Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामविकासातील भगीरथ प्रयत्नांचा गौरव: निवृत्त उपअभियंता अशोक खेडकर यांना सरपंच परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘उत्तम प्रशासक पुरस्कार’ जाहीर

आष्टी (प्रतिनिधी) ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन प्रशासकीय सेवेत आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवणारे पाथर्डी व आष्टी (कृष्णा खोरे विभाग) येथील सेवानिवृत्त उपअभियंता अशोक भानुदास खेडकर यांना सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘उत्तम प्रशासक पुरस्कार’जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे प्रशासकीय सेवेतील एका प्रामाणिक, कार्यतत्पर आणि लोकांभिमुख अधिकाऱ्याचा यथोचित सन्मान होत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे या पुरस्काराची घोषणा केली.पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्याची सरपंच परिषदेची गौरवशाली परंपरा आहे.याच परंपरेचा भाग म्हणून यंदा इंजि.खेडकर यांची या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.प्रशासकीय अधिकारी केवळ कार्यालयात न बसता, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यात समन्वय साधून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो,याचा आदर्श खेडकर यांनी आपल्या कार्यकाळात घालून दिला. गावखेड्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम विशेष उल्लेखनीय आहेत.शासकीय योजनांची तळागाळातील प्रभावी अंमलबजावणी,सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता या सर्व बाबींची दखल घेत निवड समितीने त्यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. यशदामध्ये रंगणार दिमाखदार सोहळा ------------------ हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.या सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक ना.जयकुमार गोरे हे आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार (आदर्श गाव हिवरे बाजारचे शिल्पकार) हे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून आ.श्रीकांत भारतीय हे उपस्थित राहणार आहेत.सेवानिवृत्त उपअभियंता
अशोक खेडकर यांना हा सन्मान जाहीर झाल्यानंतर संपूर्ण आष्टी,अ. नगर,पाथर्डी तालुक्यांत आनंदाचे वातावरण आहे.या निवडीबद्दल आष्टी मतदार संघाचे आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे यांच्यासह विविध राजकीय,सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.एका निवृत्त अभियंत्याच्या कार्याचा राज्यपातळीवर होणारा हा गौरव संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.ग्रामीण विकासाच्या निरंतर वाटचालीत खेडकर यांचे हे योगदान नव्या पिढीतील अधिकाऱ्यांसाठी नेहमीच दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल,असा सार्थ विश्वास व्यक्त केला जात आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या