Ticker

6/recent/ticker-posts

शौर्याचा सन्मान - केंद्र व राज्य शासनाचे विशेष सेवा पदक! --------------- शिक्षण आणि प्रशासनाचा सुवर्णसंगम! ------------- महाराष्ट्रातील 'टॉप वन'अधिकारी: पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड ३१ पदव्या,४ पीएच.डी.,६ स्पर्धा परीक्षा, ३ पुरस्कार,२ विशेष पदके,१ पुस्तक तर १५ शोधनिबंध प्रकाशित! ------------------------------ विशेष लेख ------------ उत्तम बोडखे, (वरिष्ठ पत्रकार) --------------- अत्यंत सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातून, वाड्या-वस्ती आणि तांड्यातून आपल्या प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून वाटचाल करणाऱ्या एका झोपडीतील युवकाची ही यशोगाथा आहे. प्रचंड कष्ट,मेहनत,जिद्द,चिकाटी आणि घाम गाळून शिक्षण व साहित्यातून नवे क्षितिज निर्माण करत'पोलीस अधीक्षक'पदापर्यंत त्यांनी मारलेली मजल थक्क करणारी आहे. एवढेच नाही,तर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक पदव्या संपादन करणारे आणि गरीब कुटुंबातील तरुणांसाठी साक्षात प्रेरणेचा स्त्रोत बनलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. दत्ताराम राठोड.संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या या उत्तुंग यशाचा सार्थ अभिमान आहे! डॉ.दत्ताराम जमुना उद्धव राठोड असे या शिक्षण आणि साहित्यात शिखर गाठलेल्या,यशस्वी प्रशासनातील गुणी, साहित्यिक आणि विचारवंत अधिकाऱ्याचे नाव आहे.सध्या 'पोलीस अधीक्षक' या अत्यंत जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेले डॉ.राठोड हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील एका छोट्याशा गावचे सुपुत्र असून, सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थित आहेत. एक अभ्यासू अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील 'कोहिनूर हिरा' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.त्यांनी अफाट परिश्रमातून मिळवलेल्या तब्बल ३१ पदव्या त्यांच्या अथांग शिक्षण प्रेमाची साक्ष देतात. बी.ए.,एम.ए.(मराठी,इंग्रजी,समाजशास्त्र,लोकप्रशासन, हिंदी, फिलॉसॉफी, अर्थशास्त्र,इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र,अनुवंशशास्त्र,संस्कृत आणि जर्नालिझम), एम.बी.ए.,एलएल.बी.,एलएल.एम.,पीएच.डी.(मराठी), एम.एस्सी.(भूगोल),पदवी पत्रकारिता,शिक्षणशास्त्र पदविका यांसारख्या मुख्य पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत. याशिवाय टॅक्सेशन लॉ,सायबर लॉ,इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ,लेबर लॉ, मानवी हक्क पदविका,ग्रामीण विकास पदव्युत्तर पदविका आणि प्रशासनातील नेतृत्व असा चौफेर अभ्यास त्यांनी पूर्ण केला आहे. प्रशासकीय परीक्षांमधील सातत्य -------------- केवळ पदव्या मिळवून ते थांबले नाहीत, तर प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या आणि कठीण स्पर्धा परीक्षाही त्यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या आहेत.२००६ मध्ये पोलीस उपाधीक्षक,२००७ मध्ये विक्रीकर निरीक्षक,२००८ मध्ये एसीपी/डीवायएसपी,२०१० मध्ये सहाय्यक विक्रीकर आयुक्त आणि नुकतेच २०२३ मध्ये 'युजीसी नेट'व 'सेट' (मे २०२३) परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत.प्रशासकीय व्यापातून वेळ काढत डॉ.दत्ताराम राठोड यांनी २०२३ मध्ये 'मराठी व तेलगू अनुबंध'नावाचे पुस्तक (पायगुण प्रकाशन, अमरावती) लिहिले आहे.विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे १५ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.एक उत्तम व्याख्याते,अभ्यासक आणि समुपदेशक म्हणूनही त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. सन्मान आणि पुरस्कार ----------- त्यांच्या या अफाट शैक्षणिक व प्रशासकीय कर्तृत्वाबद्दल त्यांना 'सुशीला दत्तात्रय पुरस्कार'(रामचंद्र प्रतिष्ठान, पुणे), 'ग्लोबल गोल्ड टॅलेंट ट्रस्ट राष्ट्रीय टॅलेंट पुरस्कार'(मुंबई), आणि 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५'(अमरावती) देऊन गौरविण्यात आले आहे.एकूणच,एका सर्वसामान्य झोपडीतून प्रवास सुरू करून,शिक्षण क्षेत्रातील असंख्य पदव्या संपादन करत ज्ञानसंपन्न होण्याचा ध्यास घेतलेल्या पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांचे कार्यकर्तृत्व अचंबित करणारे आहे.शिक्षण,सामाजिक संस्कृती व वैचारिक क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे. दैनिक झुंजारनेता परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा चौकट ---------
नक्षलविरोधी अभियान राबवून गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागात उल्लेखनीय सेवा बजावल्या बद्दल, २०१६ मध्ये राज्य शासनाने त्यांना'विशेष सेवा पदक' प्रदान करून सन्मानित केले आहे.तर याच अभियानांतर्गत त्यांच्या अतुलनीय शौर्याची दखल घेत,केंद्र शासनानेही त्यांना 'आंतरिक सुरक्षा पदक'बहाल करून त्यांचा विशेष गौरव केलेला आहे. चौकट -------- पदव्या,पुरस्कार आणि पदकांचे मानकरी! प्रचंड मेहनत, कष्ट आणि जिद्दीच्या बळावर पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांनी ३१ पदव्या,४ पीएच.डी., ६ स्पर्धा परीक्षा, ३ पुरस्कार,२ विशेष पदके,१ पुस्तक लेखन तर १५ शोधनिबंध प्रकाशित करण्याची किमया साधली आहे.ही अफाट उपलब्धी त्यांच्या अथक परिश्रम आणि बुद्धीकौशल्याची खरी द्योतक आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या