Ticker

6/recent/ticker-posts

ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापूंना प्रतिष्ठेचा 'कीर्तनरत्न' पुरस्कार प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) पाटोदा येथील विठ्ठल संस्थानचे मठाधिपती आणि आपल्या अद्वितीय कार्याची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद करणारे ज्येष्ठ समाज प्रबोधनकार ह.भ.प. रामकृष्ण महाराज रंधवे बापू यांना यावर्षीच्या मानाच्या 'कीर्तनरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.कीर्तनाच्या माध्यमातून राज्य आणि देशभरात भक्तीचा व सामाजिक जनजागृतीचा निःशुल्क प्रसार केल्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.श्री संत भगवानबाबा सप्ताह समिती आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात हा भव्य सोहळा पार पडला.ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे यांच्या शुभहस्ते शाल,पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन रंधवे बापूंचा यथोचित सन्मान करत त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.भाविकांच्या अलोट गर्दीत रंगला सन्मान सोहळा सुरुवातीला हा सन्मान श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठान येथे आयोजित १८ व्या.राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यातील गुणवंतांच्या सत्कार समारंभात करण्याचे नियोजित होते. मात्र दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी सप्ताहात रंधवे बापूंची कीर्तन सेवा होती.यावेळी कीर्तन श्रवणासाठी उसळलेल्या हजारो भाविकांच्या अलोट गर्दीचा आणि उत्साहाचा आदर करत, त्याच दिवशी भक्तीमय वातावरणात हा सन्मान सोहळा पार पडला.राष्ट्रीय एकात्मतेचा जागर आणि मान्यवर कीर्तनकारांचा गौरव दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मता'या संकल्पनेवर आधारित या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहात दररोज महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांनी आपली कीर्तन सेवा रुजू केली.मातृभूमी प्रतिष्ठान व सप्ताह समितीच्या वतीने या सर्व कीर्तनकारांचाही शाल,पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.सन्मानित कीर्तनकार: ह.भ.प.सुनीताताई आंधळे,ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर,ह.भ.प.रामगिरी महाराज शास्त्री ह.भ.प. सविताताईं महाराज केकान,ह.भ.प.हनुमान महाराज शास्त्री,ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री,ह.भ.प. भगवान महाराज राजपूत आदी मान्यवरांची मांदियाळी या भक्तीमय सोहळ्यासाठी ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे,ह.भ.प.सानप महाराज, डॉ.संजय तांदळे,प्रा.आर.टी.गर्जे,नारायण नागरे, प्रा.बाळासाहेब नागरगोजे,डॉ.लक्ष्मण पवळ,हिरामण तांदळे आणि रवींद्र मुंडे यांच्यासह राजकीय,सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता शनिवार, दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प.भगवान महाराज राजपूत यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.अत्यंत भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या सांगता समारंभानंतर निमंत्रित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण आष्टीनगरी विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेली होती. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या