आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील भवरवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेत गुरुवार दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला.शाळेला आधार गावाचा,गावाला अभिमान शाळेचा या ब्रीदवाक्याची प्रचिती देणारा हा कार्यक्रम ग्रामस्थ,पालक,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत रंगला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून मान्यवरांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळ्या,अक्षररचना आणि शैक्षणिक प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.संपूर्ण शाळा परिसर सुशोभित करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत,समूह नृत्य,लघुनाटिका,शिवचरित्रावरील सादरीकरण,लोककला सादरीकरण आदींचा समावेश होता.याप्रसंगी युवा नेते जयदत्त धस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,गावागावातील शाळा सुधारल्या तर गावाचा सर्वांगीण विकास होतो.आण्णांच्या व्हिजनमध्ये असलेली भवरवाडी शाळा कशी कार्यरत आहे हे पाहण्यासाठी मी येथे आलो आहे.येथे येऊन शाळेतील शिस्त,गुणवत्ता आणि सर्जनशीलता पाहून मला समाधान वाटले.त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उच्च पदांवर पोहोचू शकतात असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, गावातील शाळा मजबूत झाल्या तर समाजाची पायाभरणी भक्कम होते.जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट कार्य करत आहेत आणि भवरवाडी शाळा हे त्या कामाचे जिवंत उदाहरण आहे.त्यांनी शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्कारही जोपासावेत, असे मार्गदर्शन केले.विजयनगरचे अभ्यासक एन.शहाजी हंपी यांनी शाळेतील रांगोळी आणि अक्षरकलेचे विशेष कौतुक करत सांगितले,अक्षरावर प्रेम करणारी, रांगोळीवर प्रेम करणारी अशी ही शाळा आहे.येथे पाहिलेली रांगोळी अक्षररचना आणि सृजनशीलता पाहून मी पुण्यावरून येथे आलो.त्यांच्या या वक्तव्याने विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली.
शिवचरित्रकार लेखक तथा व्याख्याते गणेश भाऊ धालपे यांनी आपल्या ओजस्वी भाषणात सांगितले,छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे महाराष्ट्राचे दैवत आहेत.शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना धैर्य,स्वाभिमान आणि देशभक्तीचे धडे दिले.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी मोहन काकडे यांनी सांगितले की,भवरवाडी शाळा ग्रामीण भागातील असून देखील कमी पटसंख्या असून देखील एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहे ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.याबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व शिक्षकांचे व ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुकर गळगटे यांनी प्रभावी आणि बहारदार शैलीत केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्वी भवर,अक्षरा भवर,सानिका भवर,मुख्याध्यापक सुनील काकडे

यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतले.शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी करून घेतली.या सोहळ्यास सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष,सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी नागरिक,शाळेतील बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या