आष्टी (प्रतिनिधी)
मराठवाड्यातील अत्यंत अवर्षणप्रवण आणि कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी,पाटोदा व शिरूर का. या तालुक्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे.समुद्रात वाहून जाणारे पाणी या दुष्काळी पट्ट्याकडे वळवून या भागाला १५ ते २० टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी आष्टी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री.नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर पत्र दिले.
कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीचा
ध्यास
-------------
आष्टी,पाटोदा, शिरूर का.हे तिन्ही तालुके वर्षानुवर्षे पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत.या भागात दरवर्षी निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांना केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर शेतीसाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.या भीषण परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने कोकणातून समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते या अवर्षणप्रवण भागाकडे वळवावे, अशी संकल्पना व मागणी आ.भीमराव धोंडे यांनी शासनाकडे मांडली आहे.शासनाने या योजनेला मंजुरी दिल्यास आणि १५ ते २० टीएमसी पाणी या दुष्काळी पट्ट्यासाठी उपलब्ध करून दिल्यास,या तीनही तालुक्यातील सुमारे ३०० गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो.यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटेलच,शिवाय सिंचनाची सोय झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
पाण्याचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देतेवेळी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात अनेक मान्यवर उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,रिपाईचे तालुकाध्यक्ष
अशोक साळवे,हरिभाऊ जंजिरे,उत्तम बोडखे,पांडुरंग गावडे, सतीश झगडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.शासनाने या प्रस्तावाचा तातडीने व सकारात्मक विचार करून या अवर्षणग्रस्त भागाला न्याय द्यावा अशी अपेक्षा या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे.प्रशासनाने यावर लवकरच योग्य ती पावले उचलल्यास या भागाचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.
----------------

0 टिप्पण्या