


उत्तम बोडखे,आष्टी
--------------
सर्वसामान्य गरीबी परिस्थितीतून शिक्षणाचा मार्ग काढतानाच कोरोनाच्या
संकटात सापडलेली मुलगी शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या
प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीमुळेच स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाला
आधार बनली आहे.तिचा हा खडतर यशस्वी प्रवास ग्रामीण विद्यार्थिनींसाठी
प्रेरणास्त्रोत झाला आहे.
-------------------
दिव्या नवनाथ गायकवाड. तालुक्यातील आष्टी लोणी सय्यदमीर येथीला गुणी मुलगी ... दहावीपर्यंतचं शिक्षण लोणी सय्यदमीर येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड ओढ होती.पण मनात एक गोष्ट ठाम होती — जर खरंच मला माझं संपूर्ण शिक्षण उत्तम प्रकारे करायचं असेल,तर पुण्यात जायलाच हवं.मात्र त्यावेळी त्यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. तेव्हा तीने जिद्दीने अभ्यास करून दहावीला ९४ टक्के गुण मिळवले आणि त्या यशाच्या जोरावर तिने कुटुंबाला पटवून दिलं. अखेर ते सर्वजण पुण्यात आले आणि दिव्याच्या आयुष्यातल्या नव्या संधींची दारं खुली झाली.पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर आयुष्याची नवी स्वप्नं आकार घेत होती.पण बारावीत अपेक्षित गुण न आल्याने अभियांत्रिकीचं स्वप्न अपुरं राहिलं आणि बीसीए हा अभ्यासक्रम निवडावा लागला. पहिल्या वर्षाची फी कसोटीने भरता आली आणि त्याच वर्षी तीचा महाविद्यालयात दुसरा क्रमांक आला.मात्र दुसऱ्या वर्षाची वेळ आली तेव्हा आयुष्य पुन्हा एकदा कठीण वळणावर आलं. त्या काळात कोरोनाचा परिणाम सर्वत्र जाणवत होता. आई-वडिलांचं काम बंद झालं, घरची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली,आणि त्यामुळे दुसऱ्या वर्षाची फी भरणं शक्यच नव्हतं.परिस्थिती इतकी बिकट झाली होती की शिक्षण अधुरं राहील,असं वाटू लागलं.पण ह्याच कठीण क्षणी शिवसह्याद्री फाऊंडेशन पुढे आले आणि माझ्या शिक्षणाला हातभार लावला.त्यांच्या मदतीमुळे स्वप्न अर्धवट थांबलं नाही.ह्याच फाउंडेशनच्या माध्यमातूनच तीची आष्टीचे सुपुत्र सेवानिवृत कलेक्टर सुनील चव्हाण यांची भेट झाली आणि यानंतर सुनिलदादा चव्हाण यांनी तीला व्यक्तिगतरीत्या सर्वात मोठं पाठबळ दिलं.सुनील चव्हाण यांनी फक्त आर्थिक मदतच केली नाही तर त्यांच्या मार्गदर्शनाने,प्रोत्साहनाने आणि निस्वार्थ पाठिंब्याने आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट घडवला. त्यांच्या पाठबळीमुळे वयाच्या २१ व्या.वर्षी TCS (Tata Consultancy Services) या नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली.इतकंच नव्हे तर नोकरी लागल्यानंतरही चव्हाण साहेबांनी मला थांबू दिलं नाही; बीसीए नंतर उच्च शिक्षण घ्यावं,यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं आणि एमसीएच्या (MCA) संपूर्ण शिक्षणाचा खर्च स्वतः उचलला.हा आधार त्यांच्या साठी आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे.आज दिव्या गायकवाड सलग आडिच वर्षे TCS मध्ये कार्यरत आहे आणि ही गोष्ट सांगताना तीला प्रचंड अभिमान वाटतोय.खरंच, चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन आणि मदत यांनी माझं आयुष्य एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं, आणि ते लाखमोलाचं ठरलं असे दिव्या गायकवाड हिने बोलताना सांगितले.
चौकट
--------
शिवसह्याद्री फाऊंडेशनने दिलेली मदत ही फक्त आर्थिक मदत नव्हती तर माझ्या
आत्मविश्वासाचा मजबूत पाया होती.संस्थापक राजेंद्र ना. कोंढरे सर,सागर शेंडगे सर
तसेच घाडगे सर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.पण विशेषतः सुनील चव्हाण यांचं
ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. त्यांच्या निस्वार्थ मदतीमुळे आणि योग्य
मार्गदर्शनामुळेच आज मी माझ्या स्वप्नांच्या दाराशी उभी आहे..!"
अशा विनम्र आभाराच्या भावना दिव्या गायकवाड हिने व्यक्त केल्या.
------------------
0 टिप्पण्या