संविधान दिन विशेष
----------------

----------
लेखक- डॉ.आशा
बिभिषण चाटे
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला; म्हणून भारतीय संविधान दिनाचे या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. या दिवशी जनतेला लोकशाही,अधिकार आणि कर्तव्याचे महत्त्व आठवण करून दिले जाते. त्याच समवेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला आदराने स्मरणही केले जाते. संविधान ही खऱ्या अर्थाने देशाची एकता, समता, समानता आणि न्याय निश्चित करत असते आणि हा दिवस नागरिकांना संवैधानिक मूल्यांबद्दल जागृती करीत असतो.१९४९ मध्ये याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात ते लागू झाले. संविधान स्वीकारण्याच्या स्मरणार्थ दरवर्षी देशभरात संविधान दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
संविधान दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संविधान स्वीकार दिवस म्हणून याकडे पाहिले जाते. नागरिकांमध्ये अधिक जागरूकता व्हावी.. त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी आणि कर्तव्यासाठी हा दिवस जागरूक करतोच किंबहुना जेणेकरून ते अधिक जबाबदार नागरिकही बनू शकतील.या दिनाच्या निमित्ताने संवैधानिक मूल्यांनाही प्रोत्साहन मिळते. लोकशाही स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुत्व यासारख्या मूल्यांना यानिमित्ताने अधिक प्रोत्साहन मिळते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या दिवसाच्या निमित्ताने अधिक होतोच;किंबहुना हा दिवस संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाची आठवण करून देतो.देशाच्या एकतेच्या अनुषंगाने हा दिवस विविध धर्म भाषा आणि संस्कृती असलेल्या लोकांना एकत्र आणणाऱ्या संविधानाच्या महत्त्वा वर निश्चित प्रकाश टाकतो.महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या संदर्भाने एका पत्राद्वारे शिक्षण विभागातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये 26 नोव्हेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधान दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित करण्याच्या अनुषंगाने सुचित केले आहे. त्यानुसार शालेय स्तरावर संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांच्या मध्ये अधिक रुजवुन जागरूकता आणि ज्ञानवर्धिंगत व्हावे यासाठी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
चौकट
--------
२६ नोव्हेंबर दिवसाचे महत्त्व!
------------------------------
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका आणि चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे संविधान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
0 टिप्पण्या