Ticker

6/recent/ticker-posts

सराटेवडगावच्या जानपीर यात्रेत कुस्तीचा जंगी थरार; निखील धोंडे व मनोज पवार यांची झुंज ठरली लक्षवेधी! ..... ऐक्य अन् बंधुत्वाचे दर्शन; महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांचा ग्रामस्थांकडून गौरव

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव येथील प्रसिद्ध जानपीर देवस्थानचा यात्रा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात,भक्ती आणि खेळाच्या संगमातून संपन्न झाला.दोन दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जंगी कुस्तीच्या फडाने झाली.यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलेल्या ११ हजार रुपये इनामाच्या अंतिम कुस्तीत पैलवान निखील धोंडे आणि पैलवान मनोज पवार यांच्यात अटीतटीची लढत झाली, जी शेवटी बरोबरीत सोडवण्यात आली. सराटेवडगावची ही यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी तालुक्यात श्रद्धेचे आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानली जाते.गुरुवारी रात्री जानपीर बाबांचा छबीना मोठ्या थाटात काढण्यात आला.यावेळी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या भव्य आतषबाजीने ग्रामस्थांचे डोळे दिपवले.रात्री आयोजित करण्यात आलेल्या नामांकित ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात मराठी-हिंदी लोकगीते आणि लावणीच्या नृत्याविष्काराने उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.शुक्रवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कुस्तीचा जंगी हंगाम रंगला.या फडाला महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांनी विशेष भेट दिली.यावेळी सराटेवडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा ११ हजार रुपये मानधन देऊन भव्य सत्कार करण्यात आला. अंतिम कुस्ती निखील धोंडे आणि मनोज पवार यांच्यात झाली. दोन्ही मल्ल तुल्यबळ असल्याने प्रेक्षकांच्या श्वासा रोखून धरणाऱ्या या कुस्तीची सांगता सलामीने झाली.या कुस्ती हंगामात अमृत कर्डिले,राम क्षीरसागर,नवनाथ नवसुपे,कल्याण कसाब,भरत जाधव,राजू गिते,शिवनाथ वनवे,सुनील आंधळे, राजू मस्के,बाबा आंधळे,चंदर पैलवान,शिवाजी आवारे,सर्जेराव खेडकर,विकास उगले,राजाभाऊ गायकवाड यांच्यासह अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला.याप्रसंगी ज्येष्ठ नेते शिवाजी सुरवसे,सरपंच बळीराम गिते,ज्येष्ठ कुस्तीगीर बाबा अंधाळे,अमृत कर्डीले,ओम अंधाळे तोडकर यांसह आष्टी, जामखेड व परिसरातील कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जानपीर देवस्थानच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व जाती-धर्माचे भाविक अत्यंत श्रद्धेने नतमस्तक होतात.यंदाही यात्रेनिमित्त मोठी आरास करण्यात आली होती. लहान मुलांसाठी खेळणी,पाळणे आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली.ग्रामीण संस्कृती आणि खेळाचा वारसा जोपासणाऱ्या या यात्रेची परिसरात मोठी चर्चा होत आहे. चौकट ---------- महाराष्ट्र केसरींचा सन्मान! ------------- सराटेवडगाव येथील कुस्ती हंगामाला'महाराष्ट्र केसरी' सईद चाऊस यांनी लावलेली उपस्थिती युवा मल्लांसाठी प्रेरणादायी ठरली.यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने ११ हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या