Ticker

6/recent/ticker-posts

पाथर्डीच्या कोल्हेश्वरी यात्रेत रंगला कुस्तीचा थरार; पैलवान ओमकार आंधळेने पटकावली मानाची गदा! ---------------- परराज्यातील मल्लांच्या निकाली कुस्त्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने ------------- महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

आष्टी (प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील ग्रामदैवत माता कोल्हेश्वरी देवीचा तीन दिवसीय यात्रा उत्सव यंदाही मोठ्या भक्तीमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या जंगी कुस्तीच्या मैदानात आष्टी येथील बाबाजी कुस्ती संकुलाचा आणि महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांचा पठ्ठ्या,पैलवान ओमकार आंधळे याने अत्यंत चित्तथरारक खेळी करत मानाची गदा पटकावली. दि.५ एप्रिल २०२६ रोजी सुरू झालेला हा यात्रा उत्सव सलग तीन दिवस चालला.या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्तीच्या मैदानाने कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.या आखाड्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर हरियाणा,पंजाब आणि दिल्ली येथून आलेल्या नामांकित मल्लांनी हजेरी लावली होती.त्यांच्यात रंगलेल्या उत्कृष्ट आणि निकाली कुस्त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पैलवान ओमकार आंधळे याने. त्याने अत्यंत आक्रमक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी कुस्ती खेळत उपस्थितांची वाहवा मिळवली व मानाच्या गदेवर आपले नाव कोरले.या दिमाखदार सोहळ्यात गावाच्या वतीने विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्यानंतर चाऊस यांच्याच हस्ते पैलवान ओमकार आंधळे याला मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.इतर विजेत्या व उपविजेत्या कुस्तीपटूंना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. या कुस्ती फडासाठी पंचायत समितीचे सभापती तथा यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष संभाजीराव पालवे,राणा प्रताप पालवे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांच्यासह गावचे सरपंच,ग्रा.पं. सदस्य,यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीमय वातावरण --------------- तीन दिवस चाललेल्या या यात्रा उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.यात्रा कमिटीच्या वतीने सुरक्षेची, स्वच्छतेची आणि भाविकांच्या सोयी-सुविधांची अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध व्यवस्था ठेवण्यात आली होती.ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सहकार्यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीत्या पार पडला.उत्सवामुळे गावात निर्माण झालेले एकोप्याचे वातावरण आणि कुस्ती मैदानातील थरार यांचीच सध्या संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या