आष्टी (प्रतिनिधी)
प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही आणि आर्थिक भीषण संकट असूनही... केवळ जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि विशेष म्हणजे दूरदृष्टी आणि शेतात राबराब राबण्याची मनाची तयारी... यातून एक महिला शेतकरी आणि त्यांचा मुलगा या मायलेकरांनी शेतीत नवीन प्रयोग राबवून आणि तो यशस्वी करून नवा आदर्श समोर ठेवला आहे!आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील शेतकरी दत्तात्रय घुले सर आणि त्यांच्या आई श्रीमती विजया घुले यांनी खजुर शेती करून दीड एकर शेतीत १२ लाख रु.चे उत्पन्न घेतले आहे. खजूर म्हटलं की, आपल्याला सौदी अरेबिया किंवा इराण इराकसारखी आखाती देश आठवतात.मात्र, मराठवाड्यासारख्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथे घुले परिवाराने आपल्या शेतात खजुराची बाग फुलवली आहे. यावर्षी या खजुराच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर खजूर लागली असून यातून दीड एकरात १२ लाख रु.चे उत्पन्न अपेक्षित आहे.घुले यांनी पाच वर्षापुर्वी दीड एकर शेतीत गुजरात येथून ४००० रुपये प्रति याप्रमाणे ८५ रोपे आणली.२५ बाय २५ याप्रमाणे खजूराची रोपे लावली.यासाठी त्यांनी मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन निवडली. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची सोय करत शेणखत टाकले. त्यानंतर हळूहळू रोपे वाढत गेली असून गेल्यावर्षी थोडा माल लागला होता.यावर्षी मात्र संपूर्ण दीड एकरावरील सर्व झाडे खजूराने लगडली आहेत. यावर्षी दर ही चांगला मिळत आहे. खजूर तोडणी सुरू केली असून १२ लाखाच्या पुढे उत्पन्न होणार असल्याचे विजयाबाईंनी सांगितले.
आष्टी हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो मात्र यावर मात करीत शेतीत कमी पाण्यावर व कमी उत्पादन खर्च असणारे खजूर पीक घेऊन घुले यांनी एक आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. खजुरांच्या झाडांना हलक्या प्रतीची जमिनीची आवश्यकता असते.त्याच पद्धतीने २५ बाय २५ अंतरावर लागवड असल्याने यामध्ये सोयाबीन आणि गहू यासारखी वर्षात दोन अंतर पिके घेत आहेत पारंपारिक पिकांना फाटा देऊन नवनवीन पिके तसेच प्रयोग केल्यास शेती देखील फायदेशीर ठरू शकते हेच दत्तात्रय घुले यांनी सिद्ध करून दाखवले आहे.त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील दिशादर्शक ठरत आहे. अनेक शेतकरी त्यांच्याकडे खजूर बाग पाहण्यासाठी सध्या येत आहेत.आज हनुमंत कावळे ,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,इंजि.पी.बी.बोडखे यांनी या खजुर शेतील भेट दिली व दत्ताभाऊ घुले सर यांचे अभिनंदन केले.
----------------
चौकट
---------
खजूर शेतीसाठी शासनाच्या
अनुदानाची गरज
-----------------
खजूर शेतीसाठी एकरी ४ लाख रुपये खर्च येतो.शासन अनेक प्रकारच्या फळबागा लागवडीसाठी अनुदान देत आहे. मात्र कमी पाणी, हलकी जमीन विना रासायनिक खते यावर खजूर शेती होते.खजूर शेतीला महाराष्ट्र शासन अनुदान देत नाही. गुजरात व राजस्थान सरकार तेथील खजूर शेती करण्यासाठी अनुदान देते.तसे अनुदान महाराष्ट्र शासनाने खजूर शेतीसाठी द्यावे.
--- दत्तात्रय घुले (सर)
-----------------
महिला शेतकरी विजयाबाई
घुलेंच्या जिद्दीची कहाणी..
-----------------

एकूणच ,शेतीची व्यवस्था आर्थिक दृष्ट्या बिघडलेली असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.असे असताना एक महिला असून सुद्धा मुलगा दत्तात्रय याला सोबत घेत शेतीत प्रचंड राब राब राबून खजूर शेतीचा प्रयोग हाती घेत विजयाबाई घुलेंनी खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
ही पिवळ्या शेतीची किमया पाहण्यासाठी दुर दुर वरून शेतकरी येथे येत असल्याचे त्यांनी सांगितले.
----------------
0 टिप्पण्या