आष्टी (प्रतिनिधी)
लेखणी हे समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.समतोल आणि समाजबांधिलकीचा ठाव घेऊन केलेले लेखन हे खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय कार्य असते. समता,बंधुत्व,ऐक्य आणि सर्व धर्म सम भावासाठी आपल्या नेहमीच्या समतोल भूमिकेतून परखड मांडणी करणारे 'दैनिक झुंजारनेता'चे ज्येष्ठ पत्रकार तथा उपसंपादक उत्तमराव बोडखे हे एक कर्तृत्वसंपन्न लेखक आणि पत्रकार आहेत,अशा गौरवउद्गारांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार,समाजप्रबोधनकार तथा आईसाहेब मीराबाई संस्थानाच्या मठाधिपती ह.भ.प. राधाताई सानप महाराज यांनी उत्तमराव बोडखे यांच्या कार्याचे कौतुक केले.
ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीत मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी उत्तमराव बोडखे आणि त्यांच्या सहचारिणी सौ.बबीताताई बोडखे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.आज,

गुरुवारी 'महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघा 'च्या वतीने हा कृतज्ञता सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महासंघाचे बीड जिल्हा सचिव प्रा. बिभीषण चाटे, तसेच राज्यस्तरीय 'नारी सन्मान' पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ.आशा फड-चाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी उत्तमराव बोडखे यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.या सत्कारप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ह.भ.प.राधाताई सानप महाराज बोलत होत्या.साडेतीन दशकांची तपश्चर्या
गेल्या साडेतीन दशकांच्या प्रदीर्घ कालखंडात उत्तमराव बोडखे यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपली लेखणी झिजवली आहे. त्यांनी घेतलेली अपार मेहनत,कष्ट आणि त्यांच्या ध्येयवादी वृत्तीतून निर्माण झालेली जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास यामुळे त्यांची लेखणी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना जोडणारी ठरली आहे म्हणूनच आज राजकीय,सामाजिक, धार्मिक,वैचारिक,शैक्षणिक क्षेत्रांसह प्रशासकीय,कृषी,कामगार आणि उद्योग क्षेत्रांमधील अनेक गुणीजनांनी त्यांच्या या कार्यकर्तृत्वावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट
-----------
समयसूचकता आणि सामाजिक बांधिलकीची वृत्ती समता, बंधुत्व आणि ऐक्य या चिरंतन मूल्यांबरोबरच उत्तमराव बोडखे यांनी कायम ध्येयनिष्ठ वृत्ती जोपासली.याच ध्येयनिष्ठेतून निर्माण झालेल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपल्या लेखणीला कर्तृत्वाची भक्कम ढाल बनवली आहे.संत-सज्जनांचे लाभलेले आशीर्वाद आणि राजकीय नेतृत्वाला योग्य दिशा दाखवणारी त्यांची धारदार लेखणी यामुळे त्यांनी आजवर वर्तवलेले अनेक अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत.त्यांना लाभलेल्या भक्कम वैचारिक अधिष्ठानामुळेच उत्तमराव बोडखे यांच्या व्यक्तिमत्त्वात 'वाणी आणि लेखणी' यांचा अतिशय सुरेख संगम पाहायला मिळतो,असे गौरवोद्गार गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरलेले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. रामकृष्णबापू रंधवे यांनी काढले आहेत.
--------------------------------
0 टिप्पण्या