Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानगंगेचा अविरत प्रवाह: चिंचाळा ते अहिल्यानगर... प्राचार्य विजयकुमार पोकळे यांचा प्रेरणादायी प्रवास!

विशेष लेख ------------- उत्तम बोडखे,आष्टी. ------------------ आष्टी तालुक्यातील चिंचाळा या छोट्याशा गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, स्वकर्तृत्वाने आणि शिक्षणाच्या अफाट ध्यासाने एका नामांकित विद्यालयाच्या प्राचार्यपदापर्यंत मजल मारतो,ही खऱ्या अर्थाने एक प्रेरणादायी यशोगाथा आहे.येत्या ३० एप्रिल २०२६ रोजी प्राचार्य विजयकुमार कारभारी पोकळे हे त्यांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.त्यानिमित्ताने त्यांच्या या ३४ वर्षांच्या दैदिप्यमान शैक्षणिक प्रवासावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी टाकलेला हा विशेष दृष्टिक्षेप. -------- कष्टाची जाण आणि शिक्षणाचा भक्कम पाया ----------- दि.५ एप्रिल १९६८ रोजी आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विजयकुमार पोकळे यांचा जन्म झाला.मातीशी नाळ जोडलेली असल्याने कष्ट,जिद्द आणि प्रामाणिकपणा हे गुण त्यांच्या अंगी उपजतच होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण (१ ली ते ७ वी.) जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अहिल्यानगरची वाट धरली.८ वी.ते १० वी.पर्यंतचे माध्यमिक शिक्षण त्यांनी अहिल्यानगरच्या नामांकित रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये घेतले तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधून पूर्ण केले.एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर विद्या प्रतिष्ठान बी.एड.कॉलेज मधून त्यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक बनण्याचे आपले ध्येय निश्चित केले. दि.१५ जुलै १९९२ रोजी जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालयातून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. सलग १८ वर्षे (३१ मे २००९ पर्यंत) त्यांनी तिथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.त्यानंतरचा त्यांचा प्रवास सातत्याने प्रगतीचा आणि नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा राहिला.१ जून २००९ ते ३० सप्टेंबर २०११ ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा,१ ऑक्टोबर २०११ ते ३१ मे २०१९ श्री चांगदेव विद्यालय, नारायढोहो,१ जून २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०१९, पर्यवेक्षक, रेसिडेन्शिअल हायस्कूल, अहिल्यानगर,१ नोव्हेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२०,पर्यवेक्षक,श्रीराम विद्यालय,भानस हिवरे (ता.नेवासा) १ जानेवारी २०२१ ते ३० जून २०२१,पर्यवेक्षक,सदगुरु माध्यमिक विद्यालय,मेहेकरी या प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत १ जुलै २०२१ रोजी त्यांची नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'प्राचार्यपदी पदोन्नती झाली. ज्या शाळेत विद्यार्थी, तिथेच आज प्राचार्य! --------------- विजयकुमार पोकळे यांच्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण म्हणजे, १ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी अहिल्यानगर शहरातील ज्या नामांकित रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात' एकेकाळी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले होते,त्याच विद्यालयाची धुरा त्यांनी 'प्राचार्य' म्हणून आपल्या खांद्यावर घेतली.आजतागायत (सेवानिवृत्तीपर्यंत) ते याच पदावर अत्यंत कुशलतेने कार्यरत आहेत. यशस्वी कुटुंब: संस्कारांची शिदोरी ----------------- कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीर स्त्रीची साथ असते, या उक्तीप्रमाणे त्यांच्या पत्नी सौ. वर्षा विजयकुमार पोकळे (बी.ए. पदवीधर) यांनी घराची समर्थपणे जबाबदारी सांभाळली.याच उत्तम संस्कारांमुळे त्यांची दोन्ही मुले आज उच्चशिक्षित आणि यशस्वी आहेत.मोठा मुलगा विनीत पोकळे याने बी.एस्सी.,डी.फार्म.चे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या स्वतःचा मेडिकल व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहे तर दुसरा मुलगा डॉ.विवेक पोकळे याने मुंबईच्या नामांकित जे.जे.मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.पूर्ण केले असून,तो सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (G.M.C.) एम.एस. ऑर्थो (M.S. Ortho) चे उच्च शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणारे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांचा आज 'सेवापूर्ती गौरव' ---------------- ज्ञानदानाचे पवित्र व्रत हाती घेऊन,केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांवर सुसंस्कारांचे बीज रोवणारे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.विजयकुमार कारभारी पोकळे हे सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ,निष्ठावान आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यासाठी आज रविवार दि.५ एप्रिल २०२६ रोजी ‘सेवापूर्ती गौरव समारंभाचे’आयोजन करण्यात आले आहे. हा कृतज्ञता सोहळा रविवारी सकाळी १० वाजता विद्यालयाच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.या गौरव समारंभासाठी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे भूषविणार आहेत तर,अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रा.ह.दरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय संस्थेचे सचिव विश्वासराव आठरे पाटील,खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे,उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर,सहसचिव मुकेश मुळे यांच्यासह संस्थेचे विश्वस्त जी.डी.खानदेशे,डॉ.चंद्रराव मोरे,आ.नंदकुमार झावरे पाटील,सीताराम खिलारी पाटील आणि जयंत वाघ हे मान्यवर उपस्थित राहून प्राचार्य पोकळे सरांना शुभेच्छा देणार आहेत.गेल्या साडेतीन दशकांत प्राचार्य पोकळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे,शिस्त रुजविणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली रेसिडेन्शिअल विद्यालयाने अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये राज्याला दखल घ्यायला लावणारे घवघवीत यश संपादन केले आहे.आपल्या लाडक्या प्राचार्यांचा हा सन्मान सोहळा संस्मरणीय करण्यासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती जे.ए.दरे,उपप्राचार्य डी. जी.वांढेकर,पर्यवेक्षक बी.एम.पवार,एस.जी.सोनवणे, डी.सी.म्हस्के,सौ.व्ही.एस.दारकुंडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत,त्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी,पालकांनी आणि अहिल्यानगरच्या नागरिकांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहावे आणि पोकळे सरांच्या कार्याचा गौरव करावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आष्टीच्या मातीत जन्म घेऊन,अहिल्यानगर सारख्या शैक्षणिक दृष्ट्या प्रगत शहरात स्वतःच्या कतृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्राचार्य विजयकुमार पोकळे यांचा हा प्रवास नव्या पिढीसाठी नक्कीच दीपस्तंभासारखा आहे.त्यांच्या ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि ज्ञानदायी सेवेला मानाचा मुजरा आणि त्यांच्या भावी निवृत्ती जीवनासाठी दैनिक झुंजार नेता परिवाराच्यावतीने शुभेच्छा! लेखक - उत्तम बोडखे,आष्टी. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या