Ticker

6/recent/ticker-posts

कृषी क्षेत्रातले उच्च शिक्षण घेऊन साखर कारखान्यात कार्यकारी संचालक पद भूषवणारे हरिभाऊ मार्कंडे

ज्याचे प्रेम जगावर असते तो कर्माने भक्कम असतो.ज्यांच्या जीवनात नैराश्य नाही.तो ज्ञानाने मधुर,हृदयाने भाग्यवान,कर्माने मजबूत व प्रेमाने भिजलेला असतो.हाच खरा सुखी व भाग्यवान माणूस असतो.साधी राहणी,उच्च विचार,कुटुंबवत्सल स्वभाव,प्रेमळ स्वभाव इतरांना मदत करण्याची नेहमी मनात भावना असणारे सामाजिक, धार्मिक,कृषी क्षेत्रातील तज्ञ असलेले हरिभाऊ मार्कंडे यांचे १० दिवसापूर्वी निधन झाले.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द,चिकाटी व अथक परिश्रम यांच्या जोरावर सामाजिकस्तर उंचावत आपल्या मुलाला व मुलीला उच्चशिक्षण देऊन सुसंस्कृत केले.आपले संपूर्ण कुटुंब मुले,मुली हे उच्च पदस्थ केले. कडा येथील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ हरिभाऊ मार्कंडे यांचे निधन झाले ते वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर काळाचा घाला घातला.. आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील रहिवासी आणि कडा येथे स्थायिक असलेले ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ,सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिभाऊ मारुती मार्कंडे (वय ७९) यांचे सोमवार दि.२६ जानेवारी रोजी निधन झाले.विशेष म्हणजे २५ जानेवारी रोजीच कुटुंबियांनी त्यांचा ७९ वा.वाढदिवस साजरा केला होता,मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाने मार्कंडे परिवारावर शोककळा पसरली आहे.हरिभाऊ मार्कंडे यांनी १९७२ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.ॲग्री ही पदवी संपादन केली होती.त्यानंतर त्यांनी त्याच विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले. प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी कडा आणि गंगापूर येथील सहकारी साखर कारखान्यात 'प्रमुख शेतकरी अधिकारी' म्हणून जबाबदारी पार पाडली.सांगली येथील राजारामबापू पाटील साखर कारखाना आणि राहुरी सह.साखर कारखाना येथे त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून मोलाची सेवा दिली.२००७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीला वाहून घेतले.आंबा आणि सीताफळ बागांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक शेतीचा आदर्श निर्माण केला.केवळ फळबागच नव्हे,तर गूळ कारखाना आणि शेळी पालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायातून त्यांनी प्रगती साधली होती.मार्कंडे परिवारावर गेल्या दोन महिन्यांत हा दुसरा मोठा आघात आहे.हरिभाऊंचे मोठे बंधू,माजी प्राचार्य गुलाबराव मार्कंडे यांचे डिसेंबर महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीनंतर हरिभाऊंची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.त्यांच्या पाठीमागे पत्नी,सुपुत्र डॉ.प्रताप मार्कंडे,विवाहित मुलगी,सून,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ----------------- स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सदैव जगणारे एक परोपकारी व कृतिशील कृषी तज्ञ म्हणुन हरिभाऊ मार्कंडे यांची आष्टी तालुक्याला ओळख आहे.राजकीय, सामाजिक,धार्मिक,कृषी,सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव काम आहे.समाजाने त्यांना भरपूर मानसन्मान दिला. सहकारी कारखान्यातील सेवाकाल संपल्यानंतर अध्यात्मीक कार्याबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. हरिभाऊ मार्कंडे म्हणजे मितभाषी,शांत,संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व होते.राजकीय क्षेत्रातील सर्वच नेत्यांना आपल्या व जवळचे वाटणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा होती.कडा,देविनिमगाव भागात त्यांचे सामाजिक व धार्मिक कार्य उल्लेखनीय आहे.स्नेह,आनंद,शांतता,ऐक्यभाव निर्माण करणे व सामाजिक समस्या दूर करण्याचे सतत त्यांनी काम केले आहे.परंतु चंदनाप्रमाणे झिजणारे अशी त्यांची प्रतिमा होती.आपल्या वाट्याला आलेले दुःख,वेदना,हसतमुखाने झेलण्याची नेहमी त्यांची तयारी होती.कोणालाही कोणतीही तक्रार,कुरकुर न करता सदैव चंदनाप्रमाणे झिजून आपला परिसर सुगंधित ठेवणे हेच त्यांना ठाऊक होते.इतरांच्या सुखात सुख,दुःखात दुःख मानणारा एक सोज्वळ आणि हळव्या मनाचे ते होते.शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या ध्येयवादाने भारलेले ते होते.त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले होतं.दारिद्र्यातुन पुढे आलेले हे कुटुंब.त्यात प्रतिकूल परिस्थितीत मात करीत आपल्या एकुलत्या एका मुलास उच्च शिक्षण दिले.डॉ.प्रताप मार्कंडे हा मुलगा डॉक्टर आहे.तर सौ.मनीषा मुकुंद राजळे ही मुलगी आहे. मार्कडे साहेबांनी अनेक ठिकाणी नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतर नवनविन प्रकल्पांमध्ये मन रमवढले. त्यासोबतच त्यांना असणारा पर्यटनाचा छंद देखील त्यांनी जोपासला.कडा परिसर व अहिल्यानगर येथील मित्रमंडळींना सोबत घेऊन भारत भ्रमण,गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ,बद्रीनाथ,जगन्नाथ पुरी,चारधामयात्रा वैष्णोदेवी, अमरनाथ,केरळ,कन्याकुमारी, पूर्वोत्तर भारत अगदी शेवटी नर्मदा परिक्रमा आदी पूर्ण करून आनंद स्वत: मिळवला. मित्रांनाही दिला.कौटूंबीक कार्यक्रमात सहभागी होणे, नातेवाईकांमध्ये रमणे,आनंद घेणे,अबाल वृद्धांशी संवाद, सर्वांची चौकशी, गुंतवणूकीवर व बचतीवर विचारमंथन व मार्गदर्शन,खुशाली विचारणे, भेटणे,प्रसंगी मदत व योग्य मार्गदर्शन आदी त्यांच्याकडे असलेल्या अभूतपूर्व गुणांमुळे ते सर्वाना आपके " पप्पा " वाटत असत.त्यांना भेटून सर्वजण आनंदी होत असत... हरिभाऊ मार्कडे यांना एक मुलगा आहे तो डॉक्टर आहे.(एम.डी) झालेला आहे. सुनबाई ·सौ.पुनम प्रताप मार्कंडे या (एम.एस.) आहेत. कडा या ठिकाणी मार्कंडे हस्पिटलच्या माध्यमातून हे दोघे परीसरातील जनतेला आरोग्य सेवा देत आहेत.सौ.मनिषा मुकुंद राजळे यांचे पती डॉ.मुकुंद राजळे हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग अहिल्यानगर हे पदावर कार्यरत आहेत.डॉ.मंथन व डॉ.मंजीत राजळे हे दोघे डॉक्टर आहेत. कु. जान्हवी प्रताप मार्कंडे ही नात चि.अर्जुन प्रताप मार्कंडे नातू हे शिक्षण घेत आहेत.आनंद व समाधानी असे जीवन जगत सर्व कुंटुंब,नातेवाईक यांना सन्मार्ग दाखवत कितीही शिकुन मोठे झालात तरी परमेश्वरी शक्तीला विसरु नका,देव आहे.परोपकारी जीवन जगुन आनंदी राहा अशीच त्यांनी मार्कंडे परिवाराला शिकवण दिली.शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन परिश्रमाच्या जोरावर आपला परिवार वाढविला.प्रतीकुल परिस्थितीशी झगडत प्रमाणिकपणा न सोडता कष्टातुन आदर्श कुंटुंब घडविलेले आहे.सर्वाना उच्चशिक्षण देऊन आपले संपूर्ण कुटुंब मुले,मुली हे उच्चपदस्थ केले.हरिभाऊ मार्कंडे हे भाग्यवान आदर्श पिता होते.हरिभाऊ मारुती मार्कडे यांचा जन्म दि.२५ जानेवारी १९४८ या दिवशी आष्टी तालुक्यातील देवीनिमगांव या गावी झाला. ज्या कुटूंबामध्ये ते जन्माले ते एक शेतकरी कुटूंब.पाच भावंडे, एक बहिण यामध्ये हरिभाऊंचा चौथा नंबर.देवीनिमगांव हे शेतीक्षेत्रात एक अग्रगण्य गाव होते.आजही आहे. हरिभाऊंचे आई-वडील शेती करून चरितार्थ चालवत असत. हरिभाऊंचे प्राथमिक शिक्षण गावातील जि.प.च्या शाळेत झाले.त्यांना लहानपणा पासून अभ्यासातील गती चांगली लाभली होती.आपल्या गावात चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील माध्यमिक शिक्षण त्यांनी कडा गावातील मोतिलाल कोठारी विद्यालयात केले.त्याकाळी प्रवासाची साधने उपलब्ध नसल्यामुळे ते आपल्या वर्गमित्रांसोबत पायी प्रवास करून कड्याला ये,जा करून केले.अशा स्थितीत त्यांनी १९६७ साली मॅट्रीक परिक्षा मोतीलाल कोठारी विद्यालयातून उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण केली.पुढील शिक्षणासाठी त्यांनी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात येथे घेतले.त्यांनी हा बी.एस्सी.सी (कृषी) साठी प्रवेश निवडला यापाठीमागे शेतकरी कुटूंबातील जन्म आणि शेतीची आवड या दोन्ही गोष्टी असाव्यात असे वाटते.या विद्यापीठातून त्यांनी बी.एस्सी.सी.एम. एस्सी (कृषी) या दोन्ही उच्चपदव्या (कृषी) तसेच सन १९७२ मध्ये प्राप्त केल्या. या शैक्षणिक काळात विद्यापीठात त्यांना मानणारा आणि जाणणारा मोठा मित्रपरिवार तयार झाला होता. मार्कंडे यांच्याकडे असणारा नेतृत्व गुण,प्रभावी व्यक्तिमत्व खेळाची आवड,विषयांचा अभ्यास या सर्वगुणांच्या जोरावर त्यांना याच विद्यापीठात प्राध्यापकाची मानाची नोकरी मिळाली होती. ते या कृषी विद्यापीठ जीएस म्हणून निवडून आले होते. त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याकडे वसतिगृहाच्या व्यवस्थापनाचा कार्यभारही देण्यात आला होता. त्याकाळात एक उंच व्यक्तीमत्वाचा लाल रंगाच्या बुलेटवरून विद्यापीठात येणारा प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आणि दबदबा होता.१९८१ पर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने या विद्यापिठात सेवाकाल घातला.२० मार्च १९७४ रोजी देवीनिमगाव येथील पाचे कुटुंबातील रामकुंवर बाबुराव पाचे यांच्याशी विवाह झाला.मार्कंडे यांच्यातील शेतकरी गुण, शेतीचा अभ्यास आणि ज्ञान यामुळे ते विद्यापीठात रमले नाहीत. शेतकरी बांधवांसाठी मला काहीतरी करायचे आहे आपण एम.एस्सी.कृषी ही उच्च पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरी न करता आपण गावाकडच्या परिसरात काम केले पाहिजे या उद्देशाने ते गावाकडे आले १९८१ मध्ये आष्टी तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखान्यात ते शेतकी अधिकारी पदावर रुजू झाले.काही दिवसानंतर त्यांनी कडा कारखान्यातील नोकरीचा राजीनामा दिला.कडा कारखान्यातील नोकरीनंतर गंगापूर सहकारी साखर कारखाना येथे मुख्य शेतकरी म्हणून नोकरी केली. त्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्यात मुख्य शेतकी अधिकारी पदावर काम केले. श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण येथे कार्यकारी संचालक या पदावर त्यांनी काम केले.त्यानंतर राहुरी येथील डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखान्यात त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून काही वर्ष नोकरी केली. सन २००७ मध्ये या कारखान्यातून ते मोठ्या सन्मानाने सेवानिवृत्त झाले. सन २००७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर ते कडा शहरातील तुळजा भवानी नगरमध्ये स्थायीक झाले.या परिसरातील राहवाशी,लहाण थोर मंडळी त्यांना "पप्पा " या नावाने आदराने ओळखू लागले. तुळजाभवानी नगरमधील सर्व रहिवाशांना एकत्र करणे,दसरा,तिळगुळ,गणपती उत्सव, कोजागीरी उत्सव यामध्ये ते रममान झाले.देवीनिमगाव येथील शेतीत नवनवीन उपक्रम राबवले. शेतात सीताफळ आंबे चिंच असे फुलझाडे लावली. २०१० मध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण गुळ उत्पादन कारखाना सुरू केला.प्रतिदिन ३५० मे.टन ऊस गाळप क्षमतेचा हा कारखाना प्रतिदिन ५०० मे.टन क्षमतेपर्यंत चालवला होता.आष्टी तालुका सर्वप्रथम त्यांनी बंदिस्त शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता या प्रयोगासाठी त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन सुधारित जातीच्या शेळ्यांची खरेदी केली होती हा शेतीपूरक व्यवसाय त्यांनी फायदेशीर आहे हे शेतकऱ्यांना दाखवून दिले होते. २०१२ मध्ये त्यांनी मुरघास हा चाऱ्याचा प्रकल्प हाती घेतला होता.बारा महिने शेतकऱ्याला चारा उपलब्ध झाल्याने दूध उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्याला आर्थिक फायदा होईल असे त्यांची भावना होती. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने कृषी तज्ञ हरिभाऊ मार्कंडे साहेब ७९ वर्षाचे निरोगी व दीर्घायुष्य जगले. सेवानिवृत्त कार्यकारी संचालक हरिभाऊ मार्कंडे यांंच्या दशक्रियाविधी निमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली ..... -उत्तम बोडखे, आष्टी --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या