Ticker

6/recent/ticker-posts

कापशी फाट्याजवळ भीषण अपघात: डंपरच्या धडकेत कारला आग; माय-लेकराचा होरपळून जागीच मृत्यू

.आष्टी ( प्रतिनिधी) आष्टी-डोईठाण- अंमळनेर मार्गावर कापशी फाट्याजवळ शुक्रवारी दि.२७ मार्च रोजी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला.खडीने भरलेला हायवा (डंपर) आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत कारने अचानक पेट घेतला.या आगीत कारमधील माय-लेकराचा होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एका क्षणात हसतंखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.सौ. पुष्पा श्रीहरी पुरी (वय ५०) आणि ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २६) अशी या अपघातात प्राण गमावलेल्या मृत माय-लेकरांची नावे आहेत. १३ व्या.च्या विधीसाठी जाताना वाटेतच काळाचा घाला.या हृदयद्रावक घटनेबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले ह.भ.प.श्रीहरी पुरी यांचे मूळगाव साळेगाव (ता.केज) हे आहे.आज शुक्रवारी सकाळी त्यांच्या मालकीच्या स्विफ्ट डिझायर कारमधून त्यांच्या पत्नी सौ.पुष्पा आणि तरुण मुलगा ऋषिकेश हे दोघे गावी पाहुण्यांच्या १३ व्याच्या विधीसाठी निघाले होते.आष्टी-डोईठाण-अंमळनेर मार्गे बीडकडे जात असताना त्यांच्यावर हा भयानक प्रसंग ओढवला. मदतीचे प्रयत्न अपुरे,आगीचे रौद्ररूप कापशी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या खडीने भरलेल्या टिप्परने (क्र.एम-१६ सीडी- ७३०५) त्यांच्या कारला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की,क्षणातच स्विफ्ट डिझायर गाडीने पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आत अडकलेल्या सौ.पुष्पा पुरी आणि ऋषिकेश पुरी यांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी गाडीत अडकलेल्या माय-लेकरांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीच्या भयंकर ज्वाळांमुळे त्यांना वाचविण्यात यश आले नाही आणि दोघांचाही जागीच होरपळून अंत झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन,रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे पुरी कुटुंबावर मोठा आघात झाला असून,परिसरात शोककळा पसरली आहे.या दुर्दैवी अपघाताच्या घटनेनंतर आष्टी तालुक्यातीलच नव्हे तर बीड जिल्ह्यातील अध्यात्म क्षेत्रातील महाराज किर्तनकार प्रवचनकार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या