Ticker

6/recent/ticker-posts

जिथे घडलो, तिथेच सन्मान मिळणे हीच आयुष्याची खरी कमाई ------------------ आनंदराव धोंडे महाविद्यालयात माजी विद्यार्थ्याच्या भावनांनी भारावले वातावरण

आष्टी (प्रतिनिधी) "ज्या पवित्र वास्तूने मला घडवले,शिक्षणासोबतच जगण्याची दिशा दिली,त्या आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयात १६ वर्षांनंतर प्रमुख पाहुणे म्हणून उभे राहताना आज मन भरून आले आहे.ज्या गुरुजनांनी वकृत्व आणि कलेचा मंच दिला,त्यांच्याच समोर सन्मानित होणे,ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे असे भावोद्गार माजी विद्यार्थी ह.भ.प.भागचंद झांजे यांनी काढले आणि कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील वातावरण जुन्या आठवणींनी भारावून गेले. शिक्षणमहर्षी आ.भीमराव धोंडे यांचे पिताश्री 'बाबाजी' यांच्या १७ व्या.पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात हा माजी विद्यार्थी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.यावेळी त्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील संस्कार आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला दिले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी बाबाजींच्या महान कार्याचा व योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला."एक सामान्य शेतकरी असूनही बाबाजींनी आपल्या मुलांवर जे उत्तम संस्कार केले, त्याचीच प्रेरणा घेऊन आ.भीमराव धोंडे यांनी 'शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळा'ची स्थापना केली.या माध्यमातून ग्रामीण भागातील गोरगरीब,शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली झाली.याच शिक्षणगंगेत आमच्यासारखे अनेक विद्यार्थी घडले आणि आजही घडत आहेत अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की,वकृत्व स्पर्धा,
नाटक, एकांकिका,भारुड आणि क्रीडा स्पर्धांमधून महाविद्यालयानेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला.आज १६ वर्षांनंतर त्याच मंचावर उभे राहताना मित्र आणि गुरुजनांसोबतच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. या भावपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते हे होते.यावेळी विद्यार्थ्याकडून क्रीडा प्रकारांत मेहनत करून घेणारे प्रा.बाळासाहेब धोंडे, भगत,सांस्कृतिक विभागात प्रोत्साहन देणारे दिवंगत प्रा. विजयकुमार पोकळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.या कार्यक्रमाला माजी आ.भीमराव धोंडे यांनी बाबाजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.यावेळी माजी संचालक पांडुरंग गावडे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, प्राचार्य अशोक गदादे,प्राचार्य दादासाहेब काळे,उपप्राचार्य संजय धोंडे,सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक आनंदराव धोंडे कॉलेज,गंगाई फार्मसी कॉलेज, श्रीराम व कनिष्ठ महाविद्यालय, राजमाता जिजाऊ प्रशालेतील सर्व शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. चौकट ----------- ज्यांच्या हाताखाली विद्यार्थी म्हणून धडे गिरवले,त्याच गुरुजनांनी आज प्रमुख पाहुणा म्हणून केलेल्या भरभरून कौतुकाने आणि दिलेल्या आशीर्वादाने हा दिवस सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरला.'जिथे आपण घडतो,तिथेच सन्मान मिळणे' या विचाराने एका कृतज्ञतापूर्ण वातावरणात या सोहळ्याची सांगता झाली. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या