Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज ....... रणजित राऊत

आष्टी (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय,हाळगाव येथील चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांनी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा शास्त्रज्ञ, जैवविविधता संशोधक व वन्यजीव छायाचित्रकार रणजित रावसाहेब राऊत यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले. “निसर्गाचा ऱ्हास हा मानवी जीवनासाठी गंभीर संकट निर्माण करतो आहे. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधतेच्या समतोलाबद्दल आणि पारंपरिक देशी वृक्षांच्या लागवडीचे फायदे सांगितले. कार्यक्रमात पोलीस पाटील श्री. योगिनाथ जायभाय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी कन्यांनी गावात जनजागृती रॅली काढून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला. यानंतर शाळा परिसर व गावठाणात जांभूळ, आवळा, कांचन, बहावा यांसारख्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन कृषी कन्या कु.नम्रता कदम,कु.अंजली गायवळ, कु. आरती गायकवाड, कु.पायल इंगळे, कु.अनुजा जाधव व कु. गायत्री जाधव यांनी केले. ग्रामस्थांनी कृषी कन्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले असून अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामीण भागात सकारात्मक चळवळ उभी राहणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या