उत्तम बोडखे,आष्टी.
-----------------
'अक्षर हाच माणसाचा खरा दागिना असतो' ही उक्ती केवळ बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता,आष्टीतील एका प्राथमिक शिक्षकाने ती आपल्या कृतीतून सार्थ करून दाखवली आहे.स्वतःला लाभलेल्या सुंदर हस्ताक्षराची देणगी हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनिल बेद्रे यांच्या या निस्सीम सेवेची दखल आता जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखकार अच्युत पालव यांच्या बहुचर्चित 'हस्ताक्षर ग्रंथात'आष्टीचे सुलेखक अनिल बेद्रे यांचा विशेष उल्लेख करत गौरव करण्यात आला आहे.आष्टी तालुक्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
२०१६ पासून अखंड ज्ञानदान
आष्टी तालुक्यातील भवरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक अनिल बेद्रे हे आपल्या दैनंदिन शालेय कर्तव्यासोबतच एक वेगळा छंद प्रामाणिकपणे जोपासत आहेत. २०१६ पासून त्यांनी 'सुलेखन व हस्ताक्षर छंद वर्ग' सुरू केला आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा सर्वत्र विश्रांतीचे वातावरण असते,तेव्हा बेद्रे गुरुजी आष्टी शहरातील आपल्या राहत्या घरी दुपारी २ ते ५ या वेळेत विद्यार्थ्यांचे वर्ग घेतात.सध्या एका वर्गात सुमारे ७० विद्यार्थी त्यांच्याकडून सुलेखनाचे बारकावे शिकत आहेत.
पत्नीची भक्कम साथ आणि ८ हजारांचा टप्पा
या ज्ञानयज्ञात अनिल बेद्रे यांना त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा अनिल बेद्रे यांचीही तितकीच खंबीर साथ लाभली आहे. सौ.शिल्पा या आष्टी येथील नामांकित'वसुंधरा विद्यालयात' शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन हस्ताक्षर वर्ग घेतात.या दांपत्याने आजवर तब्बल ३० शिबिरे घेतली असून,प्रत्यक्ष वर्गाच्या माध्यमातून ५ हजार तर ऑनलाईन माध्यमाची जोड देत आतापर्यंत एकूण ८ हजार विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
शिक्षकांसाठीही विशेष वर्ग
सुंदर अक्षराचा संस्कार केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न ठेवता,तो शिक्षकांमध्येही रुजावा यासाठी बेद्रे दांपत्य प्रयत्नशील आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबतच जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक शिक्षकांसाठीही विशेष हस्ताक्षर छंद वर्ग आयोजित केले आहेत.शिक्षकाचे अक्षर सुंदर असेल,तर उसका थेट सकारात्मक प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनावर पडतो,या हेतूने त्यांनी हा उपक्रम राबवला.
सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श
हस्ताक्षरातून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या छटा बाह्य जगावर उमटत असतात.याच जाणिवेतून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत श्री.व सौ.बेद्रे या शिक्षक दांपत्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.एका ग्रामीण भागातील शिक्षकाच्या कार्याची नोंद अच्युत पालव यांच्यासारख्या दिग्गजाने घेणे,हे त्यांच्या तपश्चर्येचे खऱ्या अर्थाने फळ आहे.या अनोख्या यशाबद्दल आणि अविरत समाज सेवेबद्दल आष्टीसह संपूर्ण जिल्ह्यातून बेद्रे दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या