
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील रहिवासी आणि कडा येथे
स्थायिक असलेले ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ, वृद्धेश्वर सह. साखर कारखान्याचे माजी
कार्यकारी संचालक हरिभाऊ मारुती मार्कंडे ( वय ७९ ) यांचे सोमवार दि.२६ जानेवारी
रोजी निधन झाले.विशेष म्हणजे २५ जानेवारी रोजीच कुटुंबियांनी त्यांचा ७९ वा.
वाढदिवस साजरा केला होता,मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाने मार्कंडे
परिवारावर शोककळा पसरली आहे. हरिभाऊ मार्कंडे यांनी १९७२ मध्ये वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठातून एम.एस्सी.ॲग्री ही पदवी संपादन केली होती.त्यानंतर
त्यांनी त्याच विद्यापीठात काही काळ प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य केले.
प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी कडा आणि गंगापूर येथील सहकारी साखर कारखान्यात
'प्रमुख शेतकरी अधिकारी' म्हणून जबाबदारी पार पाडली. सांगली येथील राजारामबापू
पाटील साखर कारखाना आणि राहुरी सहकारी साखर कारखाना येथे त्यांनी कार्यकारी संचालक
म्हणून मोलाची सेवा दिली.२००७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ
शेतीला वाहून घेतले.आंबा आणि सीताफळ बागांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक शेतीचा
आदर्श निर्माण केला. केवळ फळबागच नव्हे, तर गूळ कारखाना आणि शेळी पालन यांसारख्या
शेतीपूरक व्यवसायातून त्यांनी प्रगती साधली होती.मार्कंडे परिवारावर गेल्या दोन
महिन्यांत हा दुसरा मोठा आघात आहे. हरिभाऊंचे मोठे बंधू,माजी प्राचार्य गुलाबराव
मार्कंडे यांचे डिसेंबर महिन्यात निधन झाले होते.त्यांच्या दशक्रिया विधीनंतर
हरिभाऊंची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या
पाठीमागे पत्नी, सुपुत्र डॉ.प्रताप मार्कंडे,विवाहित मुलगी,सून,जावई आणि नातवंडे
असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आष्टी तालुक्यासह साखर उद्योग क्षेत्रात
हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या