Ticker

6/recent/ticker-posts

संत वामनभाऊंनी कीर्तनातून 'समते'चा विचार दिला ---- मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस ------------------- श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर 'सुवर्ण महोत्सवी' पुण्यतिथी निमित्त देशभरातून भक्तांचा लोटला जनसागर

उत्तम बोडखे,श्री क्षेत्र गहिनीनाथगड ----------------- "मी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या आदेश तथा निमंत्रण यावरून येथे आलो आहे. ५० व्या. पुण्यतिथी तथा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संत वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होतो अशी विनम्र भावना प्रारंभीच व्यक्त करून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी येथे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.संत वामनभाऊ महाराज आणि श्रीक्षेत्र गहीनाथगडाचा मी भक्त आहे.येथे मुख्यमंत्री म्हणून नव्हे; तर भाऊंचा भक्त म्हणून आलो आहे असे सांगत संत वामनभाऊं महाराज यांनी समतेचा विचार कीर्तनातून दिला! असे भावोद्गार अत्यंत सद्गदित आणि गहिवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी काढले. वाचासिद्धी प्राप्त सद्गुरु वै. संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या. पुण्यस्मरणाच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताहाच्या समारोप प्रसंगी लाखो भक्तांच्यासमोर व्यासपीठावरून मुख्यमंत्री संबोधित करीत होते. यावेळी मंचावर श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज, महाराष्ट्र राज्याच्या मंत्री ना.पंकजाताई मुंडे,माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे,आ.मोनिकाताई राजळे,आ.सुरेश धस,माजी आ. भीमराव धोंडे,माजी आ. बाळासाहेब मुरकुटे,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्यावतीने महंत विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,मंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, महंत विठ्ठल महाराजांमुळे मला येथे येण्याची संधी मिळाली.नाथ परंपरेतील गहिनीनाथ महाराज यांची मोठी परंपरा आहे.शंकराचे अवतार म्हणून संत वामनभाऊ महाराज ओळखले जातात.सद्गुरु हे समाजाला दिशा देत असतात. वामनभाऊ महाराजांनी अध्यात्माचा लळा सर्वसामान्यांना लावला.समाज व्यवस्थेत एकोपा आणला.मन शुद्ध असल्यावरच आचरण शुद्ध होते ही शिकवण त्यांनी दिली.त्यांचा समाज मनावर आशीर्वाद होता.त्यांना वाचा सिद्धी होती असे सांगत ते म्हणतील ते व्हायचे अशा प्रकारे त्यांच्यात‌ ईश्वराचा अंश असलेले व्यक्तिमत्त्व होते.भाऊंनी कीर्तनातून समतेचा विचार दिला. नामस्मरणाची शिकवण दिली.गडाच्यावतीने उभारलेला मंडप पाहून मनस्वी आनंद झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री म्हणाले,यापुढेही गडासाठी जेवढे करता येईल तेवढे आपण करणार आहोत. पंढरपूरला जागा घेतलेली आहे. येथून जाणारा पालखी मार्ग पंढरपूरचा तोही लवकर करू.. गहीनाथगडाच्या कामाची सर्व जबाबदारी आम्ही घेऊ! असा जाहीर विश्वास त्यांनी या अध्यात्मिक मंचावरून दिला आणि भाविक भक्तांनी टाळ्यांच्या प्रतिसादाने त्यांचे स्वागत केले.माजी मंत्री आ. धनंजय मुंडे याचा उल्लेख 'धनुभाऊ' असा करत धनुभाऊ आणि पंकजाताई यांच्यासह आम्ही येथे सतत येत राहू. आशीर्वाद घेऊ.पुन्हा या आशीर्वादातूनच सन्मार्ग आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी आपण संत वामन भाऊंच्या चरणी प्रार्थना करूया..! असे विनम्र भाव मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.महंत विठ्ठल महाराज आणि समस्त लाखो भाविकांना त्यांनी दोन्ही हात जोडत प्रणाम करून आपल्या आध्यात्मिक वैचारिक भाषणाचा शेवट केला.मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अत्यंत मोजक्या शब्दात श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाची महती आणि संत वामनभाऊ महाराजांच्या विचारांची तेजस्वी पताका यावर विचार व्यक्त केले.संत वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी मुख्यमंत्री भक्त म्हणून येथे आलेले आहेत.भाऊंना वाचासिद्धी प्राप्त होती.त्यांच्या चरणी नतमस्तक होते असे सांगत संत वामनभाऊ वैराग्यमूर्ती आणि सामान्यांना शिक्षण आणि सदविचारातून त्यांनी समता बंधुत्व ऐक्य आणि सर्वधर्म भावाची शिकवण दिली.मानवतेचा मंत्र देणारे वामनभाऊ हे संत आपल्याला कायम दिशा देतील! असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केले.ह.भ.प. असाराम बडे महाराज यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.तर ११:४५ वाजता पुष्पवृष्टी प्रथेप्रमाणे करण्यात आली. त्यानंतर लाखो भाविक भक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गहिनीनाथगडाच्या आणि भाऊंच्या प्रसादाचा लाभ घेतला.महंत विठ्ठल महाराजांच्या अभ्यासपूर्ण नियोजनातून व परिसरमातून हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी झाला. यावेळी विविध नेतेमंडळी आजी-माजी आमदार,जि.प. सदस्य,सभापती, यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त होता तर एसटी महामंडळाने भाविकांसाठी उत्कृष्ट सेवा पुरवली. दरम्यान,या सुवर्णमहोत्सवी पुण्यस्मरणातून संत वामनभाऊंच्या विचाराचा सुगंध राज्य आणि देशभर पसरेल! अशी भावना उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील उत्तम बोडखे,बबन ऊकांडे,संजय सानप,अनिल गायकवाड,प्रा. बिभिषण चाटे, प्रभाकर सुळे, भाऊसाहेब पवार यांनी व्यक्त केली. चौकट -------- गहिनीनाथगड माणुसकीच्या ज्ञानदानाचे केंद्र ठरले! ----------------- गत सप्ताहात भर श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर कीर्तन,प्रवचन, भारुड,भजन,कथा, पारायण आदी सह आध्यात्मिक कार्यक्रमांची उत्कृष्ट रेलचेल झाली. राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविकांनी या आध्यात्मिक विचार पिठाचा लाभ घेतला.श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे मानवतेच्या विचारधारेचे अक्षरशः केंद्रस्थान झाले.मुस्लिमांसह विविध जाती धर्मपंथांच्या भाविकांच्या दिंड्या हे या गडाचे वैशिष्ट्य ठरते. आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा ------------------ गेल्या २५ वर्षापासून अव्याहतपणे परंपरा असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरील पुण्यतिथीच्या पहाटे माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज पहाटे वै. वामनभाऊंच्या समाधी स्थळी महापूजा संपन्न झाली.यावेळी महंत विठ्ठल महाराज यांच्यासह भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालक भाऊ; तर बहिणीचे भाषण! ---------------- श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावरील सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नेते यांच्यासह राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या मंचावर आ.धनंजय मुंडे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पेलली.त्यांनी ना.पंकजाताई मुंडे यांना भाषणासाठी निमंत्रण करताना मंत्री आणि आमच्या भगिनी असा उल्लेख केला.. आणि टाळ्यांचा पाऊस पडला. तर पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात आमचे 'भाऊ' म्हणून धनंजय मुंडे यांचा केलेला उल्लेखही यावेळी उपस्थितांना चेहऱ्यावर समाधान देणारा ठरला. याची प्रचिती यावेळी आली. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या