
आष्टी (प्रतिनिधी)
आनंद चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड
रिसर्च,आष्टी (डी. फार्मसी, बी.फार्मसी,एम. फार्मसी) येथे दि.१० जानेवारी २०२६ रोजी
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला पार पडली.ही व्याख्यानमाला विद्यार्थी विकास
विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर आणि आनंद
चॅरिटेबल संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च,आष्टी यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या
हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात
आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रा.अनिल धायगुडे यांनी केले.प्रास्ताविकात
त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वैचारिक वारशाचे महत्त्व विशद करत भारताच्या
स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केले.या प्रेरणादायी व्याख्यानमालेचे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापन परिषद
सदस्य डॉ.योगिताताई होके पाटील यांच्या हस्ते झाले.उद्घाटनपर भाषणात त्यांनी
संविधान, लोकशाही व राष्ट्रसुरक्षा यांचा परस्पर संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी
वैचारिकदृष्ट्या सजग राहणे,सामाजिक जबाबदारी स्वीकारणे आणि राष्ट्रहिताची जाणीव
ठेवणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रमुख
वक्ते डॉ.काशिनाथ देवधर (DRDO, भारत सरकारचे माजी Group Director) यांन ी “ऑपरेशन
सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व अनुभवसंपन्न
व्याख्यान दिले.स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची ताकद,सैनिकांच्या सुरक्षिततेमागील
विज्ञान, कारगिल युद्धकाळातील अनुभव तसेच आत्मनिर्भर भारताची वाटचाल त्यांनी सोप्या
व प्रभावी शब्दांत उलगडून सांगितली.कारगिल युद्धाच्या काळात स्व.डॉ.ए.पी. जे.अब्दुल
कलाम यांच्यासोबत कार्य करतानाचे अनुभव त्यांनी कथन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये
वैज्ञानिक आत्मविश्वास व राष्ट्राभिमान अधिक दृढ झाला. प्रमुख पाहुणे डॉ.अशोक कोरडे
पाटील यांनी विद्यापीठे ही केवळ पदव्या देणारी केंद्रे नसून राष्ट्रघडणीची
प्रयोगशाळा असल्याचे मत व्यक्त केले अशा व्याख्यानमालांमधून विद्यार्थ्यांमध्ये
वैज्ञानिक दृष्टिकोन,शिस्त व राष्ट्रीय जाणीव निर्माण होते असे त्यांनी नमूद
केले.यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ बाबुराव अनारसे यांनी संविधान,न्याय व राष्ट्रसुरक्षा
हे परस्परपूरक घटक असल्याचे स्पष्ट केले. स्वदेशी संरक्षण सामर्थ्य बळकट होणे
म्हणजे देशाचे स्वातंत्र्य अधिक सुरक्षित होणे होय, असे त्यांनी प्रतिपादन
केले.कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुनिल कोल्हे यांनी
केला.त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत या व्याख्यानमालेच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन व सामाजिक बांधिलकी विकसित
व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. डॉ.काशिनाथ देवधर
यांच्या व्याख्यानामुळे स्व. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी देशासाठी केलेल्या महान
कार्याची तसेच भारताच्या संरक्षण संशोधन व्यवस्थापनाची सखोल माहिती मिळाल्याचे
त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठाने ही व्याख्यानमाला उपलब्ध करून दिल्याबद्दल
त्यांनी आभार व्यक्त केले.या व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील
प्राध्यापकवर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
0 टिप्पण्या