Ticker

6/recent/ticker-posts

आ.सुरेश धस म्हणजे मुत्सद्दी 'चाणक्य' आणि विकासाचा मानबिंदू ............ शून्यातून विश्व निर्माण करणारा 'चाणक्य' लोकनेता: आ.सुरेश धस

राजकारणात वारसा असलेल्यांची वाटचाल सोपी असते,पण ज्याच्या पाठीशी कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ कष्ट,जिद्द आणि जनसंपर्काच्या जोरावर जो महाराष्ट्राच्या राजकारणात आपला अढळ ठसा उमटवतो,त्यालाच खऱ्या अर्थाने 'लोकनेता' म्हणतात. आष्टीचे सुपुत्र, 'वाघाच्या काळजाचे' आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आ.सुरेश धस हे अशाच एका देते प्रमाण दैदिप्यमान प्रवासाचे नाव आहे. आज २ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा....
-------------- महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्याचे स्थान नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहे.या मातीने देशाला आणि राज्याला अनेक दिग्गज नेतृत्वे दिली. मात्र,कोणताही राजकीय वारसा पाठीशी नसताना,केवळ कष्टाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व म्हणून जेव्हा आपण पाहतो, तेव्हा 'आमदार सुरेश रामचंद्र धस' हे नाव अग्रक्रमाने समोर येते.आष्टी, पाटोदा आणि शिरूर या भागाचे सुपुत्र असलेले सुरेश धस यांनी गेल्या साडेतीन दशकांत ग्रामपंचायतीचा सरपंच ते राज्याचा महसूल राज्यमंत्री आणि पाच वेळा आमदार असा जो नेत्रदीपक प्रवास केला आहे.तो कोणत्याही राजकीय अभ्यासकासाठी एक स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरू शकतो.त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील चढ-उतार,त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, प्रशासनावरील त्यांची पकड आणि सर्वसामान्यांशी असलेली त्यांची नाळ या सर्व बाबींचा आढावा घेणे आजच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत समर्पक ठरते. आ.सुरेश धस यांचा जन्म २ फेब्रुवारी १९६९ रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे झाला. त्यांचे वडील रामचंद्र धस हे एक शासकीय नोंदणीकृत ठेकेदार होते.रामचंद्र दादांनी अत्यंत कष्टाने आपले कुटुंब उभे केले होते आणि तोच कष्टाचा वारसा सुरेश धस यांच्या रक्तात भिनलेला आहे.घरात राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती,मात्र समाजात वावरताना गरिबांचे प्रश्न सोडवण्याची जिद्द त्यांना बालपणा पासूनच होती.त्यांचे प्राथमिक शिक्षण जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी आष्टी येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (हंबर्डे कॉलेज) येथे प्रवेश घेतला. हेच ते ठिकाण होते जिथे त्यांच्या नेतृत्वाची पहिली चुणूक महाराष्ट्राला पाहायला मिळाली.महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून आपल्या संघटन कौशल्याचा पाया रचला. शैक्षणिक वर्ष पदवी / शैक्षणिक स्तर संस्था / विद्यापीठ १९९१-१९९३ विद्यार्थी संसद अध्यक्ष कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आष्टी १९९२-१९९३ बी.ए.(पदवीधर) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर १९९३ नंतर एम.एस.(पदव्युत्तर) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाविद्यालयीन काळात सलग तीन वर्षे (१९९१, १९९२, १९९३) विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून निवडून येणे ही त्यांच्या लोकप्रियतेची पहिली पावती होती.या काळात त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतानाच प्रशासकीय कामात कशी दखल द्यायची आणि लोकांशी संवाद कसा साधायचा याचे धडे गिरवले. त्यांच्या या सुरुवातीच्या यशाने त्यांच्यातील 'राजकीय चाणक्या'ची जडणघडण सुरू केली होती. सरपंच ते जिल्हा परिषद: सत्तेच्या पहिल्या पायऱ्या ------------------ आ.सुरेश धस यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला १९९२ मध्ये प्रारंभ झाला,जेव्हा ते आपल्या जामगाव ग्रामपंचायतीचे अविरोध सरपंच म्हणून निवडून आले.अवघ्या २३ व्या.वर्षी सरपंचपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी गावातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले.रस्ते,पाणी आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिला. या काळात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचा सखोल अभ्यास केला, जो त्यांना पुढे मंत्रालयात काम करताना अत्यंत उपयुक्त ठरला. सरपंच म्हणून काम करत असतानाच त्यांची निवड १९९२ मध्ये आष्टी तालुका युवक इंदिरा काँग्रेसच्या अध्यक्षपदी झाली. त्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी आष्टी तालुका दूध संघाचे संचालक म्हणून सहकार क्षेत्रात पाऊल ठेवले. सहकार आणि राजकारण यांची सांगड घालत त्यांनी आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली. १९९७ हे वर्ष त्यांच्या राजकीय जीवनातील एक मोठा वळणबिंदू ठरले. हरिनारायण आष्टा जिल्हा परिषद गटातून ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून गेले. त्यांच्यातील कामाची धडाडी पाहून अवघ्या काही काळातच त्यांना बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले. १९९७ ते १९९८ या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली. जिल्हा परिषदेला 'मिनी मंत्रालय' म्हटले जाते आणि या मिनी मंत्रालयातूनच धस यांच्या विधानसभेच्या आमदारकीचा पाया रचला गेला. आ.सुरेश धस यांचा राजकीय प्रवास हा कोणत्याही परीकथेपेक्षा कमी नाही. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्यातील नेतृत्वाचे गुण चमकू लागले होते.१९९१ ते १९९३ अशी सलग तीन वर्षे त्यांनी आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयात विद्यार्थी संसद अध्यक्ष म्हणून काम पाहिले. राजकारणाचे पहिले धडे त्यांनी याच काळात गिरवले. १९९२: जामगावचे अविरोध सरपंच म्हणून निवडीसह राजकारणात श्रीगणेशा.१९९७: हरिनारायण आष्टा गटातून जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर बीड जि.प.चे उपाध्यक्षपद भूषवले.१९९९: पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश (भाजपच्या तिकिटावर). २००४ व २००९: आष्टी-पाटोदा -शिरूर मतदार संघातून सलग विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक. २०१३: राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल,सहकार आणि जलसंधारण अशा आठ खात्यांचे राज्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली.आ.सुरेश धस यांची ओळख केवळ एक नेता म्हणून नाही, तर एक मुत्सद्दी राजकारणी आणि 'चाणक्य' म्हणून आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मार्गदर्शन आणि पुढे शरद पवार व अजितदादा पवार यांच्या विश्वासातून त्यांनी राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. 'महानंद' डेअरीचे अध्यक्ष असताना त्यांनी दूध संकलन २ लाख लिटरवरून ५ लाख लिटरवर नेले, हे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. ------------- जनसामान्यांशी जोडलेली नाळ -------------- आ.सुरेश धस यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा अफाट जनसंपर्क.मतदार संघातील एखादा सामान्य कार्यकर्ता असो किंवा ऊसतोड कामगार, प्रत्येकाचे नाव आणि समस्या त्यांच्या स्मरणात असते.त्यांची स्मरणशक्ती हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे.संकटात सापडलेल्या कार्यकर्त्याला मदत करण्यासाठी ते कधीही मागे हटत नाहीत.पाटोदा बँक प्रकरण असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न,स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरी त्यांनी कधीही माघार घेतली नाही.यशस्वी नेत्याच्या सभोवताली कोण आहे यापेक्षा, त्याच्या संघर्षाच्या काळात त्याचे पायातील दगड कोण होते.हे धस साहेबांना अचूक ठाऊक आहे. -------------- चौकट ---------- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे.याच दुःखद घटनेमुळे आ.सुरेश धस यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.हीच संवेदनशीलता त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. ----------------- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील हे नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. कोणताही वारसा नसताना जामगावसारख्या छोट्या खेड्यातून आलेला तरुण आज राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतो, हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या स्वतंत्र भाषणशैलीने आणि रांगड्या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या या लोकनेत्याला उदंड आणि निरामय आयुष्य लाभो,हीच सदिच्छा! दैनिक झुंजारनेता परिवारातर्फे लोकनेते आ.सुरेश धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ----- उत्तम बोडखे,आष्टी ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या