आष्टी (प्रतिनिधी)
राहाता तालुका शब्दगंध साहित्यिक परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष एच के तथा प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे यांच्या स्मृती निमित्ताने देण्यात येणारा एच.के.तथा हिराचंद ब्राह्मणे स्मृती साहित्य पुरस्कार कोल्हार येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शशिकांत शिंदे यांना जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती शब्दगंधचे राहाता तालुका शाखा अध्यक्ष साहेबराव तुपे व संयोजक संतोष ब्राह्मणे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक,नामवंत विचारवंत,प्राचार्य एच के तथा हिराचंद ब्राह्मणे यांच्या निधनानंतर मागील वर्षापासून शब्दगंध राहाता तालुका शाखेच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येत असून मागील वर्षी लोणी प्रवरा येथील कवी साहित्यिक यशवंत पुलाटे यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.यावर्षी समितीने प्रा.शशिकांत शिंदे यांची निवड केली आहे.प्रा.शशिकांत लक्ष्मण शिंदे हे पेमराज सारडा महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या असून त्यांचे आठवणींच्या कविता, शरणागताचे स्तोत्र,ताटातुटीचे वर्तमान हे काव्यसंग्रह आनंदाचं झाड,मनात राहणारे (ललितगद्य संग्रह) इ.पुस्तके प्रकाशित आहेत.यापूर्वी त्यांना पद्मश्री विखे पाटील नवोदित साहित्यिक प्रकाशन पूर्व पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण सह्याद्री साहित्य पुरस्कार,तुका म्हणे साहित्य पुरस्कार यासह इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.त्यांच्या "माणूसपण गारठलंय" या कवितेचा सन २००८ ते २०१७, इयत्ता सातवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात समावेश झालेला आहे.भिमाई प्रतिष्ठान व सम्यक साधना संघ च्या वतीने एच.के. ब्राह्मणे स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शिक्षक जी.ए.पठाण सर यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी तर के. डी.सातपुते स्मृती जीवनगौरव पुरस्कार भास्कर साळवे तथा कमलवीर प्रज्ञारत्न यांना त्यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यासाठी देण्यात येणार आहे.माजी आ.लहू कानडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.



शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.रविवार दि.२९ मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमास शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर,अशोकराव गाडेकर,प्रा. डॉ.बाबुराव उपाध्ये,अशोकराव विटनोर,कैलास शिंदे, डॉ.हरिभाऊ आहेर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
0 टिप्पण्या