आष्टी (प्रतिनिधी)
ध्येय निश्चित असले आणि त्यासाठी अथक परिश्रमाची जोड असली की यश हमखास मिळते,हे आष्टी शहरातील वसुंधरा प्राथमिक विद्यालयाचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आरुष यशवंत राऊत याने सिद्ध करून दाखवले आहे.नुकत्याच झालेल्या 'जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत'आरुषने तब्बल ९९ टक्के गुण मिळवत आष्टी तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.या दैदिप्यमान यशामुळे आरुषची 'जवाहर नवोदय विद्यालय,गढी'येथे प्रवेशासाठी निश्चित निवड झाली आहे.अवघ्या पाचवीत शिकणाऱ्या आरुषने केवळ स्वतःची जिद्द,अभ्यासातील चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे.त्याचे हे यश तालुक्यातील इतर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श आणि अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.आरुषने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाची दखल घेत'सुप्रभात ग्रुप'च्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,आरुषचे आजोबा नामदेव राऊत,विठ्ठलराव बनसोडे,रामराव झांजे,पोपट घुले,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सेवानिवृत्त गटविकास अधिकारी बबनराव खंडागळे, प्रा.सुभाष रासकर,गोरख पारखे,ॲड.नवनाथ विधाते आणि बंडूआबा आजबे आदी मान्यवरांच्या हस्ते आरुषचा गौरव करून त्याचे भरभरून कौतुक करण्यात आले.ज्या शाळेत आरुषने विद्येचे धडे गिरवले,त्या वसुंधरा प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मनोज धस,मुख्याध्यापिका सीमा बोंदर्डे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आरुषचे विशेष अभिनंदन केले आहे.आरुषच्या या यशाने आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून,सध्या सर्व स्तरांतून या चिमुकल्या गुणवंतावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
----------------

0 टिप्पण्या