Ticker

6/recent/ticker-posts

वर्षातून एकदाच अनुभवा चैतन्य सोहळा! ------------------ श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर आज फाल्गुन अमावास्येला संजीवन समाधी महोत्सव

आष्टी ( प्रतिनिधी) अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवर,आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील गर्भगिरी पर्वत रांगांमध्ये वसलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर (मायंबा) आज बुधवारी दि.१८ मार्च रोजी वर्षातून केवळ एकदाच होणार ा
'संजीवन समाधी सोहळा' रंगणार आहे.सूर्यास्तापासून ते थेट सूर्योदयापर्यंत चालणाऱ्या या अद्‌भुत आणि चैतन्यमयी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाथ भक्तांच्या वतीने प्रा.अजित इथापे यांनी केले आहे.अठरापगड जाती-धर्मांतील लाखो भाविकांचे आणि देशभरातील नाथ संप्रदायाचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या या गडावर चैतन्य मच्छिंद्रनाथांची जगातील एकमेव संजीवन समाधी आहे.हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला (फाल्गुन अमावास्या) या ऐतिहासिक समाधी सोहळ्याचे आयोजन केले जाते.कावडीने आणलेल्या गंगाजलाचा अभिषेक या पवित्र सोहळ्यासाठी राज्यभरातील नाथभक्त पैठण,काशी आणि इतर पवित्र तीर्थक्षेत्रांहून कावडीने आणलेल्या गंगाजलाने नाथांच्या समाधीवर विधीवत जलाभिषेक करतात. परंपरेनुसार बुधवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ते गुरुवारच्या पहाटेपर्यंत नाथांच्या समाधीला उटणे, सुगंधी मसाले आणि चंदनाचा लेप (उटी) लावण्याचा नयनरम्य सोहळा पार पडेल.ओल्या वस्त्रांनिशी भक्तीची सेवा या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविक स्नान करून ओल्या वस्त्रांनिशी समाधी गाभाऱ्यात प्रवेश करतात.रात्रभर चालणाऱ्या या भक्तीमय जागरानंतर, सूर्योदयापूर्वी समाधी नवीन वस्त्रांनी झाकली जाते.त्यानंतर होणाऱ्या महाआरतीने या सोहळ्याची सांगता होते आणि गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी नववर्षाचे 'मुक्तद्वार दर्शन'सुरू होते.विशेष म्हणजे,सध्या गडावर मुख्य मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही अत्यंत वेगाने आणि प्रगतीपथावर सुरू आहे ज्यामुळे गडाच्या वैभवात भर पडणार आहे.भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज या महोत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल होत असतात.त्यामुळे मच्छिंद्रनाथगडाचे विश्वस्त तथा आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समिती जय्यत तयारी करत आहे.भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खालील पदाधिकारी व ग्रामस्थ अहोरात्र परिश्रम घेत आहेत.अध्यक्ष दादासाहेब चितळे,उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, सचिव बाबासाहेब मस्के,समिती सदस्य व ग्रामस्थ,रमेश ताठे,ॲड.साहेबराव म्हस्के, नवनाथ म्हस्के,चंद्रकांत लोखंडे,शशिकांत चंदनशिव,सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के आणि समस्त नाथभक्त.संपूर्ण परिसरातील वातावरणात सध्या नवनाथांचा गजर घुमत असून,या संजीवन समाधी सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या