Ticker

6/recent/ticker-posts

केळसांगवीत खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी ---------------- दीड एकरात घेतले १२ लाख रु.चे उत्पन्न

कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी काही प्रयोगशील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून आपली आर्थिक प्रगती साधतात.आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील शेतकरी दत्तात्रय घुले सर व त्यांच्या आई श्रीमती विजया घुले यांनी खजुर शेती करून दीड एकर शेतीत १२ लाख रु.चे उत्पन्न घेतले आहे. खजूर म्हटलं की,आपल्याला सौदी अरेबिया किंवा इराण इराकसारखी आखाती देश आठवतात.मात्र, मराठवाड्यासारख्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथे घुले परिवाराने आपल्या शेतात खजुराची बाग फुलवली आहे. यावर्षी या खजुराच्या झाडांवर मोठ्या प्रमाणावर खजूर लागली असून यातून दीड एकरात १२ लाख रु.चे उत्पन्न अपेक्षित आहे.घुले यांनी पाच वर्षापुर्वी दीड एकर शेतीत गुजरात येथून ४००० रुपये प्रति याप्रमाणे ८५ रोपे आणली.२५ बाय २५ याप्रमाणे खजूराची रोपे लावली.यासाठी त्यांनी मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन निवडली. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची सोय करत शेणखत टाकले. त्यानंतर हळूहळू रोपे वाढत गेली असून गेल्यावर्षी थोडा माल लागला होता.यावर्षी मात्र संपूर्ण दीड एकरावरील सर्व झाडे खजूराने लगडली आहेत. यावर्षी दर ही चांगला मिळत आहे. खजूर तोडणी सुरू केली असून १२ लाखाच्या पुढे उत्पन्न होणार असल्याचे विजयाबाईंनी सांगितले. आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो मात्र त्यावर रडत न बसता शेतीत कमी पाण्यावर व कमी उत्पादन खर्च असणारे खजूर पीक घेऊन घुले यांनी एक आदर्श शेतकरी वर्गासमोर ठेवला आहे. ------------- खजुरांच्या झाडांना हलक्या प्रतीची जमिनीची आवश्यकता असते.त्याच पद्धतीने २५ बाय २५ अंतरावर लागवड असल्याने यामध्ये सोयाबीन आणि गहू यासारखी वर्षात दोन अंतर पिके घेत आहेत पारंपारिक पिकांना फाटा देऊन नवनवीन पिके तसेच प्रयोग केल्यास शेती देखील फायदेशीर ठरू शकते हेच दत्तात्रय घुले यांनी सिद्ध करून दाखवले आहे.त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील दिशादर्शक ठरत आहे. अनेक शेतकरी त्यांच्याकडे खजूर बाग पाहण्यासाठी सध्या येत आहेत. ------------- खजूर शेतीसाठी एकरी ४ लाख रुपये खर्च येतो.शासन अनेक प्रकारच्या फळबागा लागवडीसाठी अनुदान देत आहे. मात्र कमी पाणी, हलकी जमीन विना रासायनिक खते यावर खजूर शेती होते.खजूर शेतीला महाराष्ट्र शासन अनुदान देत नाही. गुजरात व राजस्थान सरकार तेथील खजूर शेती करण्यासाठी अनुदान देते.तसे अनुदान महाराष्ट्र शासनाने खजूर शेतीसाठी द्यावे. --- दत्तात्रय घुले (सर) ----------------
आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर नक्कीच शेतकरी फायद्यात येईल. फळबागा लावल्याने शाश्वत उत्पन्न मिळते शिवाय फळबागा लावण्यासाठी विविध योजना शासन राबवत आहे याचा शेतकरी वर्गाने फायदा घेतला पाहिजे. ---- गोरख तरटे ( तालुका कृषी अधिकारी ) ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या