आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील अध्यात्मिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा प्रदीर्घ वारसा जपणारे क्षेत्र शिराळ पुन्हा एकदा भक्तीच्या सागरात डुंबून गेले आहे.वै.ह.भ.प.श्री.चींभळेकर महाराज (बाबा) यांच्या कृपाशीर्वादाने आणि प्रेरणेतून शिराळ येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही भव्य'अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव,वाल्मीकी रामायण पारायण आणि लक्ष्मण शक्ती सोहळा'मोठ्या उत्साहात सुरू आहे.दि.१९ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या सप्ताहाचे यंदाचे सर्वात मोठे व कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे,हा महोत्सव 'नारी शक्ती सन्मान सोहळा २०२६' म्हणून साजरा केला जात आहे.
भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम
शिराळकर यंदा भक्ती आणि शक्तीचा एक अद्भुत संगम अनुभवत आहेत.या महोत्सवात सर्व प्रमुख सेवा,कीर्तन आणि प्रवचनाची धुरा महिलांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. विशेष म्हणजे कीर्तनकार आणि प्रवचनकारांसोबतच साथसंगत करणारे टाळकरी आणि पखवाज वादकही सर्व महिलाच आहेत. महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करत असल्याने परिसरातील भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे.
आतापर्यंत ह.भ.प.प्रतिक्षाताई करडुळे,ह.भ.प.दिपालीताई खिळे,ह.भ.प.वणीताताई पाटील,ह.भ.प.शालिनीताई देशमुख इंदोरीकर आणि ह.भ.प.आरतीताई शिंगोळे यांची प्रबोधनपर हरिकीर्तने पार पडली आहेत.तर आज मंगळवारी ह.भ.प. साध्वी आरतीताई शिंदे यांचे,तर बुधवारी ह.भ.प.कांचनताई जगताप यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
प्रवचन सेवेमध्ये ह.भ.प.पुष्पाताई तावरे,ह.भ.प.दिपालीताई कोकाटे,ह.भ.प.वेदीकाताई तावरे आणि ह.भ.प.शारदाताई हवालधर यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.आज मंगळवारी ह.भ.प.लताताई चव्हाण तर बुधवारी ह.भ.प.माधुरीताई बनसोडे यांचे प्रवचन होणार आहे.दैनंदिन कार्यक्रमांची रेलचेल
सप्ताहाच्या काळात शिराळनगरीला अक्षरशः पंढरपूरचे स्वरूप आले आहे. दररोज पहाटे काकडा आरती, भजन,रामविजय ग्रंथ वाचन,दुपारचे प्रवचन, सायंकाळी संगीत हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकारांची भव्य कीर्तने असा भरगच्च कार्यक्रम सुरू आहे.रात्री ११ नंतर चालणाऱ्या पारंपारिक हरिजागराने भक्तीमय वातावरणात अधिकच भर घातली आहे.
रामनवमीला काल्याचे कीर्तन आणि ऐतिहासिक 'लक्ष्मण शक्ती' सोहळा या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आणि कळसाध्याय गुरुवार,दि.२६ मार्च २०२६ रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर होणार आहे.सकाळी ९:३० ते ११:३० या वेळेत भागवताचार्य ह.भ.प.साध्वी सोनाली दीदी करपे यांचे रामजन्मोत्सव आणि काल्याचे कीर्तन होईल.यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे आणखी एक मुख्य आकर्षण असलेला भव्य आणि ऐतिहासिक'लक्ष्मण शक्ती'सोहळा रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत रात्रभर चालणार आहे.या पारंपारिक सोहळ्याची पंचक्रोशीत मोठी उत्सुकता असून,


यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भाविकांना आवाहान
शिराळ आणि परिसरातील सर्व आबालवृद्ध भाविकांनी, तसेच माता-भगिनींनी या अभूतपूर्व 'नारी शक्ती सन्मान सोहळा' आणि अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळी आणि समस्त ग्रामस्थ, शिराळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------
0 टिप्पण्या