यवधी रुपयांचे रस्ते आणि विकासकामे आजही जनतेच्या स्मरणात आहेत आणि या प्रक्रियेत अजयदादांचा सकारात्मक सहभाग राहिला आहे.धोंडे परिवार धार्मिक आणि सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असतो.महाराष्ट्राचे आराध्य दैवत संत वामनभाऊ आणि महादेवाचे परमभक्त असलेल्या या परिवाराने सर्व जाती-धर्म आणि पंथांना सोबत घेऊन समतेचा विचार कृतीत उतरवला आहे.सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना योग्य दिशा देणे आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे हाच अजयदादांचा ध्यास आहे.
आष्टी,पाटोदा,शिरूर का.या विधानसभा मतदार संघात गेल्या काही वर्षांत एका नव्या,आश्वासक आणि विकासाभिमुख युवा नेतृत्वाचा उदय झाला आहे.जनतेशी असलेली घट्ट नाळ आणि सातत्यपूर्ण कार्यातून ज्यांनी जनमानसात आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे असे विश्वासाचे नाव म्हणजे डॉ.अजय भीमराव धोंडे !
माजी आ.भीमराव धोंडे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या घरात जन्मल्याने राजकारणाचा वारसा त्यांना साहजिकच लाभला. मात्र,या वारशाला केवळ सामावून न घेता,त्याला स्वतःची कार्यतत्परता,जनसेवेची निष्ठा आणि आधुनिक विचारांची जोड देत डॉ.अजय यांनी आपले स्वतंत्र,ठळक आणि तितकेच प्रभावी नेतृत्व उभे केले आहे.त्यांचा हा प्रवास केवळ राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित नसून,तो खऱ्या अर्थाने सर्वांगीण सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श नमुना ठरत आहे.
जनतेशी थेट संवाद
आणि अभ्यासू दृष्टिकोन
----------------
डॉ.अजय धोंडे यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा तळागाळातील लोकांशी असलेला थेट संपर्क.आष्टी परिसरातील अगदी छोट्या वाडी-वस्तीपासून ते शहरापर्यंत त्यांनी संवादाची एक अनोखी परंपरा निर्माण केली आहे.गावोगावी जाताना ते केवळ औपचारिकता न पाळता, शेतकरी,महिला,विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या समस्या अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतात व त्या सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करतात.
कोणत्याही प्रश्नावर मत मांडताना त्यामागे त्यांची ठोस माहिती,आकडेवारी,वास्तव परिस्थितीचा अभ्यास असतो. या अभ्यासू वृत्तीमुळेच त्यांच्या नेतृत्वाला एक भक्कम बौद्धिक आधार लाभला आहे.मतदार संघातील पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची उभारणी आणि आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विकास कामांना गती मिळाली आहे.
युवा सक्षमीकरण आणि
शैक्षणिक चळवळ
----------------
'युवक हा समाजाचा कणा आहे'यावर डॉ.अजय यांचा ठाम विश्वास आहे म्हणूनच युवकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी क्रीडा स्पर्धा,करिअर मार्गदर्शन शिबिरे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा यांसारखे अनेक स्त्युत्य उपक्रम राबवले आहेत.त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक तरुण प्रेरित होऊन समाजकारणात सक्रिय होत आहेत.शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. 'शिक्षण हेच खरे सामर्थ्य'या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ज्ञानगंगेचा प्रवाह अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालवले आहेत.
सामाजिक बांधिलकी
आणि माणुसकीचा झरा
-----------------
राजकारणापलीकडे जाऊन डॉ.अजय यांनी सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवला आहे. रक्तदान शिबिरे,मोफत आरोग्य तपासणी,स्वच्छता अभियान आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना थेट मदत करण्यात ते नेहमीच पुढे असतात. संकटाच्या काळात धावून जाणारा नेता,हीच त्यांची खऱ्या अर्थाने ओळख बनली आहे.याशिवाय,आपल्या मातीतील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांशीही त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे.गावोगावच्या यात्रा,उत्सव,हरिनाम सप्ताह, कीर्तन आणि भजनांच्या कार्यक्रमांत ते आवर्जून उपस्थित राहतात.यातून समाजात एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लागावा,हाच त्यांचा प्रामाणिक हेतू असतो.
साधेपणा हेच
खरे बलस्थान
---------------
डॉ.अजय धोंडे यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा साधेपणा आणि माणुसकीचा दृष्टिकोन.पैसा,पद किंवा प्रतिष्ठेचा लवलेशही त्यांच्या वागण्यातून जाणवत नाही.आपुलकीने आणि सहजतेने ते कोणाशीही संवाद साधतात,त्यामुळेच सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतो आणि आपल्या हक्काचा माणूस मानतो.
आज,९ एप्रिल रोजी डॉ.अजय धोंडे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वातून मतदार संघाला विकासाची नवी दिशा मिळेल आणि ते उद्याचे एक अत्यंत सक्षम नेतृत्व म्हणून राज्याच्या पटलावर उभे राहतील असा विश्वास जनतेला वाटत आहे.एका कोऱ्या पाटीसारखा स्वच्छ आणि तेजस्वी चेहरा असलेल्या या उदयोन्मुख युवा नेतृत्वाचा आज दि.९ एप्रिल अभिष्टचिंतन दिन आहे.डॉ.अजयदादा धोंडे यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने शुभेच्छा!
लेखक
----
उत्तम बोडखे उपसंपादक,
दैनिक झुंजारनेता,आष्टी.
-----------------
0 टिप्पण्या