Ticker

6/recent/ticker-posts

समजदार माणसे समाधानी असतात ----ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु ----------------------------- सप्ताहाच्या मंडपात राजकारणाचे जोडे बाहेरच! विठ्ठलगडावर आ.सुरेश धस आणि माजी आ.भीमराव धोंडेंकडून रंधवेबापूंच्या कार्याचा गौरव

आष्टी (प्रतिनिधी) श्री क्षेत्र विठ्ठलगडावरील अखंड हरिनाम सप्ताहाचा मंडप हा असा एकमेव आहे,जिथे आम्ही सर्व जण राजकारणाचे जोडे बाहेर सोडून एकत्र येतो अशी स्पष्ट ग्वाही आ.सुरेश धस यांनी दिली.पाटोदा येथील श्री क्षेत्र विठ्ठलगड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.यावेळी आ.सुरेश धस आणि माजी आ.भीमराव धोंडे यांनी विठ्ठलगडाचे महंत ह.भ.प.रामकृष्ण महाराज रंधवेबापू यांच्या निष्काम आणि निस्वार्थ आध्यात्मिक कार्याचे भरभरून कौतुक केले.बापूंचे कार्य 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आहे असे आ.सुरेश धस यावेळी म्हणाले.उपस्थितांशी संवाद साधताना आ.सुरेश धस यांनी रंधवे बापूंच्या कार्याचा गौरव केला.ते म्हणाले की,ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापू हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वारकरी संप्रदायाचा निस्वार्थपणे प्रचार व प्रसार करत आहेत.कीर्तनासाठी एकही रुपया अथवा साधं श्रीफळ देखील न घेता ते हे महान आध्यात्मिक कार्य करत आहेत. त्यांच्या या निष्काम सेवेची नोंद थेट 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.असा हा सुपुत्र पाटोदाकरांना लाभला असून, सर्वांनी त्यांना जपले पाहिजे.आ.धस यांनी पुढे सांगितले की,रंधवेबापूंचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन लाभते. बापूंच्या सप्ताहाला दरवर्षी न चुकता उपस्थित राहण्याचा शब्द त्यांनी दिला असून,गडाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.तसेच,महाराज मंडळींनी या पवित्र व्यासपीठावरून समाजप्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने करावे,असे आवाहनही त्यांनी केले.अध्यात्म आणि कुस्तीत पाटोद्याचा झेंडा अटकेपार लागला आहे असे माजी आ.भीमराव धोंडे त्यावेळी म्हणाले यावेळी म्हणाले.समारोपाच्या कार्यक्रमात माजी आ.भीमराव धोंडे यांनी समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्तीच्या मुद्द्यावर भर दिला.समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी रंधवेबापू आपल्या कीर्तन आणि प्रवचनातून करत असलेले प्रबोधन अत्यंत मोलाचे असल्याचे ते म्हणाले. माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले श्रीक्षेत्र विठ्ठल गडाची महती अध्यात्म कार्याच्या संदर्भाने दूरवर पोहोचली आहे अत्यंत कष्टातून आणि सर्वसामान्य भाविक भक्तांच्या दूरदृष्टीतून उभारलेला हा गड निश्चितच समता बंधुत्व आणि ऐक्य या मुल्यांची जोपासना करेल हा विश्वास व्यक्त करत जनसेवेचे वृत्त आपण कशाप्रकारे चालवतो याचे विनोदी शैलीने त्यांनी उदाहरणे दिली.अध्यात्मिक वातावरणातून मानवी जीवन सुखी करण्याचे संतांचे कार्य महान असल्याचे त्यांनी सांगितले.ह.भ.प‌.रंधवेबापूंच्या या मौलिक कर्तुत्वाला त्यांनी मनापासून धन्यवाद दिले.माजी आ.भीमराव धोंडे यांनी एका सुरेख उदाहरणातून पाटोद्याच्या भूमीचे महत्त्व विशद केले. "रामकृष्ण रंधवेबापू यांनी आध्यात्मिक क्षेत्रात देशभरात आपला झेंडा रोवला आहे,तर दुसरीकडे त्यांचेच लहानपणीचे मित्र आणि सुपुत्र पैलवान बाळासाहेब आवारे यांनी कुस्तीच्या क्षेत्रात देशात नाव कमावले आहे," अशा शब्दांत त्यांनी दोघांच्याही कार्याला उजाळा दिला.राजकीय आणि सामाजिक जीवनातील वास्तवावर भाष्य करताना धोंडे म्हणाले की,राजकारण्यांना रात्री-अपरात्री लोकांचे फोन येतात आणि सर्व प्रकारच्या माणसांना सांभाळून घ्यावे लागते. गडाच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मार्मिक टोला लगावला."जो कोणी विद्यमान लोकप्रतिनिधी असतो,त्याने अशा गड आणि देवस्थानांना भरघोस आर्थिक निधी दिला पाहिजे.मी आमदार असताना या गडाला निधी दिला होता.आता जे 'विद्यमान' आमदार आहेत,त्यांनी तो देण्याची गरज आहे.मतदारांनी मला नाकारले, त्यामुळे मी आता माजी आमदार आहे आणि माजी आमदाराकडे निधी नसतो.मात्र,सुदैवाने पुन्हा संधी मिळाली, तर या गडाला आपण नक्कीच भरीव निधी देऊ असे सांगत हा हरिनाम सप्ताह अत्यंत यशस्वी केल्याबद्दल माजी आ.धोंडे यांनी पाटोदावासीयांचे आभार मानले.शेवटी,रंधवेबापूंनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी,त्यांना निरोगी आयुष्य लाभावे आणि पुढील २५ वर्षे त्यांनी असेच महाराष्ट्रभर फिरून कीर्तन-प्रवचनाद्वारे समाजप्रबोधन करत राहावे,अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.राजकीय नेत्यांच्या या दिलखुलास आणि प्रबोधनात्मक भाषणांनी सप्ताहाच्या सांगता समारंभात एक वेगळीच रंगत आणली. ---------------- समजदार माणसे समाधानी असतात --ह.भ.प.रामकृष्ण रंधवेबापु ---------------- मानवी जीवन दुर्लभ आहे.संतांचे विचार चंद्र सूर्य असेपर्यंत मानवी जीवनाला दिशा देतील.संतांचे मोठे उपकार आहेत. अशी संत सज्जनांची महती आपल्या विविध दृष्टांतातून विशद करत हुशारी वेगळी आणि चतुरपणा वेगळा यातील भेद स्पष्ट करत जी व्यक्ती हुशार त्याचा प्रपंच चांगला;
पण जी व्यक्ती समजदार असते त्यांचे जीवन सुंदर असते असे सांगत समजदार माणसे समाधानी असतात!"असे प्रतिपादन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड कीर्तनकार ह.भ.प.रामकृष्ण रंधवे महाराज यांनी आज रविवारी पाटोदा येथील विठ्ठलगडावर केले. पाटोदा शहरातील अध्यात्मिक वैभव आणि श्रद्धास्थान ठरलेल्या श्री क्षेत्र विठ्ठलगड येथे आज रविवारी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा महाराजांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी संत तुकाराम महाराजांच्या " याल तरी याल माझ्यामागे आजी देतो पोटभरी " या अभंगाचे निरूपण आणि विवेचन करताना ज्येष्ठ किर्तनकार रणदिवे बापू यांनी मौलिक मार्गदर्शन करत हजारो उपस्थित भाविक भक्तांची अध्यात्मिक भुक भागवण्याचा विशेष प्रयत्न केला.या अध्यात्मिक कीर्तन सेवा प्रसंगी बीड जिल्ह्यातील विविध नामवंत राजकीय नेते मंडळी,आमदार सुरेश धस,माजी आमदार भीमराव धोंडे,बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,ह.भ.प.दिनकरराव तांदळे, ह.भ.प.सस्ते महाराज,महेद्र गर्जे,पांडुरंग नागरगोजे,अंकुश मुंडे,नगराध्यक्ष राजू जाधव,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, सोमीनाथ कोल्हे, माजी सभापती अनिल जायभाय आदी मान्यवर उपस्थित होते.ह.भ.प.रंधवेबापू पुढे म्हणाले,जो कोणी सर्वस्व अर्पण करून निश्चित श्रद्धेने भगवंतांच्या आणि संतांच्या मार्गावरून चालेल त्याला परमार्थाची आणि भक्तीची आवड आज पोटभर मिळेल.संसारातील दुःखातून बाहेर पडून परमार्थाची वाट घालण्याची आवाहन ही त्यांनी उपस्थितांना केले आपल्या ओघवत्या शैलीने आणि वैराग्यपूर्ण विचारांनी भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानच्या भावना दिसून आल्या. माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कर्तुत्वावर बोलताना ह.भ.प.रंधवेबापू यांनी सांगितले की,कसलाही राजकीय वारसा नसताना १०० शाळा,महाविद्यालय काढणारे भीमराव धोंडे दुर्मिळ नेते आहेत.शेतमजूर,शेतकऱ्यांसाठी काम करताना या भागात पाणी तर नाही मग शिक्षण तरी पोहोचवले पाहिजे ही दूरदृष्टी त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामुळेच मुले मुली शिकल्या इंजिनियर,डॉक्टर झाल्या शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचली.श्रीक्षेत्र विठ्ठलगड या पुण्यभूमीत गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने कीर्तन भजन प्रवचन आदीसह विविध आध्यात्मिक कार्यक्रमांनी पंढरी अवतरली होती.भाविक भक्तांना संतांच्या विचार वाणीतून मिळालेले मार्गदर्शन समाधान देणारे ठरले आज काल्याच्या कीर्तनानंतर भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला. चौकट -------- भक्ती,ज्ञान आणि वैराग्याचा संगम ------------------ श्रीक्षेत्र विठ्ठलगड म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा संगम असल्याच्या भावना उपस्थित जेष्ठ नेते आणि मान्यवरांनी व्यक्त केल्या विठ्ठलगडाच्या पवित्र भूमीतून संतांचे विचार निरंतर समता आणि बंधुत्वाचा तेजस्वी प्रवास करूया अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या