Ticker

6/recent/ticker-posts

असावा तर असा मुख्याध्यापक! --------------- मातकुळी बनले ज्ञानाचे आणि खेळाचे पंढरपूर' ----------------- गणित शिकवणाऱ्या अशोक डोके सरांनी घडवले राष्ट्रीय खेळाडू;आष्टीच्या मातकुळी शाळेचा राज्यात डंका

विशेष लेख ------------- उत्तम बोडखे आष्टी -- ग्रामीण भागात सुविधांची आणि शिक्षकांची वानवा असते,अशी ओरड नेहमीच ऐकायला मिळते.मात्र,इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर मात करून यशाचे शिखर गाठता येते, याचा एक जिवंत आणि प्रेरणादायी आदर्श आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने राज्यासमोर ठेवला आहे.शाळेत क्रीडा शिक्षक नाही म्हणून रडत न बसता,शाळेचे मुख्याध्यापक आणि गणिताचे शिक्षक असणाऱ्या अशोक डोके सरांनी स्वतःच क्रीडाशिक्षकाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि चक्क राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याची किमया साधली आहे.केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे,तर शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांमध्येही या शाळेने मारलेली मुसंडी राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी एक 'मॉडेल'ठरावी अशीच आहे. मुख्याध्यापकच बनले'द्रोणाचार्य' ---------------------- शाळेत अधिकृत क्रीडा शिक्षक नसताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री.अशोक डोके सर स्वतः मैदानात उतरले.गणितासारखा विषय शिकवतानाच त्यांनी संध्याकाळी ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून मैदानावर घाम गाळून सराव करून घेतला.त्यांच्या याच अफाट परिश्रमाचे फळ म्हणून शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी मल्लखांब व कुस्ती या खेळात राष्ट्रीय शालेय स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले आहे.एवढेच नव्हे तर या खेळाडूंची प्रतिष्ठित'खेलो इंडिया'साठीही निवड झाली आहे.राज्यातील एकमेव शाळा ठरण्याचा बहुमान क्रीडा क्षेत्रातील या शाळेची आकडेवारी थक्क करणारी आहे.शंभर टक्के क्रीडा गुण- इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत खेळाचे वाढीव गुण सलग दोन वर्षे मिळवून देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा ठरली आहे.११५ शासकीय प्रमाणपत्रे - यावर्षी हॉकी, नेटबॉल,हँडबॉल,कबड्डी,खो-खो अशा विविध खेळांत राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर तब्बल ११५ शासकीय क्रीडा प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत.४२ संघांचा सहभाग -१४ आणि १७ वयोगटातील (मुले व मुली) तब्बल ४२ संघ यावर्षी मैदानावर उतरले, तर ४५ विद्यार्थ्यांनी वैयक्तिक मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.या अभूतपूर्व यशाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्यावतीने बीड जिल्ह्याचे मुख्य क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर यांच्या हस्ते अशोक डोके सरांचा विशेष सत्कार करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनीही सर्वसाधारण सभेत या यशाचे कौतुक केले. शैक्षणिक गुणवत्तेतही मारली बाजी -------------- 'खेळाडूंची शाळा' म्हणून नावारूपास आलेली ही शाळा केवळ मैदानावरच नाही,तर वर्गातही 'चॅम्पियन' आहे: १०० टक्के निकाल- इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल सलग पाच वर्षे १००टक्के लागला आहे.शिष्यवृत्ती आणि कला: यावर्षी NMMS स्पर्धा परीक्षेत ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र ठरले.एलिमेंट्री चित्रकला परीक्षेत २० विद्यार्थी,तर संगीत गायन परीक्षेत ३० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.रात्र अभ्यासिका व आयसीटी लॅब-विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका,मोफत कॉम्प्युटर शिक्षणासाठी स्वतंत्र आय.सी.टी.लॅब आणि अद्ययावत ग्रंथालय उपलब्ध आहे.सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज स्कॉलरशिपची सराव परीक्षा घेतली जाते.'मुख्यमंत्री सुंदर शाळा'अभियानात झळकले नाव मातकुळीच्या या शाळेने हरित आणि सुंदर परिसराची जपणूक केली असून गेल्या वर्षी'मुख्यमंत्री सुंदर शाळा' अभियानात तृतीय क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस शाळेने पटकावले आहे. विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे विशेष उपक्रम: ----------------------------- इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ, सातवीपर्यंत मोफत गणवेश, वह्या, पुस्तके आणि शालेय साहित्य,दर्जेदार शालेय पोषण आहार आणि पिण्यासाठी फिल्टरचे स्वच्छ पाणी,ग्रामस्थ आणि व्यवस्थापनाची भक्कम साथ कोणत्याही शाळेचा विकास हा समाज आणि संस्थेच्या पाठिंब्याशिवाय शक्य नसतो.या शाळेला गावातील ग्रामस्थ आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.नुकतेच शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.संस्थेचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे आणि प्रशासनाचे मार्गदर्शन,तसेच सर्व शिक्षक वृंदाचे अहोरात्र परिश्रम यामुळे मातकुळीचे श्रीकृष्ण विद्यालय आज खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील 'ज्ञानाचे आणि खेळाचे पंढरपूर' बनले आहे.ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने राज्याला दाखवून दिले आहे की,जर नेतृत्वात धमक आणि प्रामाणिकपणा असेल,तर आभाळही ठेंगणे करता येते! --------------- मातकुळीच्या ज्ञानेश्वरी धनवे हीची राष्ट्रीय मलखांब स्पर्धेसाठी निवड ------------------ श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयात शिकणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने आपल्या अफाट क्रीडा कौशल्याच्या जोरावर राज्याच्या सीमा ओलांडत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.येथील विद्यालयाची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिची छत्तीसगड येथे होणाऱ्या नॅशनल मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाचा मार्ग सुकर झाला तो पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी स्पोटर्स अकॅडमीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय खेलो इंडिया ट्रायबल गेम्स मल्लखांब महाराष्ट्र संघ निवड चाचणी स्पर्धेतून. या स्पर्धेत ज्ञानेश्वरीने मुलींच्या गटातून दमदार कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला.तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची छत्तीसगड येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,युवा नेते डॉ.अजय धोंडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते सर,माऊली बोडखे सर,संजय शेंडे सर,संदीप ननवरे सर यांनी आपल्या शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. विद्यालयाचे प्राचार्य तथा क्रीडा मार्गदर्शक श्री अशोक डोके सर यांनी विद्यार्थिनीच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. ज्ञानेश्वरीच्या यशात महत्त्वाचा वाटा असलेल्या श्री शंभू सूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था,जामखेडचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री बबलू वस्ताद टेकाळे आणि प्रशिक्षक अमोल निमोणकर यांचेही विशेष योगदान आहे. यावेळी मातकुळी गावचे सरपंच बबनदादा डोके,उपसरपंच विशालआबा जरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील डोके,उपाध्यक्ष रवींद्रदादा पाटील,सहसचिव श्री प्रमोद माने,शाळेतील सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरीचे कौतुक केले असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. -----------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या