आष्टी (प्रतिनिधी)
मानवी जन्म हा अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल आहे.आपल्याला प्राणी नाही,तर माणूस म्हणून जन्म मिळणे हे आपले मोठे भाग्य आहे. मात्र,आजची पिढी आणि आजचा माणूस पैशाच्या आणि विचारांच्या गोंधळात इतका अडकला आहे की,तो खऱ्या अर्थाने जगणेच विसरून गेला आहे अशी खंत दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेद्र महाजन यांनी व्यक्त केली.
आष्टी जैन श्रावक संघाच्या वतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त सोमवारी दि.३० मार्च रात्री आनंदऋषी महाराज चौकात'जिंदगी ना मिलेगी दोबारा'या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.आनंद बाहेर नाही,आत शोधा सध्याच्या धावपळीच्या जीवनावर मार्मिक भाष्य करताना महाजन म्हणाले,"आजचा माणूस पैशाच्या मागे धावताना स्वतःला वेळ देत नाही.आनंद बाहेर शोधण्याऐवजी तो आपल्या आत शोधला पाहिजे.प्रत्येक दिवसाची सुरुवात जर कृतज्ञतेने केली,तर आयुष्य अधिक सुंदर बनते. आपण इतरांना दोष देण्यात वेळ घालवतो,पण स्वतःमध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करत नाही."माणसांनी जगताना तीन सूत्रे कायम लक्षात ठेवावीत: स्वतःवर प्रेम करा,इतरांना मदत करा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा.'जीवनात आपण किती दिवस जगलो यापेक्षा कसे जगलो,हे अधिक महत्त्वाचे आहे,' असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.समाजातील वाढत्या मानसिक ताणतणावाकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की,आज प्रत्येक पाच व्यक्तींमागे एक व्यक्ती मानसिक समस्यांना सामोरे जात आहे.त्यामुळे समाजात संवाद,सहकार्य आणि सकारात्मक विचारांची नितांत गरज निर्माण झाली आहे.
दीपस्तंभचे कार्य
समाजासाठी दीपगृहासारखे
------------
आ.सुरेश धस याप्रसंगी बोलताना आ.सुरेश धस यांनी यजुर्वेद्र महाजन यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले,"जैन श्रावक संघाच्या माध्यमातून आष्टीच्या पवित्र मातीत दीपस्तंभ संस्थेचे सर्वेसर्वा यजुर्वेद्र महाजन यांचे आगमन ही आष्टीकरांसाठी खरोखरच एक पर्वणी ठरली आहे.अनाथ,अपंग,तृतीयपंथी आणि कुटुंबीयांनी नाकारलेल्या, उपेक्षित जीवन जगणाऱ्या घटकांना दीपस्तंभाच्या माध्यमातून महाजन यांनी मायेचा आधार दिला आहे.ते केवळ आश्रय देत नाहीत,तर या वंचित घटकांना शिक्षण,संस्कार,आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने जगण्याची दिशा देण्याचे महान कार्य करत आहेत.महाजन यांचे कार्य इतके व्यापक आणि हृदयस्पर्शी आहे की, ते समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो.अशा समाजसेवकांची आज समाजाला नितांत गरज असून,त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा,असे आवाहनही आ.धस यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार हंबर्डे यांना
'महावीर रत्न'प्रदान
---------------
या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे आष्टी जैन श्रावक संघाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मानाचा 'महावीर रत्न'पुरस्कार.यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांना जाहीर झाला होता.कार्यक्रमा दरम्यान आ.सुरेश धस यांच्या हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अनंत हंबर्डे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मान्यवरांची उपस्थिती
या शानदार सोहळ्याला आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक सुखलाल मुथा,नगराध्यक्ष जिया बेग,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, विजयशेठ मेहेर,संजयशेठ मेहेर,अतुलशेठ मेहेर,राहुल मुथा,रवीशेठ मेहेर,आदिनाथ सानप,प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,दत्ता काकडे,उत्तम बोडखे,बाळासाहेब मेहेर,

महेश सावंत यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बोगावत यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांनी अत्यंत खुमासदार शैलीत केले, तर उपस्थितांचे आभार विजय बोगावत यांनी मानले.
----------------
0 टिप्पण्या