










आष्टी (प्रतिनिधी ) राज्यस्तरीय गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाच्या माध्यमातून
आष्टी सारख्या ग्रामीण भागातील युवकांमधून कलाकार निर्माण होण्यास मदत होईल, आई-
वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रगती करावी असे
प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले. आष्टी येथील भगवान महाविद्यालयात
आयोजित राज्यस्तरीय गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. राज्यस्तरीय कला रौप्य महोत्सवाच्या
निमित्ताने सकाळी आष्टी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर
सिनेअभिनेत्री हेमांगी कवी,सौ. दमयंतीताई धोंडे, युवानेते अजयदादा धोंडे,सौ.
अक्षताताई धोंडे,अभयराजे धोंडे,चेअरमन राजुकाका धोंडे, जि.प.चे माजी सदस्य सतिश
शिंदे, माजी सभापती नियामत बेग, किशोरनाना हंबर्डे, धैर्यशील थोरवे, ॲड.रत्नदीप
निकाळजे, रिपाईचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे, हरिभाऊ जंजिरे, सरपंच अशोक मुळे,
उपसभापती पांडुरंग नागरगोजे, आण्णासाहेब भोसले,ह.भ.प. दिनकर महाराज तांदळे,पत्रकार
भगवान राऊत,उत्तम बोडखे, दिलीप काळे,सरपंच सावता ससाणे,संतोषभैया चव्हाण, अश्ताक
शेख,स्वामी सानप,अज्जुभाई शेख,प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, प्राचार्य सुरेश
बोडखे,भाग्यश्री राऊत,सरपंच दादासाहेब जगताप, प्रा.अल्लाउदिन सय्यद, युवराज
वायभासे, आदेश निमोणकर संस्थेचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना
माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी भरपूर
वेगवेगळे कलागुण असतात.या महोत्सवाच्या माध्यमातून अशा कलागुणांना वाव मिळण्याची
संधी आहे. कष्टकरी आणि गोरगरिबांची मुले कला क्षेत्राकडे वळावेत या हेतूने गेल्या
२५ वर्षापासून गंगाई बाबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण भागात मुले
शिकुन उच्च शिक्षित व्हावेत. आपला परिसर हा दुष्काळी आहे उच्च शिक्षण घेतले तर
नौकरी व्यावसायाच्या माध्यमातून प्रगती करता येईल. महोत्सवाच्या माध्यमातून कलाकार
निर्माण होतील. जिवनात कष्टाशिवाय यश मिळत नाही. आई वडिलांना आपले पालनपोषण
करण्यासाठी खुप कष्ट करावे लागले. आपणही तेच न करता भरपूर शिक्षण घेऊन नियमित
अभ्यास करावा व आई वडिलांचे नावलौकिक करावे. दिवसातील पाच तास चांगला मन लावून
अभ्यास केला तर स्पर्धा परिक्षेत यश निश्चितच मिळते.भावी पिढीतून चांगले कलावंत
घडावी हाच महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. इंग्रजी भाषेत किर्तन प्रवचन करण्यासाठी
जुन महिन्यापासुन त्या शिक्षणाची सोय करण्यात येईल.जेणेकरून आपल्या भागातील
विद्यार्थी इंग्रजी भाषेत अध्यात्मिक शिक्षण घेऊन देशभरात व परदेशात किर्तन प्रवचन
करतील. प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना अभिनेत्री हेमांगी कवी यांनी सांगितले
की,थोर महापुरुषामुळे आपण येथे आहोत दुष्काळी आणि एवढ्या ग्रामीण भागात माजी आ.
भीमराव धोंडे यांनी शिक्षणाची गंगा आणली ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. माझ्या
अभिनयापेक्षा जास्त वर्षे त्यांचे राजकीय व सामाजिक कार्य आहे. दिवसेंदिवस मुलींची
संख्या वाढत आहे. मी अगदी सामान्य घरातून आले आहे. अगोदर आई वडीलांचा विश्वास
संपादन केला त्यामुळे मी जिवनात यशस्वी झाले. विद्यार्थ्यांनो शिक्षण अगोदर पुर्ण
करा. अभिनयाची आवड असेल तर आत्मविश्वास हवा. आपल्या हुशारीचा वापर योग्य ठिकाणी
करा. कला क्षेत्रात भरपूर वाव आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून
साकारलेल्या या उपक्रमात सौ. दमयंतीताई धोंडे यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी
नमूद केले.माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रासह
चित्रपट क्षेत्रात काम केले ही बाब चांगली आहे. आष्टी हा ग्रामीण भाग आहे परंतु मला
शहरात आल्यासारखे वाटले एवढा विकास केल्याचे दिसत आहे. यावेळी अभिनेत्री हेमांगी
कवी यांना यावर्षीचा कला क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले.यावेळी हेमांगी कवी यांनी फु बाई फु मधील अनेक विनोदी संवाद सांगुन उपस्थितांचे
मनोरंजन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी
सांगितले की, आता हा फक्त महोत्सव राहिला नाही तर राज्यस्तरीय कला रौप्य महोत्सव
बनला आहे.गंगाई बाबाजी महोत्सवाचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष
माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपल्या आईवडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ हा महोत्सव
सुरू केला. चांगला समाज घडविण्याच्या उद्देशाने हा महोत्सव सुरू केला. कार्यक्रमाचे
उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रा. डॉ. आप्पासाहेब टाळके यांनी केले. उपस्थितांचे आभार
सुरेश फुले यांनी मानले.प्रा. डॉ. अनिल हजारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन
दिला. कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थीनी पालक व आष्टी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या