आष्टी (प्रतिनिधी)
हिवरा गावाला विकासाची दिशा देणारे,सर्वसामान्यांच्या सुख-दुःखातील हक्काचा आधार आणि गावचे माजी सरपंच मुरलीधर आनंदा लगड (मुकादम) ऊर्फ सर्वांचे लाडके ‘आबा’ (वय ८७) यांचे आज बुधवार २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता निधन झाले.त्यांच्या जाण्याने हिवरा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गाव खऱ्या अर्थाने पोरके झाले आहे.दैनिक झुंजारनेताच्या माध्यमातून अशा एका व्रतस्थ आणि मातीशी नाळ जोडलेल्या नेतृत्वाला श्रद्धांजली वाहताना शब्दांनाही जडत्व येते.लगड आबांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका नावापुरते मर्यादित नव्हते, तर तो गावचा एक भक्कम आधारवड होता.अन्यायाविरुद्ध लढणारा खंबीर नेता कोणत्याही औपचारिक शिक्षणाचा वारसा नसतानाही आबांनी अन्यायाविरुद्ध नेहमीच प्रखर लढा दिला.आष्टी तालुक्यातील मोठमोठ्या नेत्यांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संपर्क होता,परंतु त्यांचे पाय कायम मातीतच रोवलेले राहिले.ग्रामपंचायतीचा कारभार असो वा गावाच्या विकासाचा प्रश्न, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवत त्यांनी अनेक वर्षे ग्रामपंचायतीचा गाडा एकहाती आणि यशस्वीपणे हाकला.तरुणांचे मार्गदर्शक आणि'किंगमेकर'युवकांवर आबांचा विशेष जीव होता.गावातील अनेक तरुणांना त्यांनी राजकारणाचे धडे दिले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांचा आत्मविश्वास किती अफाट होता,याचा प्रत्यय एका प्रसंगातून येतो.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांसमोर ठामपणे उभे राहून,"माझ्या गावातल्या युवकाला तुम्ही तिकीट द्या,निवडून आणायची जबाबदारी माझी,"असे छातीठोकपणे सांगण्याची धडाडी आबांमध्ये होती. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक तरुण नेतृत्व घडले.शेतकऱ्यांसाठीही त्यांनी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मोठे काम उभे करून अनेकांना आधार दिला.विकासाचा दूरदृष्टीकोन रोडागिरी बाबा देवस्थानाचा रस्ता असो,हिवरा-दादेगाव मार्गासाठी केलेली आंदोलने असोत,किंवा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने मिळवलेले यश असो;या प्रत्येक विकासकामावर आबांच्या नेतृत्वाचा अमिट ठसा उमटलेला आहे.आज हे सर्व सांगणारा, पाठीवर कौतुकाची थाप देणारा आणि योग्य मार्गदर्शन करणारा ‘आबा’ नावाचा आधार हरपला आहे.त्यांनी दिलेले प्रेम, घडवलेली माणसे आणि उभा केलेला मूल्यांचा आदर्श कायम गावासोबत राहील.मुरलीधर लगड 'आबा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
---- अनिल लगड
(ज्येष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष,
अहिल्यानगर पत्रकार संघ)
----------------

0 टिप्पण्या