Ticker

6/recent/ticker-posts

३७ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन नावलौकीक मिळविलेले मुख्याध्यापक जगन्नाथ सोनवणे सर

विशेष लेख -------- उत्तम बोडखे .बोडखे शेतकरीपुत्र मुख्याध्यापक जगन्नाथ सोनवणे सर अभ्यासाच्या जोरावर मुख्याध्यापक झाले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाव अधोरेखित करीत स्वतःच्या कुटुंबासह समाज व्यवस्थेतील अनेकांच्या माध्यमातून उच्चशिक्षण आणि त्याचे महत्त्व सांगून नवा अध्याय रचणारे मुख्याध्यापक सोनवणे सर यांचा नामोल्लेख करण्यासारखा आहे. आष्टी तालुक्यातील मांडवा येथील जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक या पदावर प्रामाणिकपणे आणि सक्षमपणे काम केल्यानंतर जगन्नाथ सोनवणे हे आज सेवानिवृत्त होत आहेत. एका शेतकरी कुंटुंबात जन्म घेतल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतुनही यशोशिखर गाठले आहे.बावी येथील जगन्नाथ सुभद्राबाई राघोबा सोनवणे यांचा जन्म दि.१२ ऑगस्ट १९६७ साली झाला. त्यांनी एम.ए.,बी.एड.पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी येथे झाले असून पुढील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण डोईठाण येथील पद्मावती विद्यालयात झाले आहे. त्यांचे डी.एड.शासकीय अध्यापक विद्यालय नेकनूर येथे झाले आहे.पुढे बी.एड.त्यांनी अंबाजोगाई येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात येथे पूर्ण केलेले आहे. त्यांची पत्नी सौ.छबुबाई जगन्नाथ सोनवणे - दहिफळे या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टी नंबर १ येथे शिक्षिका आहेत. त्यांचेही शैक्षणिक कार्य आदर्श आहे. सोनवणे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा महेश सोनवणे यांचे शिक्षण मास्टर ऑफ सिव्हिल इंजिनियर झालेले आहे . सूनबाई सौ.प्रीती महेश सोनवणे (शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनियर पदविका) तर मुलगी सौ. राजश्री संजय गर्जे ही उच्च शिक्षित असून तिचे शिक्षण एस.एस्सी.,डी.एड., एम.ए.,एम.एड. झालेले असून ती आष्टी येथील भगवान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.त्यांचे जावाई संजय योगीराज गर्जे यांचे शिक्षण एम.फॉर्म. झालेले आहेत. ते सध्या कडा येथील बी.फार्मसी.कॉलेजमध्ये उपप्राचार्य आहेत. मुख्याध्यापक जगन्नाथ सोनवणे यांच्या शिक्षण क्षेत्रातील यश आणि प्रगती पाठीमागे त्यांच्या आई वडिलांचा मोठा आधार, त्याग आहे.आई वडीलांचे तसे शिक्षण जेमतेमच म्हणावे लागेल पण शिक्षणाचे महत्व काय आहे ते त्यांना नक्कीच माहित होते.कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त असणे गरजेचे असते.ती शिस्त त्यांनी आपल्या मुलांना अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून लावण्याचे काम केले.दोघेही कडक शिस्तिचेच पण प्रेमळ.मुलांवर किती कटाक्षानं लक्ष असायला पाहिजे, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मुख्याध्यापक सोनवणे यांचे मातापिता. ३७ वर्षाहुन अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असलेले एक शिस्तप्रिय शांत,संयमी मुख्याध्यापक असा नावालौकीक प्राप्त करणारे मांडवा जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर यांचा आज सेवापूर्ती सोहळा होत आहे.भावी पिढीत सुसंस्काराचे मूल्य रुजवीत दीर्घ काळापासून ज्यांनी शिक्षण सेवेचे व्रत स्वीकारले असे ज्ञानवंत,सेवा व्रती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा येथील आदर्श मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री. जगन्नाथ राघोबा सोनवणे सर हे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.आपल्या सत्कार्याच्या माध्यमातून ज्यांनी सभोवतालच्या जीवनात सातत्याने आनंदाची, उत्साहाची पेरणी केली आणि येणाऱ्या पिढीला दिशा दिली. त्यांनी इतरांच्या दुःखात मदतीचा हात दिला तर कधी पाठीवर सहानुभूतीची थाप दिली.गेली ३६ वर्षे ११ महिने व २६ दिवस शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना ज्ञानप्रसारक, कृतीदर्शक, विज्ञानवादी, मार्गदर्शक,मित्र,बंधू म्हणून प्रत्येक भूमिकेत सोनवणे सरांचे योगदान अतुलनीय आहे. जगन्नाथ सोनवणे यांची प्रथम नेमणूक दि.५ सप्टेंबर १९८८ असून दि.५ सप्टेंबर १९८८ ते दि. ३० एप्रिल १९८९ अशी ९ महिने त्यांनी आपल्या जन्मगावी बावी येथे जि.प. प्रा. शाळेत सेवा केली आहे.वेलतुरी येथील जि.प.प्रा.शाळेत दि.२६ जून १९८९ ते दि. २५ जून १९९३ अशी ४ वर्षे शैक्षणिक सेवा केली.सांगवी पाटण येथे जि.प.प्रा.शाळेत दि.२६ जून १९९३ ते दि.११ जून २००६ या कार्यकाळात १३ वर्ष सेवा केली आहे. बेलगाव येथील जि.प.के.प्रा.शाळेत दि. १२ जून २००६ ते दि.३० मे २०१६ अशी १० वर्ष सेवा केली आहे.बेलगाव येथील जि.प.प्रा. शाळा गावातुन बाहेर प्रशस्त जागेवर आणण्यासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांनी तत्कालीन सरपंच बन्शीभाऊ पोकळे यांचे सहकार्य घेऊन हे ऐतिहासिक काम केलेले आहे. बीडसांगवी येथील जि.प.प्रा. शाळेत येथे दि.३१ मे २०१६ ते दि. ३१ मे २०१८ अशी २ वर्ष सेवा केली आहे. मांडवा येथील जि.प. प्रा.शाळेत दि. ३१ मे २०१८ ते दि.३१ ऑगस्ट २०२५ अशी ७ वर्ष व ३ महिने मुख्याध्यापक म्हणून प्रशासकीय व शैक्षणिक सेवा केली. सेवाकाल ३६ वर्ष ११ महिने व २६ दिवस झाला आहे. आपल्या शैक्षणिक कार्याबद्दल जगन्नाथ सोनवणे यांना स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार दि.५ सप्टेंबर २००२ रोजी मिळाला. राज्यस्तरीय अनिस कार्य गौरव शिक्षक पुरस्कार सन - २००७, जिल्हा परिषद बीडचा आदर्श शिक्षक पुरस्कार सन - २००९, अतिउत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्य शिक्षक पुरस्काने दि. ५ सप्टेंबर २०१३ रोजी सन्मानित केलेले आहे. त्यांनी तालुकास्तर, जिल्हास्तर, राज्यस्तर व देश पातळीवरील सीसीआरटी प्रशिक्षण घेतलेले आहे. शैक्षणिक साहित्य निर्मिती करुन प्राथमिक शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शनामध्ये सन - २००६ ते सन - २०१३ पर्यंत सलग सहा वेळा बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून यवतमाळ, सोलापूर, चंद्रपूर, नंदुरबार, बारामती व नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. विज्ञान प्रदर्शन - सन २००१, सन २०११,सन २०१४ साली अशी तीन वेळा त्यांच्या उपकरणांची वर्धा, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.या सर्व शैक्षणिक गोष्टींचे फळ म्हणून त्यांना दि.५ सप्टेंबर २०१३ साली महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. आदर्श मुख्याध्यापक जगन्नाथ सोनवणे यांना सेवापूर्ती निमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा .... चौकट -------------- गेली ३७ वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये मनापासून कर्तव्य सेवा केली. अनेक विद्यार्थी घडले मोठेमोठ्या पदावर ते पोहोचू शकले. याचे समाधान आहे. सेवानिवृत्तीनंतर मुलाच्या संसारात व प्रगतीत होईल तेवढी मदत करून आनंदी जीवन जगण्याचा मानस आहे! --जगन्नाथ सोनवणे (सर) ---------------- - लेखक - उत्तम बोडखे,आष्टी. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या