Ticker

6/recent/ticker-posts

एआय' सारख्या मायावी धोक्याशी लढण्याची ताकद 'रामचरितमानस' देईल! ---- डॉ.कुमार विश्वास यांच्या 'अपने अपने राम' कथेचा २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत भक्तीपूर्ण समारोप

उत्तम बोडखे,अहिल्यानगर -------------------- आजची तरुण पिढी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय मायावी जालात अडकत आहे.
चुकीचे व्हिडिओ (डीपफेक) आणि रोजगार हिरावून घेणाऱ्या या आधुनिक'मायावी' धोक्याशी लढण्याची ताकद'रामचरितमानस'मध्ये दडली आहे. रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत केले,याचे संशोधन केल्यास आजच्या 'एआय'च्या संकटावरही मात करता येईल,असा ठाम विश्वास प्रख्यात कवी,अभ्यासक आणि वक्ते डॉ.कुमार विश्वास यांनी व्यक्त केला. माजी आ.दिवंगत अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त काका ट्रस्टच्यावतीने,आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'अपने अपने राम' या तीन दिवसीय रामकथेचा राष्ट्रीय पाठशाळेच्या भव्य मैदानावर अत्यंत उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात समारोप झाला.तब्बल ४० हजार भाविकांच्या विराट उपस्थितीत कथेचे तिसरे पुष्प गुंफताना डॉ.विश्वास यांनी रामायणातील जीवनमूल्ये आजच्या आधुनिक संदर्भात उलगडून दाखविले.डॉ.कुमार विश्वास यांनी आद्य शंकराचार्यांचे स्मरण करत रामचरितमानसाचे महत्त्व अधोरेखित केले.ते म्हणाले,"मरिच राक्षसाने घेतलेले हरणाचे रूप,रावणाने सीतेच्या अपहरणासाठी घेतलेला साधूचा वेश किंवा खर-दूषण या राक्षसांनी युद्धात निर्माण केलेला संभ्रम,हे त्या काळातील मायावी 'एआय' तंत्रज्ञानच होते. मात्र,प्रभू रामांनी आपल्या अमोघ बाणांनी या मायाजालाचे जणू 'कोडिंग'तोडले आणि ती माया नष्ट केली.या मागच्या तंत्रज्ञानावर आजच्या पिढीने अभ्यास केल्यास,सध्याच्या एआयच्या धोक्यांचाही आपण समर्थपणे सामना करू शकतो. श्रीरामांनी कधीही देवत्व मिरवले नाही,तर एक सामान्य माणूस म्हणून जगण्यातील संकटांना कसे सामोरे जावे,याचा आदर्श घालून दिला,असे सांगून डॉ.कुमार विश्वास म्हणाले,"वनवास स्वीकारणे,काट्याकुट्यांतून मार्ग काढणे,बलाढ्य शत्रूशी लढताना वनवासी लोकांची मोट बांधणे आणि स्वतःच्या क्षमतेवर व शौर्यावर अढळ विश्वास ठेवणे,हे रामाचे गुण आजच्या पिढीने अंगीकारले पाहिजेत.जीवनात संकटे येतातच,पण हतबल न होता त्यांचा समर्थपणे सामना कसा करावा,हे रामायण शिकवते. सध्याच्या काळात माणसाची केवळ 'उपयोगिता' पाहिली जाते आणि त्यातूनच वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.माता-पिता आणि साधुसंतांची उपयोगिता मोजू नका,त्यांचे नुसते अस्तित्वच आपल्याला नवा आत्मविश्वास देते.तुम्ही आज आई-वडिलांसोबत राहिला नाहीत, तर उद्या तुमची मुलेही तुमच्यासोबत राहणार नाहीत. मोठा भाऊ पित्यासमान तर मोठी वहिनी मातेसमान मानावी. घरात देवाचे मंदिर हवे,दारूचा बार असणे हे पतनाचे लक्षण आहे.तसेच दान देताना नावाचा गाजावाजा करू नये असे मार्मिक आवाहन त्यांनी केले. भाविकांच्या डोक्यावर घेतली श्रीकृष्णाची मूर्ती -------------- कथेच्या समारोपप्रसंगी सचिन जगताप आणि आ.संग्राम जगताप यांनी सलग तीन दिवस नगरकरांना राममय करणाऱ्या डॉ.कुमार विश्वास यांचा श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती देऊन विशेष सन्मान केला.डॉ.विश्वास यांनी ही मूर्ती अत्यंत नम्रपणे स्वतःच्या डोक्यावर घेत उपस्थित भाविकांना अभिवादन केले, तेव्हा संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि 'जय श्रीराम'च्या घोषाने दुमदुमून गेला.तत्पूर्वी,देशातील नामवंत गायकांनी सादर केलेल्या भजनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.समारोपाच्या वेळी राज्याचे महसूल व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी ह.भ.प.जंगलेशास्त्री महाराज,आ. मोनिका राजळे,आ.हेमंत ओगले,भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुजय विखे,जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, मनपा आयुक्त यशवंत डांगे,मंदारबुवा रामदासी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मीक कुलकर्णी,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते,श्रीमती पार्वतीबाई जगताप,शैलजा थोरवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.काका ट्रस्ट व जगताप परिवाराच्या वतीने सुवर्णा जगताप, शितल जगताप,डॉ.वंदना फाटके आणि सर्व आयोजकांनी उपस्थितांचे स्वागत केले. ----------------- चौकट ------------- स्वतःवरील विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका! ---------------- सीता हरणानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या जटायू आणि प्रभू श्रीराम यांच्यातील हृदयस्पर्शी प्रसंग डॉ.कुमार विश्वास यांनी कथेदरम्यान सांगितला.मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर मी महाराज दशरथांना सीता हरणाची बातमी सांगू का? असे जटायूने विचारले असता,रामाने त्यास स्पष्ट नकार दिला.मी अशा पराक्रमी कुळात जन्मलो आहे की,मी रावणाचा असा वध करेन की स्वतः रावणच मृत्यूनंतर स्वर्गात जाऊन दशरथांना माझ्या पराक्रमाची गाथा सांगेन असा अढळ आत्मविश्वास रामाने व्यक्त केला.यातून प्रत्येकाने संकटाच्या काळातही 'स्वतःवरील विश्वास कधीही डळमळीत होऊ न देण्याचा'मोठा संदेश घ्यावा असे डॉ.विश्वास यांनी सांगितले. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या