
आष्टी (प्रतिनिधी)
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन २०२५ अंतर्गत आणि डॉ.हरिश्चंद्र हातवटे यांच्या फेलोशिपच्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे नुकतेच एक भव्य आणि दिमाखदार बालसाहित्य व काव्यसंमेलन पार पडले.२३ मार्च रोजी 'मुकुंदराज साहित्य नगरी'च्या संकल्पनेतून साकारलेल्या या संमेलनात ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या निमित्ताने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि सुप्त कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले.'एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले.'या काव्यसंमेलनाचे अध्यक्षपद अभ्यासक्रमातील सुप्रसिद्ध कवी प्रा. सय्यद अल्लाउद्दीन यांनी भूषविले. त्यांनी 'एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले...' ही आशयघन बालकविता सादर करून संमेलनाची शानदार सुरुवात केली.आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की," कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती मनातील भावनांची सर्जनशील अभिव्यक्ती आहे.ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा दडलेली असते,अशा उपक्रमांमुळेच ती खऱ्या अर्थाने प्रकाशात येते. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच साहित्याची आवड निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.'भाजीपाल्याच्या पाटी'ने वेधले लक्षया संमेलनात आष्टी तालुक्यातील विविध शाळांमधील २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.निसर्ग,पर्यावरण, आई-वडील,शिक्षण,मैत्री आणि समाजातील बदल अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि स्वतःच्या वेगळ्या शैलीत कविता सादर केल्या.काही विनोदी तर काही प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी संमेलनात रंगत आणली.यात विशेष आकर्षण ठरले ते एका विद्यार्थिनीचे साभिनय सादरीकरण! पारंपरिक वेशभूषा करून आणि हातात 'भाजी पाल्याची पाटी' (टोपली) घेऊन तिने सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी कडकडाट टाळ्यांची दाद दिली.तिच्या निरागस अभिनयाने संमेलनाची शोभा अधिकच वाढवली.
नवोदितांना 'बालाघाटची गाणी'ची भेट बालकवींमध्ये वाचनाची आणि लेखनाची गोडी निर्माण व्हावी, नव्या पिढीची नाळ साहित्याशी जोडली जावी या उद्देशाने याप्रसंगी 'बालाघाटची गाणी' या बालकविता संग्रहाचे सर्व नवोदित कवींना वितरण करण्यात आले.या स्तुत्य उपक्रमाचे पालक व शिक्षकांनी विशेष कौतुक केले.मान्यवरांची मांदियाळी या साहित्य सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सौ.प्राजक्ताताई धस, प्रसिद्ध कवी कैलास दौंड, हनुमंत चांदगुडे,शंकर कसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संमेलनात निमंत्रित कवी म्हणून वेदिका खेडकर,वैष्णवी शिंदे,संध्या गावडे, स्वरा आंधळे, अपूर्वा झगडे,धनश्री धस,शिवानी सोले,हर्षा जगताप,अक्षय म्हस्के,संस्कृती वाळके,तृप्ती वाल्हेकर,गाथा भादवे,मयुरी भोगाडे आदींसह अनेक बालकवींनी आपल्या रचना सादर केल्या.श्रीमती काझी शबनम यांनीही स्वरचित कविता सादर केली.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी हरिश्चंद्र हातवटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक सचिन वारंगुळे यांनी केले.परिसरातील शिक्षक, पालक,साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.नवोदित कवींच्या पंखांना बळ देणारा हा उपक्रम आष्टी तालुक्याच्या शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
---------------
0 टिप्पण्या