Ticker

6/recent/ticker-posts

संघर्षातून उभे राहिलेले विद्यार्थीप्रिय उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एम.चव्हाण सर

विशेष लेख --------- प्रा.डाॅ.जी.पी. बोडखे(मराठी विभाग प्रमुख) आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय कडा. -------------------
आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालय,कडा येथील उपप्राचार्य तथा लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ.बी.एम.चव्हाण हे आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ,समर्पित आणि यशस्वी शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचा सेवाकाल महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाची होता.कर्तृत्ववान, प्रामाणिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सरांची ओळख झाली आहे.चव्हाण सरांचा जीवनप्रवास संघर्ष, जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि ज्ञानसेवेचे उत्कृष्ट उदाहरण होय.उपप्राचार्य प्रा.डॉ.चव्हाण यांचा जन्म ३ मार्च १९६६ रोजी आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे झाला.वडील कै.मारुती खंडू चव्हाण आणि आई कै.इंद्राबाई चव्हाण या कष्टाळू व साध्या स्वभावाच्या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला.चव्हाण कुटुंब मूळचे डोंगरगण परिसरातील असले तरी परिस्थितीमुळे त्यांना शिरापूर येथे स्थायिक व्हावे लागले. त्या काळात शिरापूर गावात गट-तटाचे राजकारण बळावलेले होते.तसे आजही आहे. बाहेरगावाहून आलेल्या कुटुंबाला पारंपरिक गाव सत्ताधाऱ्यांकडून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, चव्हाण कुटुंबाने धैर्य, एकजूट आणि प्रामाणिक पणाच्या बळावर संघर्षाला तोंड दिले.अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करून त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि गावात स्वतःचे स्थान निर्माण केले.गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे परिसरातील लोकांची शिरापूर गावाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. त्यांचे भाऊ झुंबर चव्हाण यांनी १५ वर्षे सरपंच म्हणून कार्य करत गावातील गोरगरिबांना न्याय मिळवून दिला.सामाजिक बांधिलकी, लोकहिताची जाणीव आणि न्यायाची भूमिका या मूल्यांची परंपरा चव्हाण कुटुंबात रुजलेली आहे.आई इंद्राबाई या निरक्षर असल्या तरी त्यांची जीवनदृष्टी अत्यंत व्यापक होती. "पुस्तक वाचता आले नाही तरी माणसं वाचता येणे" ही त्यांची खासियत होती. त्यांनी आपल्या मुलांमध्ये प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी आणि शिक्षणाचे महत्त्व रुजवले.वडील मारुती चव्हाण यांनीही कुटुंबाच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले नाही.विशेषतः धाकटे भास्कर (प्रा.डॉ.बी.एम. चव्हाण) शालेय शिक्षणात हुशार असल्याने त्यांना पुढे शिकवण्याचा ठाम निर्णय घेतला.प्रा.डॉ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे त्यांनी अमोलक विद्यालय,कडा येथे पाचवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अकरावी ते बी.ए.पर्यंतचे शिक्षण आष्टी येथील बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात घेतले.अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे त्यांनी पदव्युत्तर व एम.फिल. शिक्षण पूर्ण केले आणि पुढे डॉ.प्रतिभा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीएच.डी.पदवी संपादन केली. ही त्यांची शैक्षणिक वाटचाल जिद्दीची आणि परिश्रमाची पराकाष्ठा दर्शवणारी आहे. तत्कालीन आष्टी तालुक्यातील राजकीय आखाड्यात शिक्षणमहर्षी माजी आ.भीमराव धोंडे यांनी अन्यायाविरुद्ध उभा केलेला लढा व शेतकरी चळवळ मोलाची होती.आजही गोरगरिब, दीन- दुबळ्या,वंचित व शेतकऱ्यांसाठी धोंडे यांचे कार्य आणि कर्तृत्व मोठे आहे.प्रामाणिकपणे चव्हाण कुटुंब हे त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहे. भाऊ झुंबर चव्हाण हे धोंडे साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत.या पार्श्वभूमीमुळे प्रा.चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात सामाजिक, राजकीय जाणीव,न्यायाची भूमिका आणि लोकाभिमुख विचार दृढ झाली.धोंडे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. १९९० साली लोकनेते मा.आ भीमराव धोंडे यांच्या प्रयत्नातून कडा येथे आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयाची स्थापना झाली.धोंडे यांच्या आशीर्वादाने महाविद्यालयात प्रा.डॉ.चव्हाण यांनी १९९१ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला. लोकप्रशासन विषयातील त्यांचे सखोल ज्ञान, अभ्यासू वृत्ती आणि अध्यापनातील ओघवती शैली यामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत, विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याची कला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांना विशेष नावलौकिक मिळाला. उपप्राचार्य प्रा. डॉ. चव्हाण यांनी लोकप्रशासन विषयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुमारे ३५ संशोधन निबंध सादर केले आहेत. त्यांच्या संशोधनकार्यामुळे विषयाच्या सैद्धांतिक व व्यावहारिक अंगांना बळकटी मिळाली आहे. तसेच चार राष्ट्रीय स्तरावरील पुस्तकांमध्ये त्यांच्या लेखांचा समावेश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर २००७,२०१३ आणि २०१७ या कालावधीत सदस्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यांनी अभ्यासक्रम रचना, सुधारणा, पेपर सेटिंग आणि विविध शैक्षणिक समित्यांवर काम करत विषयाच्या दर्जात्मक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गेल्या २० वर्षांपासून ते विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कार्यरत राहून शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले.प्राचार्य डॉ.एच.जी.विधाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाविद्यालयात राज्यस्तरीय व राष्ट्रीय परिसंवादांचे यशस्वी आयोजन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी म्हणून यशस्वी काम केले. २०२१ पासून उपप्राचार्य म्हणून त्यांनी प्रशासनिक जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने पार पाडल्या. महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत आणि संघटनात्मक विकासात त्यांचा मोठा वाटा आहे.प्रा.डॉ.चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी गुणांनी परिपूर्ण आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि कामातील सातत्य गुणांमुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करू शकले.उपप्राचार्य डॉ. बी.एम.चव्हाण यांचा जीवनप्रवास हा संघर्षातून यश मिळविण्याचा आदर्श आहे.त्यांनी शिक्षण, संशोधन आणि प्रशासन या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. सरांच्या कार्याची प्रेरणा अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या