Ticker

6/recent/ticker-posts

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मंदिर गाभारा बांधकामासाठी सावरगाव ग्रामस्थांचा तीन कोटी रु.निधी देण्याचा संकल्प : पहिल्याच बैठकीत ६५ लाख रु. झाले जमा..

आष्टी ( प्रतिनिधी) संपूर्ण भारत देशातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले नाथ संप्रदायाचे अग्रणी असलेल्या मच्छिंद्रनाथां नाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थान येथील मंदिराचे गाभाऱ्याचे दगडी बांधकाम सुरू असून या कामासाठी स्थानिक सावरगाव ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने ३ कोटी रु.देणगी देण्याचा निश्चय केला असून.. याबाबत झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये ६५ लक्ष रु.जमा झाले आहेत.श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे विश्वस्त आ.सुरेश धस यांनी घेतलेल्या सावरगाव ग्रामस्थांसमवेत घेतलेल्या विकास आढावा बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय झाल्याची माहिती श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाचे विश्वस्त साहेबराव म्हस्के यांनी दिली. या बैठकीस विश्वस्त समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब रामभाऊ म्हस्के,उपाध्यक्ष बाबासाहेब महादेव म्हस्के, विश्वस्त रमेश बाबुराव ताठे पाटील,नवनाथ म्हस्के, सावरगाव ग्रामपंचायतचे सरपंच अर्जुन म्हस्के हे उपस्थित होते.या विषयी अधिक माहिती देताना साहेबराव म्हस्के म्हणाले की, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान मंदिराचा गाभारा हा आंध्र प्रदेश,कर्नाटक सीमेवरील दर्जेदार दगडातून निर्माण होत असून या कामासाठी सध्या ७३ कोटी रु.खर्चाचे अंदाजपत्रक असून आणखी ३ वर्षांनी हा खर्च १०० कोटी रुपये पर्यंत हा वाढू शकतो.१०० × १५० फूट आकाराचा हा गाभारा असून सुमारे १०९ फूट उंचीचा आहे. हे काम संपूर्ण दगडी बांधकाम होणार आहे.या कामासाठी तीन वर्ष कालावधी लागण्याचा अंदाज आहे.सावरगाव येथील स्थानिक ग्रामस्थांनी या कामासाठी ३ कोटी रुपये निधी देण्याचा संकल्प केला असून या एकाच बैठकीमध्ये ६५ लाख रुपये निधी जमा झाला.विशेष म्हणजे शेती अथवा इतर कोणतीही मालमत्ता नसणाऱ्या एका मजुरीवर गुजराण करणाऱ्या भाविक भक्ताने स्वतःहून १ लक्ष रुपये वर्गणी देण्याची जाहीर केले.या देवस्थानचे निस्सीम भक्त आणि विश्वस्त असलेले आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आ.सुरेश धस यांनी स्वतःचे वैयक्तिक ५२ लक्ष रुपये निधी जाहीर केला आहे. त्यांच्या जामगाव येथील ग्रामस्थांकडून भरीव निधी जमा करण्याचे जाहीर केले आहे.सावरगाव येथील या बैठकीवेळी वृद्धेश्वर ते धानोरा या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली आणि सावरगाव गावाजवळील चौक हा १०० × १०० फूट असा सर्कल तयार करण्यात येणार असून या कामामुळे सावरगाव या गावाचा कायापालट होणार आहे.श्री.क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडाकडे सावरगाव येथून येणाऱ्या रस्त्यासह आणखी तीन रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिला देवस्थान मंदिराकडून गवळी वाडा मार्गे वृद्धेश्वर कडे जाणारा, दुसरा शेंडगेवाडी मार्गे माणिक दौंडेकडे जाणारा आणि तिसरा मच्छिंद्रनाथ गड येथून श्रीक्षेत्र कानिफनाथ मंदिर मढी या गावाकडे जाणारा असे तीन रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.या सर्व रस्त्यांची पुरेशी रुंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना रहदारीसाठी सुविधा मिळणार असल्याचे सांगत सावरगाव चौकापासून ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड मंदिरापर्यंत रस्त्यावरील पथदिव्यांची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रंदिवस या रस्त्यावरून वाहतुकीसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती देखील साहेबराव मस्के यांनी यावेळी दिली.श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथगड मंदिराचा गाभारा आणि इतर विकास कामे ही शेकडो वर्ष इतिहासाची साक्ष देणार आहेत त्यामुळे भाविक भक्तांनी सढळ हाताने या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथगड मंदिर गाभारा कामास आर्थिक मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या