

आष्टी (प्रतिनिधी)
बजरंगबली की जय,समर्थ हनुमान महाराज की जय,जय जय श्रीराम,हर हर महादेव अशा जयघोषांनी श्रीक्षेत्र हनुमान टाकळी दुमदुमून गेली. रहाड यात्रेत लालबुंद निखाऱ्यावरून अनवाणी चालत नवसपूर्ती करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील शेकडो आबालवृद्धांनी आपल्या भक्तीचा अनोखा प्रत्यय आला. आषाढ वद्य पंचमीच्या मुहूर्तावर श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथे पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा रहाड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळ पासूनच परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली.दुपारी ३ वाजेपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची विक्रमी उपस्थिती नोंदवली गेली.दुपारी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता अशोक खेडकर यांच्या हस्ते अग्निपुजन करून मान देण्यात आला तर वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक सुभाष ताठे व देवस्थान अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांच्या उपस्थितीत अग्निपूजन करण्यात आले.बोरीच्या लाकडांचा विस्तव प्रज्वलित करण्यात आला.आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील यात्रेतील मानकरी बाबासाहेब लोखंडे यांनी श्रीफळ अर्पण करीत प्रथम लालबुंद निखाऱ्यावर चालण्याची परंपरा सुरू केली.त्यानंतर शेकडो महिला,पुरुष,वृद्ध व तरुण भाविकांनी उघड्या पायांनी त्या प्रखर गरम विस्तवावरून चालून नवसपूर्ती केली.हनुमान टाकळीच्या या यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे भाविक निखाऱ्यावरून चालत असताना मंदिरातील गोमयी मूर्तीला घाम फुटतो, असे सांगितले जाते. १२ फूट लांब,२ फूट रुंद आणि ६ फूट खोल खड्ड्यात बोरी लाकडांचा विस्तव तयार केला जातो.साधारणतः विस्तवाजवळ उभे राहणे देखील अवघड असते तरीही भक्तगण विश्वासाने आणि भक्तीने त्या विस्तवावरून चालून बाहेर येतात.सन २००९ पासून सुरू झालेल्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य आता अंतिम टप्प्यात असून, राजस्थानी दगडात उभारण्यात आलेले नवे मंदिर भक्तांचे आकर्षण ठरत आहे. यात्रेच्या निमित्ताने बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, डॉ.वसंत डमाळ,किशोर बडबडे यांनी भाविकांचे स्वागत केले.पोपट फुंदे,प्रवीण शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार डॉ.उद्धव नाईक यांनी यात्रेच्या व्यवस्थेची पहाणी केली.पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर व त्यांच्या पोलीस पथकाने सुरक्षेची जबाबदारी पार पाडली.यात्रेतील खाद्य पदार्थांपैकी जिलेबी, गोडीशेव व वडापाव यांना मोठी मागणी होती.श्रावण मासाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर आषाढ अखेरीस झालेली ही यात्रा भक्तांसाठी अध्यात्म, श्रद्धा व नवसपूर्तीचा संगम ठरली.
0 टिप्पण्या