आष्टी (प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,वंचितांचे कैवारी आणि महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या.जयंतीनिमित्त आष्टी शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.'भीम संदेश पर्व २०२६' च्या निमित्ताने सलग चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक,सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांनी शहरभर जल्लोषाचे आणि प्रबोधनाचे वातावरण निर्माण केले होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त आष्टी तालुक्यात 'जय भीम'च्या जयघोषात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.आष्टी शहरासह संपूर्ण तालुक्यात शाळा,महाविद्यालये,ग्रामपंचायत कार्यालये,विविध ठिकाणी दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आष्टी शहरातील संकल्प बुद्ध विहार येथे मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे, माजी आ.साहेबराव दरेकर,वाल्मीक निकाळजे,अरुण निकाळजे,रत्नदीप निकाळजे,सरपंच परिवंत गायकवाड,यशवंत खंडागळे, बाळासाहेब बोरुडे,
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य सुनील शिंदे,रुपेश निकाळजे यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यंदाचा रघुनाथ निकाळजे पुरस्कार ज्येष्ठ
पत्रकार अनंत हंबर्डे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सचिन रानडे, जयदीप गायकवाड यांचाही वाढदिवसानिमित्त
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.डॉ.
बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते निलध्वजारोहण करण्यात आले.आष्टी
शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा,पंडित नेहरू विद्यालय, वसुंधरा विद्यालय,संस्कृती विद्यालय,रिमिक्स इंग्लिश स्कूल,गंगुबाई धोंडे विद्यालय,जिल्हा परिषद मुलांची शाळा,आदर्श शाळा,हंबर्डे महाविद्यालय,भगवान महाविद्यालय,छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय,डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेज,अन्न तंत्र महाविद्यालय,डी.फार्मसी,बी.फार्मसी कॉलेज तसेच शारीरिक शिक्षण महाविद्यालय अशा विविध शाळा व महाविद्यालयात जयंती मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून,अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी आष्टी शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते.या जयंतीनिमित्त आष्टीत सर्वत्र उत्साह, एकात्मता आणि सामाजिक संदेशाचे वातावरण पाहायला मिळाले.फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचा जागर आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देत आष्टीकरांनी महामानवाला दिमाखदार अभिवादन केले.
या महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातील नामवंत विचारवंत, व्याख्याते आणि गायकांनी उपस्थिती लावत समाज प्रबोधन केले.ज्यामुळे या उत्सवाला एका वैचारिक महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मुख्य सोहळा
संकल्प बुद्धविहारात
-------------
आ.सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ढोल-ताशांचा गजर,आकर्षक देखावे आणि भीमगीतांनी आष्टी शहर दुमदुमले.
मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता शहरातील संकल्प बुद्धविहार येथे मुख्य जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बुद्ध वंदनेने सुरू झालेल्या या सोहळ्यात लोकनेते आणि मराठवाडा भूषण आ.सुरेश धस यांच्या हस्ते 'निल ध्वजारोहण'करण्यात आले.याप्रसंगी आष्टी परिसरातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार,पत्रकारिता,कृषी,कला क्रीडा आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,समाजसेवक विजय गोल्हार,रामभाऊ खाडे,जि.प.सदस्य सतीशआबा शिंदे,भाऊसाहेब लटपटे,यशवंत खंडागळे संतोषशेठ मेहेर, संजयशेठ मेहर, नगराध्यक्ष जिया बेग,मुर्शदपूरचे सरपंच अशोक मुळे,सभापती बद्रीनाथ जगताप आणि तहसीलदार वैशाली पाटील यांच्यासह असंख्य भीमसैनिक,बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात शिक्षणमहर्षी तथा माजी आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते निल ध्वजारोहण पार पडले.यावेळी गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शहरात विविध ठिकाणी
प्रतिमापूजन व अभिवादन
-------------
जयंतीच्या दिवशी सकाळपासूनच शहरातील विविध भागांत उत्साहाचे वातावरण होते. अद्वैतचंद्र निवासस्थानी सकाळी ९ वाजता आ.सुरेश धस यांच्या निवासस्थानी प्रतिमेचे पूजन झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,भारत मुरकुटे, अजित मुळे आदी मान्यवरांनी अभिवादन केले.
माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी १० वाजता येथे झालेल्या अभिवादन सोहळ्यात राजेंद्र धोंडे,माजी शिक्षण सभापती नियामत बेग, वाल्मीकतात्या निकाळजे, रत्नदीप निकाळजे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.अनिलभैय्या नगरात सकाळी ११ वाजता युवा नेतृत्व अभय धोंडे यांच्या हस्ते निलध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आदर्श शिक्षिका सौ.बबीता बोडखे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट कार्यावर व दूरदृष्टीवर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
लक्षवेधी भव्य मिरवणूक
आणि जनसागराचा उत्साह
-------------
भीमजयंती महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती सायंकाळी काढण्यात आलेली भव्य मिरवणूक, आष्टी शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मिरवणुकीत आकर्षक देखावे,




शिस्तबद्ध ढोल, ताशा पथके, निळ्या झेंड्यांची लक्षवेधी सजावट आणि भीमगीतांवर ठेका धरणारे तरुण पाहायला मिळाले.विविध सांस्कृतिक पथकांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण शहर निळ्या रंगात आणि उत्सवमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.या मिरवणुकीत केवळ अनुयायीच नव्हे तर सर्वसामान्य आष्टीकर नागरिकही मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.आष्टी शहरातील रात्री झालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये आ.सुरेश धस, युवा नेते जय धोंडे सहभागी झाले होते.
-----------------
0 टिप्पण्या