
आष्टी (प्रतिनिधी)
सध्या महाराष्ट्र आणि देशाला व्यासंगी आणि दूरदृष्टी,प्रतिभा
असलेल्या लोकांची गरज आहे.कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांच्यात हे सर्व गुण
आहेत.त्यांनी सामाजिक जीवनात यायला हवे.त्यांच्या ज्ञानाचा समाजाला नक्कीच फायदा
होईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
अहिल्यानगर येथे अमृत महोत्सव गौरव समिती,गणित विभाग माजी विद्यार्थी संघ व न्यू
आर्टस कॉमर्स अॕण्ड सायन्स महाविद्यालयाच्यावतीने माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे
यांच्या अमृत महोत्सवात ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.के. ठाकरे उपस्थित होते.याप्रसंगी
खा.नीलेश लंके,पोपट पवार,डॉ.जब्बार बगदाद (इराक), अॕड. विश्वासराव आठरे, माजी
कुलगुरु डॉ.अशोक कोळकर, डॉ.माणिकराव साळुंखे, डॉ.एस.एन.पठाण, डॉ.वासुदेव गाडे,डॉ.
उध्दव भोसले, कुलगुरु डॉ.जयंत वैशंपायन,डॉ.अरविंद दीक्षित,डॉ.उपेंद्र द्विवेदी,डॉ.
मनोहर चासकर,डॉ.ज्ञानदेव म्हस्के,कॅनडा येथील डॉ. लिंगराज, इराक येथील
डॉ.जब्बार,ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर,उद्योजक अरविंद पारगावकर,पराग काळकर, माजी
महापौर अभिषेक कळमकर,ॲड.विद्याधर काकडे,रावसाहेब वर्पे, डॉ. विवेक भापकर,जयंतराव
वाघ,मुकेश मुळे,डाॕ.मधुकर हंबर्डे आदींसह आजी- माजी कुलगुरु उपस्थित होते.यावेळी
शरद पवार म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये उत्तर आणि दक्षिण असे दोन प्रदेश आहेत.
दुष्काळी दक्षिणेत अनेक गुणवंत, प्रतिभावंत नेते, सामाजिक कार्यकर्ते होऊन
गेले.त्यात भापकर,आठरे, निंबाळकर अशी नावे घेता येतील. निमसे देखील याच भागातील
आहेत. त्यांची लखनौ विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर मला प्रश्न पडला
होता. त्यांना हे काम जमेल का? मात्र,त्यांनी माझा समज खोटा ठरवला.त्यांच्या
ज्ञानाचा शिक्षण क्षेत्राला फायदा झाला.इंडियन सायन्स कॉंग्रेसचेही त्यांनी
अध्यक्षपद भूषवले आहे. नांदेडमध्येही त्यांचा कार्यकाळ चांगला राहिला.आता यापुढची
वर्षे त्यांनी समाज सेवेसाठी दिली पाहिजेत.ते गणितात पक्के आहेत.मात्र, माझं गणित
फार कच्चं होतं. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर गणिताला दुसरा पर्याय आहे हे मी
पाहिलं. त्यांच्या वरील गौरव ग्रंथ मी बारकाईने वाचला.त्यात एआयसंदर्भात लेख
आहे.त्या तंत्रज्ञानाची गरज आहे. ते सर्वांनी अवगत केले पाहिजे, असेही शरद पवार
म्हणाले.या सोहळ्यात प्रा. गणेश भगत संपादित कुलगुरू गौरव ग्रंथ,डॉ. सर्जेराव निमसे
व प्रा.गणेश भगत संपादित शैक्षणिक ग्रंथ शिक्षण आणि विकास या दोन ग्रंथांचे प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.आभार मुकेश
मुळे यांनी मानले.
0 टिप्पण्या