
आष्टी (प्रतिनिधी)
शिक्षक दिन चार दिवसावर आलेला असताना बीड जिल्हा परिषदेत अनेक
वर्ष निष्ठेने व प्रमाणिकपणे काम करणाऱ्या एका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
शिक्षकाचा प्रशासकिय वनवास संपला आहे.बीड जि.प.च्या प्रशासनाने या शिक्षकावर अन्याय
केला परंतु अखेर सत्याचा " विजय " झाला आहे.विजय आमटे यांना त्यांच्याच लाडक्या
आष्टी तालुक्यातील बांदखेल जि.प.प्रा. शा.मध्ये पुर्ननियुक्ती मिळाली आहे. आष्टी
तालुक्यातील विजय आमटे हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत.राष्ट्रपती
प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला होता. त्यानंतर बीड जि.प. ने
राष्ट्रपती पुरस्कार निवड समितीवर सदस्य म्हणून सुध्दा विजय आमटे यांची नियुक्ती
केली होती. विजय आमटे यांनी आष्टी तालुक्यातील देवळालीची शाळा महाराष्ट्रात पहिल्या
क्रमांकावर आणली. बीड जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या
जि.प.शाळेत आयोजित करण्यात आली.आमटे यांची ती देवळालीची शाळा शैक्षणिक गुणवत्तेत '
आमटे पॅटर्न 'नावाने 'राज्यात प्रसिद्ध झाली होती. आमटे यांचे शैक्षणिक कार्यासोबतच
सामाजिक आणि वृक्षसंवर्धनाचे काम उल्लेखनीय आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार
केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळावी यासाठी विजय आमटे बीड जि.प. प्रशासनाकडे
विनंती अर्ज करत होते.सर्व नियमात असताना देखील या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
शिक्षकाला बीड जि.प.चे प्रशासन न्याय देत नव्हते. न्याय देणे तर सोडाच उलट चुकीचे
आरोप करून विजय आमटे यांना जानेवारी २०२४ मध्ये बीड जि.प.ने थेट निलंबित केले.या
कारवाईमुळे विजय आमटे यांची मानसिक अवस्था पुर्णतः ढासळली होती.नैराशात होते परंतु
जवळच्या निवडक सहका-यांनी त्यांना या वाईट काळामध्ये साथ दिली. त्यानंतर बीड जि.प.
ने त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.या विभागीय चौकशीचा अहवाल डिसेंबर
२०२४ मध्येच आला आणि या चौकशीत विजय आमटे निर्दोष ठरले.जि.प.प्रशानाने लावलेला
कोणताही आरोप सिद्ध झाला नाही.तरी देखील सुडाने पेटलेल्या बीड जि.प. प्रशासनाने
विजय आमटे यांचे निलंबन रद्द केल्यानंतर त्यांना अत्यंत गैरसोयीच्या असलेल्या
चकलांबा ता . गेवराई येथील शाळेत नियुक्ती दिली.तेथेही त्यांनी शाळेसाठी योगदान
दिले.सत्यासाठी चाललेला संघर्ष सुरुच असताना अखेर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आमटे यांना
आता त्यांच्या पुर्वीच्याच बांदखेल जि.प.शाळेत पदस्थापना मिळाली आहे.ज्या शाळेला
त्यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे जोपासले.ग्रामस्थ व देणगीदारांच्या मदतीने
शाळेचा चेहरा मोहरा बदलला होता.त्यांच्याच काळात आष्टी तालुका पत्रकार संघाने हि
शाळा शैक्षणिक विकासासाठी दत्तक घेऊन मदत केली.त्या शाळेत त्यांना पुन्हा एकदा
नियुक्ती मिळाल्याने एक प्रकारे सत्याचा " विजय " झाला आहे.शिक्षक दिनाच्या एक
आठवडा आधी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा प्रशासकिय वनवास संपला
आहे.याबद्दल आमटे यांचे हितचिंतक मित्रपरिवार आणि जिल्ह्यातील शिक्षकांकडुन अभिनंदन
होत आहे.चार ओळीच्या बातमीचे भांडवल करून आमटे यांचेवर अन्याय केलेले जि.प.प्रशासन
आता तरी आमटे यांचे पुढील प्रशासकीय बाबींविषयी सकारात्मकता दाखविल अशी आशा
जिल्हाभरातील शिक्षक व्यक्त करीत आहेत.
0 टिप्पण्या